
एक हळवी प्रेमकहाणी: महाराष्ट्राची महामालिका ‘कुलवधू (Kulvaddhu)’
मल्टी – स्टारर ही संकल्पना चित्रपटांमध्ये तर सर्रास बघायला मिळते. पण मालिकांच्या विश्वात ही संकल्पना सर्वप्रथम आणली ती बहुदा ‘कुलवधू’ (Kulvaddhu) या मालिकेनेच. झी मराठीवर २००९ साली आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. या मालिकेमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधले अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
मालिकेचं कथानकही मल्टी -स्टारर कलाकारांना साजेसं. चित्रपटांच्या कथानकाशी मिळतंजुळतं. दामोदर देशमुख म्हणजे अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व; सत्याच्या मार्गाने चालणारे. त्यांची हुशार आणि सुस्वभावी नात देवयानी म्हणजे त्यांचा अभिमान असतो. देवयानीची काकू अभिलाषाच्या मनात देवयानी आणि तिची धाकटी बहीण साक्षी या दोघींबद्दलही प्रचंड राग असतो. गावातल्या शाळेत मुलांना शिकवण्याच्या देवयानीचं स्वप्न श्रावणीला अत्यंत साधं वाटत असतं. देवयानीची आदर्श विचारसरणी तिच्या चुलत बहिणीला – श्रावणीला अत्यंत सामान्य विचारसरणी वाटत असते. श्रावणी सतत देवयानीच्या अपमान करत असते.
याच गावातलं राजेशिर्के कुटुंब म्हणजे खानदानी श्रीमंत कुटुंब. भैय्यासाहेब, त्यांची आई, त्यांची पत्नी आणि धाकटा भाऊ विक्रमादित्य अशा या चौकोनी कुटुंबात भैय्यासाहेबांची पत्नी सोडल्यास प्रत्येकालाच पैसा आणि सत्तेचा माज असतो. भैय्यासाहेब पक्के व्यावसायिक असतात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट इतकंच काय तर, प्रत्येक नातं म्हणजे फक्त व्यवसाय असतो. (Kulvaddhu)

दामोदर देशमुख आणि भैय्यासाहेब अशी परस्परविरोधी व्यक्तिमत्व एकमेकांसमोर उभं टाकण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा विक्रमची नजर गावातल्या शाळेच्या जागेवर पडते. शाळेची इमारत पाडून तिथे फॅक्टरी बांधायचं स्वप्न विक्रम बघत असतो, तर त्याच शाळेतल्या मुलांना शिकवायचं स्वप्न देवयानी बघत असते. दोन परस्परविरोधी मतं असणारे हे दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडतात… पण विक्रम देवयानीला फसवतो.
विक्रमने केलेल्या फसवणुकीमुळे देवयानी कोलमडून जाते. पण नंतर ती स्वतःला सावरते. खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवते आणि एक स्वप्न बघते…विक्रमशी लग्न करून राजेशिर्के घराण्याची सून होण्याचं! एका सामान्य घरातली मुलगी राजेशिर्के घराण्याची ‘कुलवधू’ (Kulvaddhu) होण्याचं स्वप्न बघत असते. साधी स्वप्न बघणाऱ्या देवयानीच्या स्वप्नांनी आता मोठी झेप घेतलेली असते.
देवयानीचा स्वप्नपूर्तीचा प्रवास सोपा नसतो. तिचे लाडके दादू तिच्या विरोधात असतात. तसंच मुळात विक्रमच तिचा तिरस्कार करत असतो. पण देवयानी हार मानत नाही. पुढे विक्रमला भैय्यासाहेबांचं खरं रूप समजतं. त्याची विवेकबुद्धी जागी होते आणि विक्रम देवयानीकडे परत जातो. इतकंच नाही तर तो भैय्यासाहेबांच्या विरोधात उभा राहतो.

कथेला अनेक उपकथानकं आहेत. देवयानीच्या बहीण साक्षी व तिचा प्रियकर राज, चुलत बहीण श्रावणी, भैय्यासाहेबांची पत्नी अशा अनेक व्यक्तिरेखांचं आयुष्य यामध्ये दाखवण्यात आलं आहे. या मालिकेमध्ये सदाशिव अमरापूरकर (दामोदर देशमुख), मिलिंद गुणाजी (भैय्यासाहेब), आशालता (साई माँ), सुबोध भावे (विक्रम), पूर्व गोखले (देवयानी), पल्लवी वैद्य (साक्षी), या कलाकारांसोबतच निशिगंधा वाड, वैभव मांगले, सई रानडे, मिलिंद पाठक, सुप्रिया पाठक, मेघना वैद्य, इला भाटे, इ कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
भव्यदिव्य सेट्स, तगडी स्टारकास्ट, प्रतिष्ठित घराणं, हळवी प्रेमकहाणी असा एकंदरीत हिंदी मालिकांमध्ये असणारा लवाजमा मराठी मालिकेमध्ये बघायला मिळाला. मराठी प्रेक्षकांसाठी हा अनुभव नवीन होता. मालिकेचं शीर्षक गीत कमालीचं लोकप्रिय झालं होतं. त्यावेळी कित्येकांच्या मोबाईलची रिंगटोनवर हे शीर्षकगीत ऐकायला येत असे. अभिनेत्री पूर्वा गोखलेने या मालिकेद्वारे बऱ्याच वर्षांनीं पुनरागमन केलं होतं. (Kulvaddhu)
मालिकेचे प्रोमोज जेव्हापासून झळकायला लागल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. झी मराठीने प्रमोशनवर बरीच मेहनत घेतली होती. त्यावेळी ‘महाराष्ट्राची महामालिका’ अशी या मालिकेची जाहिरात करण्यात आली होती. अर्थात मालिकेच्या प्रोमोज वरून काहींनी ‘हिंदी स्टाईल’, ‘एकता कपूर स्टाईल’ मालिका असणार अशी शक्यताही व्यक्त केली होती. परंतु सुरुवातीचे काही प्रसंग सोडल्यास नंतर मात्र मालिकेने ट्रॅक बदलला.

===========
हे देखील वाचा – मन उधाण वाऱ्याचे: अनेकांच्या विस्मरणात गेलेली आठवणीतली मालिका
===========
मालिकेमधले सुरुवातीचे जनता दरबार सारखे काही प्रसंग प्रचंड हास्यास्पद झाले असले तरी पूर्वा गोखले आणि सुबोध भावे या फ्रेश जोडीने मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. ही मालिका झी मराठीची त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली होती. तसंच विक्रम आणि देवयानीच्या जोडीलाही सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळाला होता. ही मालिका बघायची असेल तर यु ट्यूबवर उपलब्ध आहे. (Kulvaddhu)