नारबाची वाडी: निखळ हास्याचा नितांतसुंदर प्रवास
कोकण! महाराष्ट्राला एक नितांतसुंदर प्रदेश. केवळ समुद्र एवढीच कोकणची ओळख नाही, तर या कोकणाची, कोकणातल्या लोकांची एक वेगळीच संस्कृती आहे. आयुष्यातलं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तितक्याच सहजपणे हसत हसत स्वीकारणाऱ्या कोकणी माणसाच्या जगण्याची पद्धतही एकदम साधी आणि सोपी असते. फार काही अपेक्षा नाहीत की, मोठ मोठी स्वप्नं नाहीत. नारळ, पोफळी, रातांबा आणि आंब्याच्या बागा म्हणजे कोकणचं वैभव. आपल्या बागांवर इथल्या माणसाचं जीवापाड प्रेम असतं. अशाच एका निवांत जगणाऱ्या आणि घामाचं पाणी करून फुलवलेल्या बागेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नारबाच्या जगण्याची खरंतर मरणाची कहाणी म्हणजे ‘नारबाची वाडी’. (Narbachi Wadi)
चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आहे. कथा सुरु होते ब्रिटिशपूर्व काळात. नारबा नावाच्या एका माणसाच्या वाडीवर म्हणजेच त्याने फुलवलेल्या नारळ, पोफळीच्या बागेवर गावातल्या श्रीमंत खोताचा म्हणजेच रंगारावचा डोळा असतो. जबरदस्तीने तो ही वाडी नारबाकडून हिरावून घेणार असतो, पण नारबाच्या मदतीला असं कोणी धावून येतं की, रंगारावचा डाव फसतो. आता तो कसा फसतो, हे वाचण्यापेक्षा चित्रपटात पाहणं मजेशीर आहे. (Narbachi Wadi)
नारबाच्या वाडीचा ध्यास घेऊनच रंगारावचा मृत्यू होतो. आता सगळी सूत्र त्याचा मुलगा मल्हारच्या ताब्यात जातात. मल्हार उच्चशिक्षित आणि प्रचंड कंजूस असतो. आपल्या हुशारीबद्दल त्याला अतिआत्मविश्वास असतो. काळ जवळपास २०/२५ वर्ष पुढे सरकतो. नारबाही आता अगदीच म्हातारा झालेला असतो. त्यात त्याचा नातूही उनाड असतो. मल्हार हुशारीने नारबाला जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत असतो. अशातच नारबाचा नातू घरातून निघून जातो. त्यामुळे एकाकी पडलेला नारबा अल्पावधीतच मरणार असा विचार करून मल्हार नारबाशी एक करार करतो आणि हा करारच नंतर मल्हारची डोकेदुखी बनतो. (Narbachi Wadi)
एकीकडे मल्हार आणि त्याची पत्नी रेणुका नारबाच्या मरणाची वाट बघत असतात, तर दुसरीकडे नारबाचा नातू पंढरी लग्न करून परत येतो. पंढरी, त्याची पत्नी आणि नारबाच्या बागेत चोरी करणारा चोरही नारबाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला जपत असतात. एका व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यूसाठी प्रार्थना करणाऱ्या या दोन बाजू मानवी मनोवृत्तीचा स्वार्थी चेहरा समोर आणतात, पण ते देखील अगदी विनोदी पद्धतीने.
चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर हे नारबाच्या मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनी साकारलेला नारबा निव्वळ अप्रतिम! त्यांचं अभिनय कौशल्य आणि संवादफेक तर उत्तम आहेच, पण नारबाच्या चेहऱ्यावरचे हावभावही अचूक जमून आले आहेत. रंगाराव आणि मल्हार या दोन्ही भूमिकांमध्ये मनोज जोशींनी कमाल केली आहे. नारबाचा नातू पंढरी (विकास कदम) त्याची पत्नी मंजू (ज्योती मालशे), रेणुका (किशोरी शहाणे), बेरके (निखिल रत्नपारखी), ज्योतिषी (अतुल परचुरे) यांच्या भूमिकाही उत्तम जमून आल्या आहेत. (Narbachi Wadi)
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बंगाली लेखक मनोज मित्रा यांच्या ‘शज्जनो बागान’ या नाटकावर आधारित होता. बंगाली नाटकावर आधारित असल्यामुळे असेल कदाचित, पण खोतांमध्ये बंगाली ‘ठाकूर’चा अनेकदा भास होतो. दिग्दर्शक म्हणून आदित्य सरपोतदार यांनी उत्तम दिगदर्शन केलं आहे, पण खोतांच्या व्यक्तिरेखेला कोकणचा ‘टच’ देण्यात ते काहीसे कमी पडले आहेत. खोतांची वेशभूषाही फारशी परिणामकारक वाटत नाही. कोकणातल्या ‘खोतांचा’ आणि त्यांच्या जीवनमानाचा अभ्यास इथे थोडा कमी पडल्याचं ठळकपणे जाणवतं. पण गुरु ठाकूर यांचे खास कोकणी भाषेचा टच असणारे खुमासदार संवाद आणि कलाकारांचे अभिनय इतके सरस आहेत की, या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तरी चालण्यासारखं आहे.
==========
हे देखील वाचा – नायक- द रियल हिरो: एका दिवसाचा मुख्यमंत्री झालेल्या पत्रकाराची कथा आणि व्यथा
==========
कोकणातला दशावतार, पंढरी – मंजूची प्रेमकहाणी, मल्हार आणि त्याच्या मुलाचा संवाद हे सगळे प्रसंग सहज सुंदर जमून आले आहेत. कोणताही मेलोड्रामा नाही की, हाणामारी नाही आहे ती फक्त निखळ करमणूक. त्यामुळे डोक्याला कोणताही ताण न देता निखळ करमणूक हवी असेल, तर अजिबात विचार न करता ‘नारबाची वाडी’ हा चित्रपट बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट यु ट्यूब वर अगदी फ्री मध्ये बघता येईल. (Narbachi Wadi)