Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

इस बिल्डींग में एक ही मर्द है, और वो है स्मिता तळवलकर
प्रसिद्ध वृत्तनिवेदिका, दिग्दर्शक, निर्माती आणि अभिनेत्री स्मिता तळवलकर (Smita Talwalkar) या आजही मराठी सिनेमा क्षेत्रातल्या सर्वात हरहुन्नरी, धाडसी, दूरदर्शी आणि कणखर कलाकार मानल्या जातात. मराठी सिनेमा पठडीबाज विनोद आणि कथांमध्ये अडकला असताना त्यांनी चाकोरीबाहेरचे विषय मांडले. चौकट राजा, सवत माझी लाडकी, कळत नकळत, तू तिथे मी असे आजही ‘क्लासिक’ मानले जाणारे सिनेमे त्यांनी दिले.
आत्ताच्या काळातही मराठी सिनेमांची आर्थिक गणितं काहीशी कठीण आहेत, तर त्यांचा काळ पूर्णपणे वेगळा होता. निर्माती- दिग्दर्शक आणि त्यातही स्त्री म्हणून त्यांचा प्रवास जास्त अवघड होता. या प्रवासात त्यांना वेगवेगळे अनुभव आले, पण त्यांनी त्या सगळ्याला ठामपणे तोंड दिलं. आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्यातल्या धडाडीची आठवण करून देणारा त्यांच्या चौकट राजा सिनेमाच्या प्रदर्शनावेळेचा एक किस्सा (Memories of Smita Talwalkar) –
आणि स्मिताताई थेट पोलिसात गेल्या
चौकट राजा सिनेमाच्या प्रदर्शनासाठी स्मिताताईंना मुंबईतलं ‘प्लाझा’ हे एकच थिएटर आणि तिथला मॅटिनी शो मिळाला होता. प्रदर्शनानंतर चौथ्या दिवशी स्मिताताई त्यांच्या ऑफिसला पोहोचल्या तेव्हा त्यांच्या सिनेमाचं पोस्टर लावणारी तरुण मुलं जखमी अवस्थेत त्यांची वाट बघत थांबली होती. त्यांच्या हाता – पायाला आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. रात्री पोस्टर लावायला गेल्यानंतर एका व्हॅनमधून काही माणसं अवजारं घेऊन आली आणि त्यांनी मारहाण केल्याचं मुलांनी सांगितलं.

पोस्टर लावण्याच्या बाबतीत एका विशिष्ट माणसाचं त्या भागात वर्चस्व होतं आणि आपल्याला ते काम दिलं गेलं नाही म्हणून स्मिताताईंसाठी काम करणाऱ्या मुलांना त्यांनी मारहाण केल्याचं कळलं. स्मिताताईंनी फोन लावल्यावर त्यानं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तेव्हा अजूनच संतापलेल्या स्मिताताईंनी त्या मुलांना घेऊन थेट पोलिस स्थानक गाठलं.
पोलिसही त्या माणसाविरोधात एफआयआर करायची आहे म्हटल्यावर जरा दचकलेच. तरीही स्मिताताई मागे हटल्या नाही. पोलिसांशी बोलून आल्यावर काहीच तासांत त्या माणसानं स्मिताताईंना फोन करत गोड बोलायला सुरुवात केली. स्वतःहून पोस्टर लावून देतो असंही सांगितलं. त्या माणसात असा अचानक बदल कसा झाला, हे स्मिताताईंना कळेना, पण त्यांनीही प्रकरण फार न खेचता त्याला परवानगी दिली. (Memories of Smita Talwalkar)
फक्त स्मिताताई
दुसऱ्या दिवशी घरच्यांकडून स्मिताताईंना आपण ज्याच्याविरोधात पंगा घेतला, तो माणूस कुप्रसिद्ध गुंड असून त्याचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं कळलं आणि त्या दचकल्याच. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. एरवी अशा वागण्याचा भयंकर दुष्परिणाम झाला असता, पण त्या माणसाने स्मिताताईंना काहीच केले नाही. उलट तो पुढेही प्रत्येक सिनेमाच्या प्रदर्शनावेळेस आपणहून त्यांना फोन करून पोस्टर लावून द्यायचा आणि स्वतःहून पैसेही मागायचा नाही. स्मिताताई त्याला कधीच भेटल्या नाहीत, पण तो कायम म्हणायचा… इस नाझ बिल्डींगमे चारसौ डिस्ट्रीब्युटर्सके ऑफिसेस है, लेकिन मर्द सिर्फ स्मिताताई है!
एकत्र कुटुंबामुळे
स्मिताताईंचं लग्न खूप लवकर म्हणजे १७ व्या वर्षी झालं आणि त्या तळवलकरांच्या एकत्र कुटुंबात राहायला लागल्या. तळवलकर कुटुंब जिम व्यवसायात होतं. व्यवसाय करण्यासाठी लागणारी जिद्द, त्यातल्या अडचणी यांची कुटुंबाला कल्पना होती. त्यामुळे आधी वृत्तनिवेदिका आणि नंतर अभिनेत्रीचं सुरक्षित करियर सोडून आपण सिनेमा व्यवसायात उतरलो तेव्हा घरच्यांनी विरोध केला नाही असं स्मिताताई सांगायच्या. (Memories of Smita Talwalkar)

त्यांचा चौकट राजा सिनेमा आज सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जात असला, तरी तेव्हा त्याला आर्थिक यश मिळालं नव्हतं. पण ते नुकसान सोसण्याचं बळ कुटुंबामुळे मिळालं असं त्या आवर्जून सांगतात. “घरचे मला विचारायचे, ‘अपयश आलं, तो विषय संपला, आता पुढचं काम कोणतं घेणारेस?’ ते म्हणायचे की, ‘पाकीट जिथे हरवलं, तिथेच शोधायचं. अपयश आलं म्हणून व्यवसाय बदलायचा नाही. त्यामुळे चौकट राजासारख्या महत्त्वाकांक्षी सिनेमाचं आर्थिक नुकसान सोसून मी उभी राहू शकले. त्यानंतर लगेचच ‘सवत माझी लाडकी’ सिनेमा आला आणि त्याच्या यशानं आधीचं नुकसान भरून निघालं.”
=====
हे देखील वाचा – किशोरदांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे निर्मात्याने घेतली होती कोर्ट ऑर्डर…
=====
स्मिता ताई होत्याच अशा स्पष्ट आणि प्रामाणिक. चित्रपटसृष्टीत असूनही त्यांचा साधा, सरळ पण धडाडीचा वावर सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच आश्वस्त करत असे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटावर मात देऊन यशस्वी झालेल्या स्मिता ताई कॅन्सरशीही शेवटपर्यंत झगडल्या. पण अखेर आपल्या साठाव्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी २०१४ साली त्या जग हे सोडून गेल्या.
– कीर्ती परचुरे
1 Comment
[…] […]