Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज
लहानपणापासूनच तिच्यात कलागुण ठासून भरलेले. नाच असो वा भाषण, कुठलाही गुण वर्ज्य नाही. तिला प्रत्येक जण विचारायचा, ‘काय श्वेतांबरी, मोठं होऊन तू काय बनणार?’ तेव्हा तिचं उत्तर ठरलेलं असायचं, ‘मी नटी होणार.’ बालपणापासून जपलेलं हे स्वप्न श्वेतांबरीनं स्वत:च्या जिद्दीवर पूर्ण केलंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटात साकारलेल्या मारिया या भूमिकेनं ती चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली.
श्वेतांबरी घुटे (Shwetambari Ghute) मूळची साताऱ्याची. घरी कापडाचा व्यवसाय. शाळेत असतानापासूनच ती मोठी कलासक्त. सांस्कृतिक कार्यक्रमांत पुढं असायची. आपल्यातील कला इतरांनी पाहावी, असं तिला सतत वाटायचं. मित्रमैत्रिणींना ती एक रुपया द्यायची. त्याबदल्यात अट एकच, त्यांनी तिचा डान्स बघायला यायचं. मग माधुरी दीक्षितच्या गाण्यावर नृत्याचा छोटेखानी कार्यक्रम व्हायचा. चित्रपटांची तिला भारी आवड अन् त्यातील कलावंतांचं कमालीचं अप्रूप. ते कुठं राहतात, एका झटक्यात कपडे कसे बदलतात, याबाबत तिला कायम उत्सुकता असायची. हे कलाकार सामान्यांपेक्षा वेगळे असतात, ते वेगळ्याच दुनियेतील आहेत, असंच तिला वाटायचं. अगदी बालपणापासून तिनं ठरवून ठेवलं होतं की आपण नटी बनायचं. तेव्हा आप्त अन् इतर जवळचे तिला विचारायचे, ‘तुला नटी शब्दाचा अर्थ तरी कळतो का?’ तेव्हा ती शांतपणे बसून विचार करत राहायची.

श्वेतांबरीनं (Shwetambari Ghute) मायक्रोबॉयलॉजी पदव्युत्तरला प्रवेश घेतला. घरच्यांना वाटायचं की तिनं चांगलं शिकावं, नोकरी करावी. जेणेकरून स्थळं चांगली येतील. मात्र, श्वेतांबरीच्या मनात कलाक्षेत्रानं घर केलं होतं. घरी कलेचं कुठलंही वातावरण नाही. तरीही, एखाद्या गोष्टीची आपण मनापासून इच्छा ठेवली अन् त्या दिशेनं प्रामाणिक प्रयत्न केले, तर नशीब बरोबर तिथं तुम्हाला पोहोचवतं. श्वेतांबरीच्या बाबतीतही असंच झालं. श्वेतांबरीनं पुणे गाठलं. तिथं फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या (एफटीआयआय) शॉर्टफिल्म्समधून कामं करू लागली. एका शॉर्टफिल्ममधील तिनं साकारलेली फिरदोस या काश्मिरी मुलीची भूमिका गाजली. त्यानंतर बऱ्याच शॉर्टफिल्म्स तिनं केल्या. अभिनय कलेला येथूनच पैलू पडू लागले. श्वेतांबरी (Shwetambari Ghute) सांगते, ‘साताऱ्यात असताना अभिनयाचं कुठलं प्रशिक्षण वगैरे असतं, त्याच्या इन्स्टिट्युट्स असतात, याबाबत कल्पनाच नव्हती. अन्यथा मी इतके दिवस वाया घालवलेच नसते.’ या शॉर्टफिल्म्सच्या प्रवासातच तिला स्मिता तांबे यांच्यासोबत ‘सावट’ या पहिल्या मराठी चित्रपटात संधी मिळाली. यात तिची दुहेरी भूमिका होती. नंतर दाक्षिणात्य जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या. आजही ती दक्षिणेत व्यस्त आहे.
असा मिळाला ‘घर बंदूक बिरयानी’
श्वेतांबरीनं (Shwetambari Ghute) २०१८ ला एक शॉर्टफिल्म केली होती. त्यावेळी तिच्यासोबत नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे होते. त्यादरम्यान तिनं नागराज यांच्या ‘झुंड’साठी ऑडिशन दिली होती. मात्र, त्यात काम शक्य झालं नाही. दक्षिणेत तिची एका तमिळ चित्रपटासाठी निवड झाली होती. मात्र, काही कारणानं ती संधी गेली. त्यावेळी थोडी निराशाही होती. त्याचवेळी भूषण यांचा तिला कॉल आला, ‘मी सध्या अण्णासोबत (नागराज मंजुळे) आहे. डाकू लूकमधले तुझे फोटोज तातडीनं पाठव.’ श्वेतांबरीनं त्यांना दोन तासांचा अवधी मागितला. संबंधित कपडे शोधले, एक स्टुडिओ गाठला अन् फोटोशूट केलं. भूषण यांनी ते नागराज यांना दाखविले. नंतर लूक टेस्ट झाली. तेव्हाही तिला कल्पना नव्हती की हे नेमकं कशासाठी सुरू आहे. २०१९पासून ‘घर बंदूक बिरयानी’चं काम सुरू झालं. तेव्हा तिला तिची भूमिका कळली. करोनामुळे काही अडचणी आल्या. शेवटी हा चित्रपट २०२३ला प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिनं साकारलेली मारिया सुरुवातीला काही मिनिटांपुरतीच पडद्यावर आहे. मात्र, त्यात तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नंतर ती पडद्यावर दिसत नसली तरी चित्रपटभर तिचा ‘प्रेझेन्स’ जाणवतो.

शिकवून जाणारा अनुभव…
‘घर बंदूक बिरयानी’ हा आयुष्यभर काहीतरी शिकवणारा अनुभव होता, असं श्वेतांबरी सांगते. ‘नागराज मंजुळे आधीपासूनच माझे आदर्श आहेत. त्यांच्यासोबत प्रत्यक्ष काम करायला मिळालं तेव्हा मला आकाशच ठेंगणं झालं होतं. एवढं मोठं व्यक्तिमत्त्व असूनही ते कमालीचे जमिनीवर आहेत. आपल्या सहकाऱ्यांना ते चांगल्यारीतीनं सांभाळून घेतात. ते आणि सयाजी शिंदे यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. याशिवाय, दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनीही वेळोवेळी भूमिका समजावून सांगत प्रोत्साहित केलं’, असंही ती नमूद करते. या चित्रपटातील भूमिकेची एक गंमत आहे. मारिया त्या कॅम्पमध्ये सर्वांसाठी बिर्याणी बनवते. तिच्या हाताला वेगळीच चव असते. मात्र, मी आजवर कधीही स्वत: बिर्याणी बनवलेली नाही, शिवाय मी शुद्ध शाकाहारी आहे. या चित्रपटात मी पहिल्यांदाच विडी ओढली अन् बंदूक चालविली. युनिटनं हे सर्वकाही शिकवल्यामुळे शक्य झालं, असं श्वेतांबरीनं (Shwetambari Ghute) सांगितलं.
मोठ्या मनाचे सुपरस्टार विजय सेतुपती
विजय सेतुपती दक्षिणेतले सुपरस्टार. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी कितीतरी कलावंत उत्सुक असतात. श्वेतांबरीनं (Shwetambari Ghute) अभिषेक बच्चन आणि विजय सेतुपती यांच्या एका आगामी चित्रपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. तिनं एक अनुभव सांगितला, ‘मी विजय सेतुपती यांची फॅन आहेच. या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांच्याशी फक्त एक-दोन मिनिटं भेट झाली. मी स्वत: त्यांच्याजवळ जाऊन माझा परिचय दिला. त्यांनीही चौकशी केली. त्याच्या काही दिवसांनंतर मी मुंबईहून चेन्नईला जात होते. विमानात ते थोडे पुढं बसले होते. हिंमत करून मी त्यांच्याजवळ गेले. तेव्हा त्यांचं लक्ष गेलं. तोच त्यांनी ‘श्वेतांबरी’ म्हणत मला हाक मारली. मी स्तब्धच झाले. एवढा मोठा सुपरस्टार, त्याची नि माझी याआधी फक्त एक-दोन मिनिटं भेट झालेली. तरीही तो मला नावानिशी आजही ओळखतो, शिवाय ओळख दाखवतो, हे पाहून गहिवरलेच. एवढ्यावरच त्यांचं मोठेपण संपलं नाही. त्यांनी विचारलं की चेन्नईला कुठं जाणार, जाण्याची काही सोय आहे का? मी सांगितले की टॅक्सीनं जाणार. तेव्हा विजय सर म्हणाले, ‘आप मुंबई की हो और मैं चेन्नई का. वो शहर आप के लिये नया हैं. इस लिये आप को आप के डेस्टिनेशन पर पहुँचाना मेरी जिम्मेदारी हैं. डोन्ट वरी.’ विमान चेन्नईला पोहोचल्यावर ते माझी बाहेर वाट पाहात थांबले. त्यांनी मला माझ्या इच्छितस्थळी पोहोचवूनही दिलं. मोठं व्यक्तिमत्त्व असण्यासोबतच माणसं मनानं किती मोठी असावीत, याचं हे उदाहरण आहे.’
=======
हे देखील वाचा : नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’
=======
प्रामाणिक राहा, फळ मिळतंच…
श्वेतांबरीची (Shwetambari Ghute) मतं पक्की आहेत. या क्षेत्रात तिला जसे चांगले अनुभव आलेत, तसेच वाईटही. कित्येकदा काही प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आलं, कधी रिप्लेसमेंट झाली. मात्र, निराश न होता तिनं आपलं काम सुरू ठेवलं. ‘तुमचा हेतू योग्य असावा, कामात प्रामाणिक राहावं. यश नक्की मिळतं’, असं ती सांगते. एका कलावंतासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका गरजेची असते. मग त्या भूमिकेची लांबी कितीही असो. त्या भूमिकेत दम असायला हवा, ती प्रभावी असायला हवी, असं तिचं मत आहे. शिवाय, शिकण्याची वृत्ती सतत कायम ठेवावी. आपल्या आजूबाजूचे लोकच आपली प्रेरणा बनत असतात, असंही ती नमूद करते. श्वेतांबरी सध्या दक्षिणेत जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या एका चित्रपटाचं शूट नुकतंच सुरू झालंय तर एक प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. कमालीची नम्र अन् गुणी असलेली श्वेतांबरी कलाक्षेत्राचा हा आसमंत उजळून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे.