‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
उद्योगक्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मिथुनदांचा 1994 ते 1999 या पाच वर्षात देशातील सर्वाधिक कर देणा-या उद्योजकांमध्ये समावेश होता.
भालो दादा….
हातात गिटार… पांढरा शर्ट, तशीच पांढरी बेलबॉटम पॅन्ट, पांढरे शूज… आणि डोक्यावर चमचमीत रुमाल अशा पेहरावतला मिथून पडद्यावर आला की अवघं थेअटर डिस्को डिस्को म्हणून थिरकायला लागायचं…. मग तो आय अॅम अ स्ट्रीट डान्सर… म्हणत या धुंदी चढलेल्या प्रेक्षकांना नाचायला भाग पाडायचा… बरं त्याच्या डान्सच्या स्टेप्सही साध्या सोप्या वाटतील अशाच… त्यामुळे ज्याला जमेल तो आणि ज्याला येत नाही तोही त्याच्यासोबत नाचायला तयार असायचा…. ऑक्रेस्टाला सोनेरी दिवस आणले ते मिथूनदांनी… या डान्सींग दादांनी अनेकांना नवीन उर्जा दिली… अभिनय, नृत्य यांचा बादशहा असलेला हा अभिनेता समाजकार्यातही तेवढाच पुढे आहे…
मिथून अर्थात गौरांग चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1952 रोजी बंगाल येथे झाला. कलकत्यामधील स्कॉटीश चर्च कॉलेजमध्य़े त्यांनी रसायन शास्त्रामध्ये पदवी घेतली. त्यानंतर मिथून पुणे येथील फिल्म आणि टेलीव्हीजन संस्थेमध्ये दाखल झाले. मृणाल सेन यांच्या मृगया या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण पुढे चित्रपट मिळेनात. काही चित्रपटात साईड रोल मिळाले. त्यातून मुंबई सारख्या शहरात रहाणेही परवडत नव्हते. त्यामुळे त्यांनी पेईंगेस्ट म्हणून रहाणे पसंद केले. दो अंजाने या चित्रपटात मिथूनदा अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत एका साधारण भूमिकेत दिसले. दरम्यान त्यांना सुरक्षा आणि तराना सारखे चित्रपट मिळाले. त्यात ते हिरोच्या भूमिकेत होते. बॉलिवूडमध्ये नवीन चॉकलेट बॉय आलाय अशी चर्चा होऊ लागली. पण 1982 मध्ये डिस्को डान्सर चित्रपट आला. आणि मिथून चक्रवर्ती हे नाव सर्वांच्या तोंडी झालं… का नाही होणार या चित्रपटात मिथून यांनी अवघ्या तरुणाईला थिरकवलं… त्यांच्या नृत्याच्या कौशल्यानं भूरळ घालली. सर्वत्र मिथून दादांचे पोस्टर दिसू लागले. फार काय तरुणांनी त्यांच्यासारख्या केसांची स्टाईल ठेवायला सुरुवात केली. बेलबॉटमची फॅशन मुलां-मुलींमध्ये आली. मग या डान्सिंग स्टारनं एका मागोमाग एक हिट चित्रपट देऊन आपला ठसा उमटवला.
डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की… अशा चित्रपटांना आणि त्यातील मिथून यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच दरम्यान नंबर वन पदावर असलेले अमिताभ राजकारणात प्रवेश करत होते. त्यामुळे त्यांची खाली झालेली जागा मिथूनदा यांनी भरुन काढली. मिथूनदा चौफेर होते. हिंदीत त्यांची जादू होतीच… पण बंगला, उडीसा, भोजपूरी चित्रपटातही मिथूनदादा काम करत होते. त्यांनी लो बजेट चित्रपटातही काम केले. एका वर्षाला तब्बल 30चित्रपट प्रदर्शित झाल्याचा रेकॉर्ड मिथूनदांच्या नावे आहे. हे चित्रपट मोठ्या थेअटरमध्ये भलेही दाखवले गेले नाहीत… पण व्हीडीओ सेंटरमध्ये तर मिथूनदादांच्या याच चित्रपटांना मागणी होती. त्यामुळे झालं काय की मिथूनदादा हे नाव भारताताल्या अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहचलं. अर्थात 30 चित्रपट दादा एका वर्षात करायचे तरी कसे, हा प्रश्न सर्वांना पडतो… तर दादा या चित्रपटाच्या शुटींगमध्ये वेळेचं नियोजन करायचे… त्यांच्या उटीजवळील हॉटेलच्या परिसरातच हे शुटींग व्हायचे… दादा अनेकवेळा सलग शुट करायचे… त्यामुळे एका वर्षात त्यांचे 30 चित्रपट प्रदर्शित झाले. आता मिथूनदादांच्या खात्यात 350 पेक्षा अधिक चित्रपट जमा आहेत.
मिथूनदादा कधीही हिरोचीच भूमिका हवी या हट्टाला पकडून राहीले नाहीत. आपल्या वाढत्या वयाचा अंदाज आल्यावर त्यांनी त्या वयाला साजेश्या अश्या भूमिका केल्या. ते चॉकलेट हिरो होते. ते व्हिलन होते. ते गुरुही होते… जी भूमिका मिळाली त्यात त्यांनी आपली छाप पाडली. गुलाममधील त्यांचा कोई शक… हा डायलॉग आजही तेवढ्याच रुबाबात म्हटला जातो. वॉन्टेड, बॉक्सर, जागीर, जाल, वतन के रखवाले, कमांडो, वक्त की आवाज, मुजरीम, दुश्मन, स्वामी विवेकानंद, गुलामी, गुरु, अग्निपथ, जल्लाद, ओ एम जी आणि अगदी अलिकडचा हाऊसफूल 2 सारख्या चित्रपटांकडे नजर टाकली की समजतं या बंगालीबाबूनं किती विविधांगी भूमिका केल्या आहेत. मिथूनदांनी त्याकाळच्या जवळपास सर्वच टॉपच्या अभिनेत्रींसोबत भूमिका केली आहे. त्यात जीनत अमान, पद्मीनी कोल्हापुरे, रती अग्निहोत्री, माधुरी दिक्षित यांचा समावेश आहे.
मिथून चक्रवर्तींवर अनेक तरुणी फिदा होत्या. त्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे नावही होते. जाग उठा इंन्सान या चित्रपटात या दोघांनी एकत्र काम केले. येथेच त्यांचे प्रेम जुळले… त्यांनी लग्न केल्याचीही चर्चा होती. आई पर्वतों पे झुमती घटा… मै नाचू तू बन्सी बजा… या गाण्यामधून हे जोडपं अधिक जवळ आलं… दोघंही उत्तम डान्सर… मात्र त्यावेळी मिथून यांचे लग्न झाले होते. अभिनेत्री योगिता बाली यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तेव्हा दोन मुलंही होती. मिथूनदादा यांना हे लग्न मोडायचे नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीदेवीनं मिथून दादांना आपल्या आयुष्यातून दूर केल्याची चर्चा होती. अर्थात यापैकी कोणीही आपलं लग्न झाल्याची बातमी कधी सांगितली नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर ही बातमी आली तेवढ्याच लवकर गायबही झाली.
चित्रपटाबरोबर मिथून दादा यशस्वी उद्योजकही आहेत. मोनार्क ग्रुप या हॉटेल ग्रुपचे ते संस्थापक आहेत. 1990 मध्ये या अभिनेत्यांने काही काळ मुंबई सोडून उटीला आपले निवासस्थान बनवले. तिथे हा हॉटेल व्यवसाय चालू केला. त्यातही ते यशस्वी झाले. 1994 ते 1999 या पाच वर्षात देशातील सर्वाधिक कर देणा-या उद्योजकांमध्ये मिथून चक्रवर्ती या नावाचाही समावेश होता.
व्यवसायिक म्हणून यशस्वी झालेले मिथून दादा 2005 मध्ये पुन्हा बॉलिवूडमध्ये आले. आता या अभिनेत्यांनं स्वतःची स्टाईलच बदलली होती. ऐलान हा त्यांचा कमबॅकनंतरचा पहिला चित्रपट फार चालाल नाही. पण त्यानंतर लकीः नो टाईम फॉर लव, चिंगारी आणि गुरु सारख्या चित्रपटांतून मिथूनदा म्हणजे काय हे समीकरण नव्या पिढीलाही समजू लागलं. 2008 मध्ये या अभिनेत्याचे चार चित्रपट पडद्यावर आले. माय नेम इज अॅथंनी गोंजाल्विज, डॉन मुत्थु स्वामी, सी कंपनी, हिरोज..यांचा समावेश आहे. त्यानंतर मिथूनदा युवराज, चांदनी चौक टू चाईना, वीर, ओ माय गॉड, वेलकम 2 सारख्या चित्रपटात दिसले. या सर्व चित्रपटात दादांनी आपली छाप पाडली. याशिवाय हा अभिनेता छोट्या पडद्यावरही तेवढाच गाजत होता. डांन्स इंडिया डान्स आणि डान्स बांगला डान्स या शोमध्ये मिथूनदा जजच्या भूमिकेत होते. या अभिनेत्यानं खेळाला आणि खेळाडूंनाही तेवढंच प्रोत्साहन दिलं आहे. बंगाल फूटबॉल लीगच्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
आपल्या भुमिकांमध्ये अनेक छटा असणा-या या अभिनेत्याला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर, स्टार स्क्रीन पुरस्कार, स्टारडस्ट पुरस्कार, बंगाल फिल्म पत्रकार संघ पुरस्कार आदींचा समावेश आहे. मिथूनदा मात्र कुठल्याही पुरस्कारानं कधी भारावले नाहीत. की बदलले नाहीत. त्यांच्या हॉटेलग्रुपमध्ये त्यांनी अनेक गरजवंताना रोजगार मिळवून दिला. अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते मदत करतात. काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलातात. आपण ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीला ते कधी विसरले नाहीत. आजही डान्स इंडीयाच्या शो मध्ये हा कलाकर नवोदितांबरोबर जेव्हा नाचतो तेव्हा त्याचे चाहते म्हणतात… भालो दादा… खूब भालो….