ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
वजीर : वजिराचा मोहरा बनलेल्या राणीची कहाणी
मराठी चित्रपटांच्या इतिहासात राजकारणावर आधारित काही मोजकेच चित्रपट असे आहेत जे समीक्षकांसह प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले होते. या चित्रपटांमधून राजकारणाचा खराखुरा आणि भीषण चेहरा दाखवण्यात आला होता. यापैकीच एक चित्रपट म्हणजे वजीर. (Marathi Movie Vazir)
बुद्धिबळात जसा वजीर हा ‘गेम चेंजर’ असतो तसाच राजकारणातही वजीर सर्वशक्तिमान असतो. एक म्हण आहे “Everything is fair in Love and War” हीच म्हण राजकारणाच्या बाबतीतही लागू पडते. सत्तेची आस इतकी जबरदस्त असते की, सत्ता मिळविण्यासाठी राजकारणी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जीव घेऊ शकतो, धोक्यात घालू शकतो किंवा लग्नही करू शकतो. हेच दाखवण्यात आलं आहे १९९३ साली आलेल्या ‘वजीर’ या चित्रपटात. (Marathi Movie Vazir)
राजकारण तर राजकारण्यांचं असतं, पण यात भरडला जातो तो सामान्य नागरिक. पण इथे तर एक साधी, सरळ, अनाथ मुलगी मोहरा बनते एका वजिराची. बलात्काराच्या जखमांनी शरीर आणि मन उद्ध्वस्त झाल्यावर डोळ्यात आसवांशिवाय काहीच उरत नाही. अशावेळी गरज असते ती एका साथीदाराची. डोळ्यातली आसवं अलवारपणे पुसणाऱ्या आश्वासक स्पर्शाची. पण दुर्दैवाने तिच्या नशिबात यातलं काहीच येत नाही. ती लढतही नाही. कारण तिच्यात हिम्मत नसते. शरीराची झालेली विटंबना आणि एकाकीपणाचं दुःख सहन करत ती फक्त जगण्यासाठी धडपडत राहते.
तिच्या दुःखाचं भांडवल केलं जातं ते सत्तेसाठी. तिचं लग्न तर होतं, पण ती पत्नी मात्र बनत नाही. कारण ती फक्त एक शिडी असते खुर्चीपर्यंत पोहोचण्याची. बलात्काराने शरीराची विटंबना केलेलीच असते, तर या लग्नामुळे तिच्या आत्मसन्मानाची, भावनांची विटंबना होते. तरीही ती उपकाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेली राहते. का? कारण यालाच तर राजकारण म्हणतात. हाच आहे राजकारणाचा खरा चेहरा.
अखेर शेवट गोड तर सर्व गोड या नियमानुसार तिला तिचा मान मिळतो. ती अन्यायाविरुद्ध उभी राहते. स्वतः ठाम होते आणि आपल्या पतीलाही भानावर आणते. त्याला विवेकाची जाणीव करून देते. सुरुवातीपासूनचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो लढायचं ठरवतो. ती असतेच त्याच्यासोबत! अखेर वंदे मातरम्.. म्हणत ही राणी वजिराच्या साथीने लढाई जिंकते.
उज्वल ठेंगणी लिखित ‘वजीर’ या नाटकावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक होते संजय रावल. चित्रपटाची कथा अंगावर शहरा आणणारी आहेच, पण त्या कथेला जोड मिळाली ती प्रभावी दिग्दर्शन आणि सुरस अभिनयाची. चित्रपटात विक्रम गोखले, अशोक सराफ, अश्विनी भावे, आशुतोष गोवारीकर, कुलदीप पवार असे मात्तबर कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. (Marathi Movie Vazir)
या चित्रपटात अश्विनी भावेला एक चांगली सशक्त भूमिका मिळाली आणि तिने या भूमिकेचं अगदी सोनं केलं. विक्रम गोखले यांचा पुरुषोत्तम अगदी जबरदस्त. अशोक सराफ यांनी या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका केली आहे. विनोदी, धीरगंभीर किंवा नकारात्मक; भूमिका कोणतीही असो अशोक सराफ त्या भूमिकेत नेहमीच चपलख बसतात. त्यांच्या अभिनयाला कोणत्याही मर्यादा नाहीत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते श्रीधर फडके. “सांज ये गोकुळी…” हे नितांतसुंदर गाणं याच चित्रपटामधलं होतं. हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
========
हे देखील वाचा – अवंतिका: एका छोट्या कथेची प्रदीर्घ चाललेली मालिका
========
जुन्या चित्रपटांचं आणि साहजिकच त्यांच्या दिग्दर्शकांच कौतुक वाटतं. कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान न वापरता किंवा कथानकाची गरज म्हणून कोणतीही अश्लील किंवा आक्षेपार्ह दृश्य न दाखवताही दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे, हे प्रेक्षकांना बरोबर समजायचं. तेवढं परिणामकारक दिग्दर्शन केलं जात होतं.
वजीर का बघायचा? राजकारण समजून घेण्यासाठी? नाही… समाजकरणाबद्दल जाणून घेण्यासाठी…अजिबातच नाही. वजीर बघायचा तो उत्तम कथेसाठी, त्या कथेला न्याय देणाऱ्या तेवढ्याच समर्थ दिग्दर्शनासाठी आणि कलाकारांच्या सशक्त अभिनयासाठी!