दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मी रक्षम…संवेदनशील…पण बघावा असा…
लॉकडाऊनच्या काळात अनेक चांगले चित्रपट आले. या चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आधारानं प्रेक्षकांपर्यंत पोहचावं लागलं. त्यातील काही चित्रपट या ओटीटी माध्यमावर चांगलेच फायद्याचे ठरले…तर काही चित्रपट आल्याची फार थोड्याप्रमाणात दखल घेण्यात आली. यातीलच एक चित्रपट म्हणजे मी रक्षम. जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि तिचा भाऊ, सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांनी आपल्या वडिलांना, कैफी आझमी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या मी रक्षम चित्रपटाची निर्मिती केली आहे. संवेदनशील विषय पण तेवढ्याच उत्तमपणे हाताळलेला हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. विषय वेगळा असला तरी उत्कृष्ठ बांधणी आणि बाबा आझमी यांची जादू बघण्यासाठी हा मी रक्षम नक्की बघावा असाच आहे.
मी रक्षम म्हणजे मला नृत्य करायचे आहे , या नावावरुनच थोड्याफार प्रमाणात चित्रपटाच्या कथेची कल्पना येते. चित्रपटाची कथा मुस्लिम कुटुंबातील मरियम या पंधरा वर्षाच्या मुलीची आहे. तिला भरतनाट्यम नृत्याची आवड आहे. आई नसलेल्या आपल्या मुलीची आवड तिचे वडील पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मरियमचे वडील साधारण शिंपी आहेत. एक मुस्लिम, साधारण माणूस आपल्या मुलीची हौस पूर्ण करण्यासाठी तिला हिंदू धर्मामधील नृत्य, भरतनाट्यम शिकवायला पाठवतो, ही गोष्ट छोट्या गावात मोठा वाद निर्माण करणारी ठरते.
मग या कथेत मरियमची नृत्य शिक्षिका उमा, नृत्य अकादमीचे मुख्याध्यापक जयप्रकाश, मरीयमची काकू, आजी, समाजातील ज्येष्ठ व्यक्ती हशिम शेठ, मरीयमचा मोठा भाऊ, मरीयमला मदत करणारा रिक्षाचालक आदी सर्व सामिल होतात. मरीयमनं नृत्य शिकायला हवं की नको इथून वाद सुरु होतो. मग भरतनाट्यमच का…दुस-या धर्मातील नृत्य कशाला शिकायला हवं.हा एक प्रवाह…तर दुसरीकडे कलेसाठी कुठलीही जात किंवा धर्म नसतो. कला ही कला असते.तिला कुठलाही धर्म नसतो.ही वादावादी सुरु होते. यात भरडली जाते पंधरा वर्षाची निरागस मरीयम.एका छोट्या गावातील वातावरण तिच्यामुळे गढूळ होते. पण मरीयम या सर्व वादावर कसा विजय मिळवते.आणि आपल्या नृत्याची आवड कशी पूर्ण करते.हे नक्की पहाण्यासारखे आहे.
मी रक्षम मध्ये शबाना आझमी आणि नसरुद्दीन शहा यांच्यासह अदिती सुबेदी, दानिश हुसेन, सुदीपता सिंह, राकेश चतुर्वेदी ओम, कौस्तुभ शुक्ला, जुहैना अहसन आणि शिवांगी गौतम यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या ज्येष्ठ कलाकारांसमोर अदिती सुबेदीने मरीयम अत्यंत सक्षमपणे उभी केली आहे. शबाना आझमी आणि बाबा आझमी यांनी आपले वडील कवी आणि गीतकार कैफी आझमी यांना या चित्रपटाद्वारे आदरांजली वाहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यातील मिझवान या कैफी आझमी यांच्याच गावी झाले आहे.
मी रक्षमला रेटींगही चांगली मिळाली आहे. आपल्या मुलीची आवड जपण्यासाठी तिला भक्कम पाठिंबा देणारे वडील…त्यांचे समाजातील धर्माचा बाजार मांडणा-यांबरोबर होणारे वाद.यात त्या मुलीची होणारी फरफट.हा सर्व विषय बाबा आझमी यांनी परिपक्वपणे हाताळला आहे. या कथेवरुन शबाना आजमी यांनी आपल्यातील आणि कैफी आझमी यांच्यातील नाते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे मी रक्षम नक्की बघावा असाच चित्रपट झाला आहे.