दामिनी: मनोरंजनाचं ‘एक्सक्ल्यूसिव्ह पॅकेज’ असणारी मालिका
रामायणानंतर दूरदर्शनवर पौराणिक मालिकांची लाटच आली होती. साधारणतः ४ ते ५ वर्ष ही लाट चालूच होती. त्यानंतर मात्र अशा प्रकारच्या मालिकांची लोप्रियता हळूहळू कमी होत गेली. १९९४ साली शेखर सुमन यांची ‘रिपोर्टर’ मालिका दूरदर्शनवर (डी. डी. नॅशनल) सुरु झाली. दररोज रात्री १० वाजता ही मालिका प्रसारित होत असे. त्याचवर्षी दूरदर्शनच्या डीडी नॅशनलवर दुपारी ‘शांती’ ही मालिका सुरु झाली आणि अल्पावधीत ती देखील लोकप्रिय झाली.
रिपोर्टर आणि शांती या दोन्ही मालिका पत्रकारितेच्या दुनियेवर आधारित होत्या. असं असलं तरी या दोन्ही मालिकांचं कथानक मात्र संपूर्णपणे वेगळं होतं. या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या खास करून त्यावेळच्या युवा वर्गाच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. पण आजचा लेख या दोन्ही मालिकांबद्दल नाही, तर याच आशयाच्या परंतु, थोड्या वेगळ्या वळणावरच्या मालिकेबद्दल आहे. ही मालिका आहे ‘दामिनी (Damini)’.
त्यावेळी दूरदर्शनसह काही हिंदी चॅनेल्स सुरू झाली होती. घराघरात टीव्ही विराजमान झाले होते आणि केबल टीव्हीचं जाळं महानगरांपासून छोट्या शहरांपर्यंत पसरलं होतं. शांती ही हिंदी मालिका अखेरच्या टप्प्यावर होती. त्याचवेळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘दामिनी’ ही मालिका सुरू झाली आणि सर्व मराठी प्रेक्षक पुन्हा दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडे वळले.
दामिनी (Damini) ही मराठीमधील पहिली दैनंदिन मालिका होती. ही मालिकाही पत्रकारितेच्या दुनियेवर आधारित होती तरीही ती वेगळी होती कारण या मालिकेच्या कथानकाला खास महाराष्ट्रीयन संस्कृतीचा ‘टच’ देण्यात आला होता. यामध्ये दामिनीच्या मुख्य भूमिकेत होती प्रतीक्षा लोणकर. निर्भीड पत्रकार म्हणून ती जेवढी प्रेक्षकांना भावली तेवढीच ती एक मुलगी, एक पत्नी आणि एक स्त्री म्हणूनही आवडली. आपलं करिअर आणि नातीगोती सारख्याच तळमळीने सांभाळणाऱ्या आदर्श स्त्रीचं चित्र दामिनीच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर उभं राहिलं.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ही मालिका प्रसारित केली जात असे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत “सत्यता शोधण्या घेऊनी लेखणी….” हे कविता कृष्णमूर्तींच्या आवाजातले स्वर महाराष्ट्रातल्या अगदी खेड्या-पाड्यातल्या घरांतूनही ऐकू येत असत.
नैतिक मूल्य जपणारी, सर्वांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारी, प्रचंड स्वाभिमानी आणि सत्यवादी त्याचबरोबर निर्भीड असणारी ‘दामिनी’ त्यावेळच्या कित्येक मुलींची ‘आयडॉल’ बनली होती. ही मालिका ‘न्यायदेवता’ या कथेवर आधारित होती. या मालिकेमध्ये प्रतीक्षा लोणकरसोबत किरण करमरकर, लालन सारंग, अविनाश खर्शीकर, हर्षदा खानविलकर, रमेश भाटकर, कुलदीप पवार, रुही बेर्डे, प्रिया तेंडुलकर, आनंद अभ्यंकर, शरद पोंक्षे, महेश मांजरेकर, आसावरी जोशी अशा मराठीतील जवळपास सर्वच नामवंत कलाकारांनी काम केलं होतं.
आपला प्रियकर गैर मार्गाला जातोय, पैशासाठी त्याने चुकीचा रस्ता अनुसरला आहे, हे लक्षात आल्यावर त्याला त्या मार्गाला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारी दामिनी जेव्हा यामध्ये अपयशी ठरते तेव्हा आपल्या नैतिक मूल्यांसाठी ती प्रियकराशी असणारं नातं संपवून टाकते आणि हतबल न होता अथवा रडत न बसता आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात करते. थोडक्यात आजच्या काळातल्या भाषेत बोलायचं तर, ती त्याच्याशी ‘ब्रेक अप’ करून ‘मूव्ह ऑन’ करते.
या मालिकेमध्ये काय नव्हतं? कौटूंबिक कलह, प्रेमकहाणी, समाजातील बड्या लोकांची मनमानी, त्याला बळी पडणारा समाज आणि त्याविरोधात लढा देणारे नायक असा अनेक प्रकारचा मालमसाला या मालिकेमध्ये होता. थोडक्यात त्यावेळच्या विविध हिंदी चित्रपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या सर्व कहाण्या या मालिकेमध्ये बघायला मिळाल्या होत्या. थोडक्यात दामिनी (Damini) म्हणजे मनोरंजनाचं ‘एक्सक्ल्यूसिव्ह पॅकेज’ होतं.
दामिनीचे विचार स्पष्ट होते. ती तिच्या विचारांवर आणि मतांवर ठाम होती. आपली चूक झाली तर ती स्वीकारायची आणि दुसऱ्याची चूक माफ करायचीही तिची सहज तयारी असते. परंतु, असत्य, अन्याय, भ्रष्टाचार याबद्दल मात्र तिला मनस्वी चीड असते. त्याबातीत कोणतीही तडजोड करायची तिची तयारी नसते. दामिनी हळवी असते पण त्याचवेळी ती प्रॅक्टिकलही असते. ती भावनांचा आदर करते पण त्यांच्या आहारी मात्र जात नाही.
========
हे देखील वाचा – द ओमेन (The Omen): कहानी पुरी फिल्मी नही… शापित है!
========
प्रतीक्षा लोणकर या अभिनेत्रीने साकारलेली ही ‘दामिनी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही लोक तर तिला खरोखरची पत्रकार समजून तिला आपल्या समस्या सांगत असत. त्यावेळी ती महत्प्रयासाने लोकांना पटवून देत असे की, ती दामिनी नाही, प्रतीक्षा लोणकर आहे. ती फक्त दामिनीची भूमिका साकारतेय.
आजच्या काळातल्या ‘डेली सोप’ मधल्या रडणाऱ्या, अन्याय सहन करणाऱ्या असहाय्य आणि मूर्ख नायिकांकडे पाहून आठवण येते ती दामिनी नावाच्या तडफदार नायिकेची. आजच्या मालिकांच्या प्रवाहात एखादी दामिनी सारखी वास्तववादी विषयांवर आधारित मनोरंजनाचं ‘एक्सक्ल्यूसिव्ह पॅकेज’ असणारी मालिका दाखल झाली तर प्रेक्षक तिचं स्वागतच करतील. परंतु, टीआरपी आणि हिंदी मालिकांची नक्कल करण्यात धन्यता मानणारी चॅनेल्स प्रेक्षकांच्या अपेक्षा समजून घेतली का?