हम पाँच: एका वेगळ्या वळणावरची कौटुंबिक मालिका
आठवणीतील मालिकांबद्दल लिहिताना एका मालिकेला अजिबात विसरून चालणार नाही, ती मालिका म्हणजे ‘हम पाँच’. या मालिकेबद्दल लिहिताना कोणत्याही प्रस्तावनेची गरजच नाही. नुसतं नाव वाचूनच अनेकजण ‘नॉस्टॅल्जिक’ झाले असतील. काही कलाकृती या अवीट गोडीच्या असतात. त्या जशा असतात तशाच सुंदर वाटतात. त्यांचा ‘रिमेक’ होऊ शकत नाही आणि समजा केलाच तरी त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं जवळपास अशक्यच. अगदी हा रिमेक प्रत्यक्षाहून उत्कट बनवला तरीही नाहीच नाही. कारण त्या कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं असतं. त्यामधील व्यक्तिरेखांची आणि त्या व्यक्तिरेखा निभावणाऱ्या कलाकारांची जागा प्रेक्षक दुसऱ्या कोणालाच द्यायला तयार होत नाहीत. ‘हम पाँच’ ही याच प्रकारातली मालिका आहे.
नव्वदच्या दशकात टेलिव्हिजन विश्वामध्ये अप्रतिम मालिका निर्माण झाल्या. याच काळात पहिली वहिली खाजगी वाहिनी ‘झी टीव्ही’ चालू झाली. दूरदर्शनच्या स्पर्धेत टिकून राहता येईल का, ही शंका असताना सुरु झालेली ही वाहिनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. नव्याची नवलाई बराच काळ टिकून राहिली ती उत्तमोत्तम कंटेंटमुळे.
१९९५ साली सुरु झालेली ‘हम पाँच’ ही एक विनोदी मालिका होती. आनंद माथूर (अशोक सराफ) त्याची गृहिणी असणारी पत्नी बिना (शोमा आनंद) त्यांच्या पाच मुली – मीनाक्षी, राधिका, स्वीटी, काजल आणि छोटी. यांच्याभोवती फिरणाऱ्या या मालिकेमध्ये अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती ती म्हणजे आनंदची पहिली पत्नी (प्रिया तेंडुलकर). (Memories of Hum Paanch serial)
आनंदच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालेला असतो आणि तिचा फोटो भिंतीवर टांगलेला असतो. आनंदची पहिली पत्नी फोटोमधून फक्त त्याच्याशीच बोलत असते. मीनाक्षी, राधिका, स्वीटी या तीन मोठ्या मुली आनंदच्या पहिल्या पत्नीच्या मुली असतात. परंतु बिना या पाचही मुलींवर जीवापाड प्रेम करत असते. आणि या पाचही मुली एकमेकींवर अगदी सख्ख्या बहिणींसारखंच प्रेम करत असतात. आपल्या पाचही मुलींच्या खट्याळ वागण्यामुळे आनंद अनेकदा अडचणीत सापडत असतो.
या पाच मुली मिळून प्रत्येक भागामध्ये काहीतरी नवीन उद्योग करून धमाल आणतात. यामध्ये अजून एक महत्त्वाचं पात्र होतं ते म्हणजे पूजा आँटी (अरुणा संगल). तिचा ‘आँटी मत कहो ना’ हा डायलॉग आजही लोकप्रिय आहे. मालिकेचा प्रत्येक भाग वेगळा असल्यामुळे प्रेक्षकांना आजच्या भागात नवीन काय, ही उत्सुकता असायची. (Memories of Hum Paanch serial)
या पाचही मुलींची स्वतंत्र ओळख होती. जी मालिकेच्या शीर्षक गीतामध्येच करून देण्यात आली होती. सर्वात मोठी मीनाक्षी मोठ मोठ्या गष्टी करणारी, तर अत्यंत हुशार राधिकाला ऐकायला कमी येत असतं, सर्वात सुंदर असणारी स्वीटी ‘ब्युटी विदाउट ब्रेन’ असते, तर नाजूक साजूक काजल स्वतःला दादा समजत असते आणि सगळ्यात लहान छोटी मात्र सगळ्यात जास्त नाठाळ असते. या मालिकेमध्ये विद्या बालननेही काम केलं होतं. मालिकेमध्ये राधिकाच्या भूमिका करणाऱ्या अमिता नांगियाने मालिका सोडल्यावर तिची भूमिका विद्या बालनला मिळाली. मालिकेमध्ये मीनाक्षी, राधिका आणि छोटी या तिन्ही व्यक्तिरेखांसाठी अनेक कलाकार बदलले.
ही मालिका बालाजी टेलिफिल्म्सची पहिली निर्मिती होती. या मालिकेच्या माध्यमातून एकता कपूरने वयाच्या १६ व्या वर्षी निर्माती म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी तिचं ऑफिस गॅरेजमध्ये होतं. मालिकेमध्ये सर्वांच्याच भूमिका उत्तम होत्या आणि त्या आजही समरणात आहेत. अशोक सराफ यांच्या विनोदाच्या टायमिंग बद्दल काय बोलणार? उत्तम विनोद निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे फोटोतून बोलणाऱ्या आपल्या पहिल्या पत्नीवर वैतागणं असो किंवा मुलींच्या कारनाम्यांमुळं त्रस्त होणं असो, अशोक सराफ यांचे चेहऱ्यावरचे हावभावही प्रेक्षकांना हसवायला पुरेसे होते. प्रिया तेंडुलकर यांचं ‘ए जी…’ खूप गोड वाटायचं. बिनाची चिडचिडही अगदी सहज सुंदर. स्वीटीचं गाणी म्हणत दार उघडणं आणि काजलची दादागिरी बघताना धमाल यायची. (Memories of Hum Paanch serial)
सन १९९५ ते २००६ पर्यंत मालिकेचे एकूण ३४५ भाग प्रसारित झाले. यामध्ये १९९५ ते १९९९ मध्ये पहिला सिझन प्रसारित झाला होता. त्यानंतर २००५ मध्ये दुसरा सिझन प्रसारित झाला. या सीझनमध्ये मालिकेनं लीप दाखवण्यात आला होता. परंतु या सिझनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि वर्षभरातच मालिकेने गाशा गुंडाळला. याला कारण म्हणजे १९९९ ते २००५ या कालावधीत समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले होते. लोकांची अभिरुची बदलली होती. अनेक खाजगी वाहिन्या सुरु झाल्या होत्या. साँस – बहू टाईप कौटुंबिक ‘डेली सोप’चा जमाना सुरु झाला होता. त्यामुळे या मालिकेला पूर्वीसारखा प्रेक्षकवर्ग आणि विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. (Memories of Hum Paanch serial)
बिग मॅजिक चॅनेलवर १९ जून २०१७ रोजी ही मालिका नव्या कलाकारांसह ‘हम पांच फिर से’ या नावाने प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेची निर्मिती ‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन’ने केली होती. परंतु ही मालिका प्रेक्षकांनी नाकारली आणि ८ महिन्यात मालिकेने गाशा गुंडाळला. (Memories of Hum Paanch serial)
===========
हे देखील वाचा – बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
===========
निखळ करमणूक करणारी कलाकृती हा शब्द अलीकडे दुर्मिळ झाला आहे कारण अशा कलाकृती अभावानेच निर्माण होतात. पण नव्वदच्या दशकात मात्र अशा अनेक कलाकृती निर्माण झाल्या ज्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं, कधी रडवलं तर कधी समाज प्रबोधनही केलं. या कलाकृतींमुळे प्रेक्षक टीव्हीकडे ओढला गेला. हम पाँच ही अशीच एक निखळ करमणूक करणारी मालिका होती. ही अशी कलाकृती आहे ज्या कलाकृतीला तिचे मूळ स्वरूप सोडून प्रेक्षक इतर कोणत्याही स्वरूपात स्वीकारू शकत नाहीत.