Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Sholay : उत्साहाला सलाम!
पिक्चरचं वेड काय काय घडवून आणेल काहीच सांगता येत नाही बघा. चित्रपट वा त्यातील कलाकार, त्याचे दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक यांचे निस्सीम भक्त वेडात काय काय अफाट काम करतील, हे सांगता येणार नाही… तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण जी.पी.सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१५ ऑगस्ट १९७५) प्रदर्शित झाल्यापासून आजपर्यंत किमान शंभर वेळा पाहिलेले ‘शोले’ दीवाने देशभरात अनेक. वयाच्या पंधराव्या वर्षी पहिल्यांदा ‘शोले’ पाहिला. (Sholay Movie)

मुंबईतील चित्रपट रसिकांनी मिनर्व्हा चित्रपटगृहात सत्तर एमएमचा पडदा व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असा अनुभवला. (मिनर्व्हात ‘शोले’ पाहणे नव्हते तर अनुभवणे होते) आणि त्यानंतर चित्रपटगृहातच अनेकदा, मग ऐंशीच्या दशकात घरी व्हीसीआरवर व्हिडिओ कॅसेटवर , मग कधी रिपीट रनला प्रदर्शित झाल्यावर, नव्वदच्या दशकात मनोरंजन उपग्रह वाहिनीवर, मग यू ट्यूबवर अशी माध्यमे बदलत असताना त्यानुसार पुन्हा पुन्हा ‘शोले’ पाहणारे फिल्म दीवाने अनेक. काही वर्षांपूर्वी हाच’शोले’ आधुनिक तंत्रज्ञानाने संस्कार करुन तो त्रीमिती चित्रपट (अर्थात थ्री डी) करण्यात आला तेव्हाही अनेकांनी तो पाहिला. अगदी मीदेखील.(Entertainment)

‘शोले’ हा कधीच न संपणारा विषय.’शोले’चं पन्नास वर्ष सेलिब्रेशन सध्या सुरु आहे. त्यात काही वेगळ्या भन्नाट कल्पनाही दिसताहेत. अशीच एक कल्पना मास्टरो (संगीत संयोजक) कांचा रणजीत बाबुजी यांनाही सुचली. ते संगीतकार राहुल देव बर्मनचे जबरदस्त फॅन (इतके की, त्यांनी पंचम या नावावरुन आपल्या नातीचे नाव ‘पंचमी’ असे ठेवले. असे चित्रपट संगीत दीवाने ही तर आपल्या देशातील चित्रपट रसिक संस्कृतीची खासियत) त्यांनी भव्य दिमाखदार पडद्यावर’शोले’ची श्रेयनामावली, गाणी व काही महत्वाचे दृश्य सादर करतानाच त्यासमोर शंभर वादकांचा ताफा संगीत संयोजन करतोय अशा वेगळ्या शोचे आयोजन केले आणि त्याला हाऊसफुल्ल गर्दीचा प्रतिसाद मिळाला.
================================
हे देखील वाचा: Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
=================================
‘शोले’ ची क्रेझ आजही कायम आहे हेच अधोरेखित होतेय. नरिमन पॉईंट येथील एनसीपीए सभागृहात याचे दोन दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. बरेच दिवस या संगीत संयोजनाची रिहर्सल घेण्यात आली. आणि मग ते प्रत्यक्षात स्टेजवर सादर करण्यात आले.’शोले’ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल भाषेत सांगायचे तर, एक उत्तम पॅकेज मनोरंजक चित्रपट. त्यात गीत, संगीत, नृत्य, पार्श्वसंगीत या सगळ्याचा सहभाग. विशेषत: मिनर्व्हात ‘शोले’ पाहण्यात वेगळाच रोमांचक अनुभव असे. मी गिरगावातील खोताची वाडीत लहानाचा मोठा झालो, त्यात मिनर्व्हात ‘शोले’ एन्जॉय करण्याचा योग आला.
मला आठवतंय, मिनर्व्हात तेव्हा अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे व बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असे तिकीट दर होते. ‘शोले’च्या स्पर्धेत प्रदर्शित झालेला ‘गरीबी हटाव’ हा चित्रपट शालिमारमधून कधी उतरला हे समजलेच नाही. मात्र ‘जय संतोषी मा’ (मुंबईत ३० मे १९७५ ला रिलीज) टिच्चून टिकून राहिला. मिनर्व्हात सत्तर एमएम व स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम असा असल्यानेच वेगळाच फिल येई. प्रत्येक म्युझिक पीस भन्नाट वाटे.(त्यात दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक दिसे). उगाच चित्रपट लोकप्रिय होत नाहीत. त्यात रसिकांना गुंतवून ठेवणारे असं काही असावेच लागते. काळ कितीही पुढे सरकला तरी ते आठवणीत राहते. पुढील अनेक पिढ्यात जात असते.

पडद्यावर ‘शोले’ आणि समोर संगीत या विशेष खेळास पटकथाकार जावेद अख्तर हजर होते. त्यांनीही हे एन्जाॅय केले. देशातील विविध शहरांतून हा शो आयोजित केल्यास सगळीकडेच त्याला भारी रिस्पॉन्स निश्चित. ‘शोले’चे गीत संगीत व डायलॉग सर्वकालीन सुपरहिट आहेतच. त्याचा हा वेगळा अनुभव. चित्रपटाचे म्हणा वा मनोरंजनाचे जग हे असे अनेक बाबतीत बदलतयं. आपण फ्लॅशबॅकमध्ये डोकावल्यास लक्षात येईल की, मूकपटाकडून बोलपटाकडे आपण आल्यावर त्यात संवाद, गीत संगीत या गोष्टीही आल्या.
================================
हे देखील वाचा: Pratiggya Movie : Dharmendra नाचला आणि पब्लिकने थिएटर डोक्यावर घेतले…
=================================
ध्वनिमुद्रण ही गोष्ट येण्यापूर्वी काही चित्रपटात कलाकार गाणे गात असताना आसपास काही वादक असत. चित्रपट माध्यम व व्यवसाय यांनी सतत कात टाकत टाकत बरीच प्रगती केली आहे. त्यात अनेकांची बुध्दिमत्ता व श्रम आहेत. चित्रपट हे टीम वर्क आहे. दिग्दर्शक त्याचा कर्णधार असतो. या वाटचालीत चांगले; उत्तम, दर्जेदार चित्रपट पडद्यावर आले तसेच सामान्य, कंटाळवाणे, सुमार असेही चित्रपट येत राहिले. सर्वच देशातील चित्रपट संस्कृतीत हेच चाललयं. त्यात आपल्या देशातील जणू लोककथा ठरलेला असा ‘शोले’ देखिल आहे. त्याच्या प्रदर्शनाचे हे पन्नासावे वर्ष सुरु असतानाच इटलीत याच आठवडय़ात ‘शोले’ पुन्हा प्रदर्शित झाला आहे. दर्जेदार चित्रपट आजच्या ग्लोबल युगात जगभरातील अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहचत असतोच….(Bollywood Masala)