
Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन गुणी आणि सशक्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा अखेर पूर्ण होत आहे. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन दमदार व्यक्तिमत्त्व एकत्र येत असून, हा चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अक्षय बाळसराफ यांच्या लेखन-दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘परिणती’ हा चित्रपट पराग मेहता आणि हर्ष नरूला या निर्मात्यांनी सादर केला आहे. सामाजिक वास्तव, स्त्रीचं आत्मभान आणि अंतर्मनातील लढ्याची नाजूक गुंफण यामुळे ‘परिणती’ प्रेक्षकांसाठी एक वैचारिक आणि भावनिक अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.(Sonali Kulkarni and Amruta Subhash Together)

चित्रपटाच्या पोस्टरची मांडणीच अतिशय बोलकी आहे. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमध्ये या दोन अभिनेत्री दाखवण्यात आल्या आहेत. एक पारंपरिक, रंगीबेरंगी पेहरावात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि बाणेदार नजर असलेली. तर दुसरी, एकदम साध्या वेशात, स्वतःमध्ये हरवलेली, शांत आणि गंभीर. या दोन पात्रांच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभास, त्यांचा भावनिक संघर्ष, आणि समाजातील स्थान यांची स्पष्ट झलक या पोस्टरमधून मिळते.

ही कथा आहे दोन स्त्रियांची आणि त्यांच्या अस्तित्वासाठीच्या प्रवासाची. एक अशी जी जगाच्या नियमांवर प्रश्न विचारते, आणि दुसरी अशी जी आतल्या आत मूक बंड करते. त्यांच्या प्रवासाची कारणं भिन्न असली, तरी उद्देश एकच, स्वतःसाठी परिवर्तन घडवणं. ‘परिणती’ ही त्या दोघींच्या शोधयात्रेची कथा आहे – जिथे मैत्री, संघर्ष, आणि आत्मभान यांचा संगम घडतो. दिग्दर्शक अक्षय बाळसराफ या चित्रपटाविषयी म्हणतात, “या कथेत मी अशा दोन स्त्रिया मांडल्या आहेत, ज्या आयुष्याच्या एका टप्प्यावर भेटतात आणि त्यांची मैत्री त्यांच्या जीवनाला नवीन वळण देते. सोनाली आणि अमृताने या भूमिका इतक्या ताकदीनं साकारल्या आहेत की त्या पडद्यावर नव्हे, तर तुमच्या मनात उतरतात. ‘परिणती’ प्रेक्षकांना फक्त मनोरंजन देणार नाही, तर अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल.” (Sonali Kulkarni and Amruta Subhash Together)
==============================
हे देखील वाचा: Mumbai Local Movie Teaser: प्रथमेश आणि ज्ञानदाच्या सिनेमाचा कलरफुल टीझर लॉन्च !
==============================
सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या दोघीही त्यांच्या भूमिका निवडण्यात नेहमीच ठाम भूमिका घेतात. दोघींचीही कारकीर्द प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे त्यांचं एकत्र काम करणं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट स्त्रीवाद, आत्मशोध आणि सशक्तीकरण यांचे विविध पैलू उलगडतो. बदल घडवण्यासाठी आधी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. हाच या चित्रपटाचा गाभा आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी ‘परिणती’ हा चित्रपट तुमच्यापर्यंत येणार आहे. एक वेगळी कथा, एक सशक्त मांडणी, आणि दोन अप्रतिम अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला अनुभव नक्कीच प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.