सुसाट चेन्नई एक्सप्रेस
बॉलीवुडचे अनेक विक्रम मोडणारा चित्रपट ‘चेन्नई एक्सप्रेस’ म्हणजे कॉमेडी आणि अॅक्शनची सुसाट बुलेट ट्रेन. ऑगस्ट २०१३ मध्ये प्रदर्शित या चित्रपटाच्या काही आठवणी.
शाहरुख खान,दीपिका पदुकोण अभिनीत, रोहीत शेट्टी दिग्दर्शित ह्या मसाला चित्रपटाच्या निर्मितीत शाहरुख खानची पत्नी गौरी खान सहभागी होती. खान आणि शेट्टी यांनी एकत्रितपणे चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीला संजीव कुमार यांच्या १९८२ सालच्या “अंगूर” सिनेमाचा रिमेक करायचं ठरलं होतं. दरम्यान चेन्नई एक्सप्रेसची कथा तयार होती. विचाराअंती शाहरुखने देमार चित्रपटाला प्राधान्य द्यायचे ठरवले आणि ‘अंगूर’चा रिमेक बारगळला. चेन्नई एक्सप्रेसची कथा पुढे आली.
सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रेडी स्टेडी पो’ असं ठरलं होतं पण त्यातून लोकांना नेमका अर्थ कळणार नाही असे वाटून चित्रपटाचं दक्षिण भारतीय कनेक्शन स्पष्ट करणारं ‘चेन्नई एक्सप्रेस’ नाव निश्चित केलं गेलं.
चित्रपटात दक्षिण भारताचा संबंध असल्याने कथानकानुसार उटी येथे शुटींग अपेक्षित होतं पण शाहरुख खानला मुंबईपासून दीर्घकाळ इतकं दूर राहणं शक्य नसल्यानं वाईमधल्या पाचगणीतच उटीचा सेट ४० दिवसांत उभारण्यात आला आणि शुटींग पार पडलं.
या चित्रपटात बरेचसे संवाद तामिळमध्ये होते. पण त्या संवादांची परिणामकारकता तशीच रहावी म्हणुन संवादांचं भाषांतर करणारं सबटेक्स्ट न देण्याचा निर्णय दिग्दर्शक रोहीत शेट्टीने घेतला.
या चित्रपटाची सर्वच गाणी गाजली. विशाल शेखर यांनी संगीतकार म्हणून आपली कामगिरी चोख बजावली. या सिनेमाच्या टायटल ट्रॅकचं वैशिष्ट्य म्हणजे एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी तब्बल १५ वर्षांनी या गाण्यासाठी बॉलिवूड कमबॅक केलं.
हे हि वाचा : लूडो….चार रंगाचे प्रेक्षणीय चित्र
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यानं अनेक विक्रम मोडले. हा चित्रपट कमीत कमी दिवसात उत्तम गल्ला जमवणारा ठरला. चित्रपटाच्या तिकीटाच्या किंमतीत विकडेजला ४०% तर विकेंडला २०% इतकी वाढ करण्यात आली. पेरु देशात प्रदर्शित होणारी ही पहिली भारतीय फिल्म ठरली. आतापर्यंत सर्वाधिक व्यवसाय करणा-या चित्रपटांत या फिल्मचा ११वा क्रमांक लागतो.
काही बाबतीत हा चित्रपट वादग्रस्तही ठरला. तामिळ संस्कृतीचे चुकीचे चित्रण केल्याचा ठपका सिनेमावर ठेवण्यात आला. दीपिकाचे संवाद तामिळ कमी आणि मल्याळी जास्त वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. चित्रपटातील असंख्य चुकांवर बोट ठेवण्यात आलं. जसं की, नायकाचे आजोबा २०१३ मध्ये वनडे क्रिकेट मॅच पाहत असतात त्यात सचिन तेंडुलकर खेळत असतो. वास्तविक सचिनने २०१२ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. किंवा जनरल डब्यात चढलेला नायक उतरताना स्लीपरकोचमधून बाहेर पडतो. अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवलं गेलं. पण सर्वसामान्य प्रेक्षकांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. देमार अॅक्शन, विनोदाला राहूल मिनाम्माच्या रोमान्सचा तडका आणि साऊथ कनेक्शन लोकांना आवडलं. शाहरुख,दीपिका इतकंच दीपिकाच्या वडिलांची भूमिका करणारे दक्षिण भारतीय कलाकार सत्यराज जे नंतर बाहुबलीतील कटाप्पा म्हणून आपल्या अधिक ओळखीचे झाले (दीपिकाचे वडील) आणि निकीतीन धीर( थंगबली) यांनाही प्रेक्षकपसंती मिळाली.
या चित्रपटावर व्हिडिओ गेमही आला होता. ‘चेन्नई एक्सप्रेस- एस्केप फ्रॉम रामेश्वर’ या गेममध्ये गेमर्सना चित्रपटातील नायक राहूल बनून खेळण्याची संधी मिळाली.
अशी ही तद्दन फिल्मी रोहीत शेट्टी फिल्म नायक नायिकेची प्रेमकथा आणि घरच्यांचा विरोध या टिपीकल चाकोरीतली असूनही सादरीकरणातील फ्रेशनेसमुळे सुपरहिट ठरली.