वडील गेल्याच्या दुःखात असतानाही केला विनोदी सीन चित्रित… कुठला होता हा सीन?
वयाच्या चौथ्या वर्षी सिनेमाबद्दल काहीही समजत नसताना, कॅमेऱ्यासमोर उभी राहणारी दाक्षिणात्य मुलगी श्री अम्मा यांगर अय्यपन ते जगप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी असा तिचा ५४ वर्षांचा प्रवास काही शब्दांत मांडणं खरंतर अवघड आहे. हिंदी सिनेमासृष्टीतली पहिली स्त्री सुपरस्टार, जबरदस्त डान्सर, अफलातून विनोदी टायमिंग, पडदा व्यापून टाकणारा अभिनय, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा चार भाषांत मिळून केलेले शेकडो सिनेमे या सगळ्यामागे शाळा- कॉलेजमध्ये न गेलेली, कळायला लागायच्या आधीपासूनच घर सावरण्यासाठी पैसे कमावणारी, दाक्षिणात्य लहेजात तोडकं- मोडकं हिंदी बोलणारी, स्वभावानं लाजाळू असणारी, कधी लठ्ठपणा, तर कधी काळपट रंग किंवा भडक वेशभूषेमुळे सतत टीका सहन करणारी मुलगीही दडली होती. पण पराकोटीची मेहनत आणि अविरतपणे स्वतःवर काम करण्याची तयारी या दोन महत्त्वाच्या गोष्टींच्या जोरावर तिनं सुपरस्टारपद मिळवलं आणि ते शेवटपर्यंत टिकवलं. (Sridevi)
श्रीदेवी जेवढी दिसणं, अभिनय आणि नृत्यासाठी प्रसिद्ध होती, तेवढीच ती कामाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल ओळखली जायची. कामापुढे ‘सब झूट’ मानणाऱ्या तिच्या समर्पित वृत्तीचे किस्से आजही इंडस्ट्रीत आवर्जून सांगितले जातात.
शो मस्ट गो ऑन..
श्रीदेवीचं (Sridevi) करियर ऐन भरात होतं, त्या दरम्यान ती यश चोप्रांच्या लम्हे सिनेमात काम करत होती. लंडनमध्ये त्याचं चित्रीकरण सुरू असताना भारतात तिच्या वडिलांचं अचानक निधन झाल्याचं घरच्यांनी यशजींना कळवलं. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी श्रीला पाठवावं अशी विनंती त्यांनी केली.
वडील गेल्याच्या बातमीचा मानसिक धक्का बसू नये म्हणून यश चोप्रांनी तिला वडिलांची तब्येत खूप खालावल्याचं सांगत भारतात पाठवण्याची व्यवस्था केली. दरम्यान तिच्या काही सीन्सचं शूटिंग बाकी असल्यामुळे सगळं युनिट लंडनमध्येच थांबलं. वडिलांचं क्रियाकर्म करून सोळा दिवसांनी श्रीदेवी परत लंडनमध्ये दाखल झाली खरी, पण यश चोप्रांसमोर वेगळाच पेच उभा राहिला होता. तिच्यावर चित्रित करायचे दोन्ही सीन्स धमाल विनोदी होते.
वडिलांच्या मृत्यूमधून अजून न सावरलेल्या श्रीदेवीकडून (Sridevi) ते सीन्स कसे करून घ्यायचे असा प्रश्न त्यांना पडला होता. पण कॅमेऱ्याबरोबर स्वतःला स्विच ऑन- ऑफ करण्याची तिची क्षमता असामन्य होती. त्या सीन्सपैकी चेहऱ्याला ब्लीच लावून वहिदा रेहमान आणि अनुपम खेरबरोबरचा सीन आधी शूट केला गेला. आज तो सीन पाहाता श्रीदेवी त्यावेळी इतक्या दुःखी मनस्थितीत असेल, अशी शंकाही येत नाही.
नगिना सिनेमाची कथासुद्धा तिनं अंगात ताप असताना ऐकली होती आणि तत्काळ त्यासाठी होकार दिला होता. इतकंच नव्हे, तर चालबाज सिनेमातलं ‘ना जाने कहां से आई है’ या तिच्या अजरामर गाण्याचं शूटिंग सुरू असतानाही तिच्या अंगात १०३ ताप होता. पण वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवून काम कसं करावं याचं ती आदर्श उदाहरण होती.
स्वतःच्या मर्जीची राणी
देशातली पहिली स्त्री सुपरस्टार म्हणून श्रीदेवीचं आयुष्य सतत प्रकाशझोतात असलं, तरी ते हाताळण्याची तिची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. हिरोपेक्षा जास्त मानधन मागणं, कथेत हवे तसं बदल करणं, सेटवर उशीरा येणं यातलं काहीही करणं तिला शक्य होतं आणि त्यावर कोणी आक्षेपही घेतला नसता, इतकी तिची प्रसिद्धी शिखरावर गेलेली होती, मात्र श्रीदेवीनं यातली कधीच काहीही केलं नाही.
ती कायम वेळेवर सेटवर यायची. स्वतःचा मेकअप, कपडे यात ती जातीनं लक्ष घालायची. ती पत्रकारांशी कधी तुसडेपणाने बोलली नाही, की तिनं कधी कोणाला जवळ केलं नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही लिहिलं- बोललं गेलं, पण ती कधीच कसलं स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडली नाही. लाजाळू स्वभावामुळे आजही ती उद्धट होती असं मानणाऱ्यांचा वर्ग आहे, पण तिला त्याची कधीच फिकीर नव्हती. (Sridevi)
=========
हे देखील वाचा – जेव्हा वर्णद्वेषाचा फटका स्मिता पाटील यांना बसला…. तो ही भारतात!
=========
पन्नाशीनंतर तिचा बांधा, चेहरा आणि ओठाच्या आकारात झालेल्या बदलांवरून ती मोठ्या प्रमाणावर कॉस्मेटिक सर्जरी करत असल्यावरून चाहते नाराज झाले होते. श्रीदेवीला हे सगळं करण्याची गरजच काय, असा चाहत्यांना प्रश्न पडला होता. मात्र, ती तशीच होती. तिनं तिला हवं ते, हव्या त्या पद्धतीनं केलं पण वेळेच्या खूप आधी निघून गेली. (Sridevi)
– कीर्ती परचुरे