भारतीय मेथड ॲक्टर्सची न्यारी दुनिया!
मेथड ॲक्टिंग ही संकल्पना सर्वप्रथम कॉन्स्टॅन्टीन स्टॅनिस्लाव्हस्कीने मांडली आणि ली स्ट्रासबर्गने त्या संकल्पनेला आणखी भरीव रूप दिलं. सुप्रसिद्ध अभिनेते मार्लन ब्रँडो हे हॉलिवूडचे पहिले मेथड अॅक्टर मानले जातात. ब्रँडो, डस्टीन हॉफमन, रॉबर्ट डी निरो यांचा हा वारसा अल पचिनो, हिथ लेजर, जॉनी डेप, लिओनार्डो डिकॅप्रिओ सारख्या प्रतिभावंत अभिनेत्यांनी पुढे चालवला आहे. भारतीय अभिनेते दिलीपकुमार यांनी १९४४ पासूनच मेथड ॲक्टिंगचा प्रघात बॉलिवूडमध्ये सुरू केला. मुघले आजम, मधुमती, देवदास, इत्यादी चित्रपटांमधील त्यांची अभिनयशैली ही आजही कित्येक कलाकारांना आदर्शवत वाटत आली आहे.
डॉ. श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आद्य नावं. सामना, पिंजरा, चौकट राजा, पछाडलेला इत्यादी चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाकडे आजची पिढी एक वस्तुपाठ म्हणून बघते. आपण साकारत असलेली भूमिका आपल्या अभिनयातून जिवंत करण्यासाठी कलाकाराने केलेल्या वाचिक आणि कायिक अभिनयाची उदाहरणे मेथड ॲक्टिंग या अभिनयतंत्रातून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. असा अभिनय करताना कलाकारांच्या सृजनशीलतेचा कस तर लागतोच, त्याचबरोबर अतिश्रमाने त्यांच्या आरोग्यावर, शरीरावरही दीर्घकालीन परिणाम दिसून येतो. चला तर आज जाणून घेऊयात भारतातील काही प्रमुख मेथड ॲक्टर्सना..
१. कमल हसन (Kamal Haasan)
मेथड ॲक्टर्सच्या लिस्टमध्ये कमल हसन यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या भूमिकांबाबत कायमच प्रयोगशील राहिलेला हा अभिनेता ‘उलगनायगन’ (लोकनायक) या नावाने ओळखला जातो. सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित केले गेलेल्या या अभिनेत्याने ‘फिल्मफेअर’ला यापुढे त्याला नामांकित न करता इतर कलाकारांना, विशेषतः तरुण पिढीला, संधी द्यावी अश्या आशयाचं पत्र लिहिलं होतं. ‘अप्पू राजा’मध्ये त्यांनी साकारलेला ठेंगणा अप्पू असो किंवा ‘सागर संगमम’मधील शास्त्रीय नर्तक, त्यांच्या अभिनयातील प्रयोगशीलतेने प्रेक्षक अवाक होऊन जातात.
२. मोहनलाल (Mohanlal)
‘लालेटन’ या नावाने चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेले मोहनलाल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही भूमिकेत सहज शिरणाऱ्या या अभिनेत्याने तब्बल ३००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणारे मोहनलाल यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्म भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. ‘वानप्रस्थम’ या चित्रपटात त्यांनी कथ्थकली नर्तकाची अविस्मरणीय भूमिका केलेली असून, यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
३. मनोज वाजपेयी (Manoj Bajpai)
मनोज वाजपेयी हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असून, सत्या, शूल, सोनचिरिया, गँग्ज ऑफ वासेपूर इत्यादी दर्जेदार चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शूल मध्ये त्याने एका कडक शिस्तीच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्याला फिल्मनंतर डिप्रेशनचा सामना करावा लागला. “नाटकांमध्ये काम केलेलं असल्याने मी अगदी सहजपणे मेथड ॲक्टिंग करू शकतो आणि त्यातून लवकर सावरूही शकतो.” असं मनोजचं म्हणणं आहे.
४. नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui)
सध्याच्या घडीला, बॉलिवूडमध्ये या नावाची प्रचंड चलती आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण नवाजसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपट असो वा वेबसिरीज, नवाजला कोणत्याही माध्यमाचा अडथळा कधीही जाणवला नाही. बॉलिवूडमध्ये हिरो कसा असावा याचे सगळेच प्रघात मोडीस काढत नवाजने स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. ‘रमण राघव 2.0’ मधला सायको किलर असो किंवा ‘बजरंगी भाईजान’मधला पत्रकार, नवाजची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावत आलेली आहे.
५. चियान विक्रम (Vikram)
एखादी भूमिका समरसून करणे, तिच्यासाठी जीवापाड मेहनत करणे, त्या भूमिकेत खोलवर शिरणे या सर्व अवघड गोष्टी अगदीच सोप्या वाटतात, जेव्हा चियान विक्रमला प्रेक्षक पडद्यावर बघतात. प्रयोगशाळेतल्या उंदरावर प्रयोग करावेत, तसे अचाट प्रयोग विक्रम स्वतःवर करत आलाय आणि ते प्रयोग १००% यशस्वीही ठरवत आलाय. ‘काशी’ चित्रपटात विक्रमने एका आंधळ्या गायकाची भूमिका साकारली होती, ज्याची तयारी करण्यासाठी तो दिवसभर सूर्याकडे डोळे लावून बसायचा. त्याच्या या कष्टाचं चीज तर झालंच पण तेव्हापासून विक्रमला अंशतः अंधत्व आलं आणि कायमचाच चष्मा लागला.
६. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)
आपल्या नर्मविनोदी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता वेबसिरिजेसच्या दुनियेतील हुकमी एक्का मानला जातो. अभिनय किती सहज आणि सोपा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंकज त्रिपाठींनी साकारलेल्या भूमिका. ‘पंकज त्रिपाठींची मानसुद्धा कित्येक अभिनेत्यांपेक्षा उत्तम अभिनय करते’ अश्या आशयाचा एक व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पंकज यांच्या गँग्ज ऑफ वासेपूर, गुंजन सक्सेना, स्त्री इत्यादी चित्रपट आणि ‘मिर्झापूर’, ‘सॅक्रेड गेम्स’मधील काही प्रसंगांच्या समावेश होता ज्यात फक्त वेगवेगळ्या पद्धतीने मान हलवून पंकज यांनी त्या प्रसंगांमध्ये स्वतःचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. त्यांना ‘न्यूटन’मधील त्यांच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आपण साकारत असलेल्या भूमिकेशी समरस होण्यासाठी कलाकार जिवाचं रान करतात. बऱ्याचदा केवळ भूमिकेची गरज म्हणून टोकाची पावलेही उचलतात. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या भूमिकेला न्याय मिळवून देतात. पण मेथड ॲक्टिंग म्हणजेच खराखुरा अभिनय आहे का? इतर अभिनेत्यांना अभिनयाची जाण नाही का? हा फिल्म इंडस्ट्रीला पडलेला प्रश्न आहे आणि यावर अद्यापही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीय. आजच्या सिनेमांमध्ये मेथड ॲक्टिंगचं तंत्र हे कालानुरूप विकसित होत आले आहे, त्यात बरेच नवे घटकही समाविष्ट केले गेलेले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा इंटेन्स अभिनय करूनही भूमिका हवी तशी साकारली जात नाही. उदाहरणार्थ, तान्हाजी चित्रपटातील सैफ अली खानने साकारलेला राजपूत सरदार उदयभान. रणवीर सिंगने ‘पद्मावत’मध्ये साकारलेला खिल्जी या भूमिकेपेक्षा कैकपटीने सरस होता.
हे देखील वाचा: क्रिमिनल जस्टीस – बिहाइंड क्लोज्ड डोअर्स
मराठी चित्रपटसृष्टीत अतुल कुलकर्णी यांनी नटरंग साठी पैलवान आणि नाच्याच्या भूमिका असोत वा सुबोध भावे यांनी साकारलेले टिळक, बालगंधर्व ही पात्रं, मेथड ॲक्टिंगची ही उत्तम उदाहरणे आज मराठी कलाकारांसमोर उभी आहेत. त्याचबरोबर, राजकुमार रावने ‘trapped’साठी केलेली मेहनत, आमिर खानने ‘गजनी’मधून आणलेला एट पॅक ॲब्जचा ट्रेंड, दशकातील सर्वोत्तम खलनायकी भूमिकांमध्ये गणला जाणारा रणवीर सिंगचा ‘पद्मावत’मधील अल्लाउद्दीन खिल्जी ही देखील मेथड ॲक्टिंगचीच उदाहरणे आहेत.