प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे या टॉप ५ वेबसीरिजच्या पुढच्या सिझनची!
गेल्या काही वर्षात आलेल्या वेबसिरीज इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की, त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पण आता प्रेक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण चालू वर्षात हे ‘सिझन’ प्रदर्शित होणार आहेत. अर्थात सर्वच वेबसिरिजच्या सीझनच्या अधिकृत तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी साधारण याच तारखांच्या आसपास हे सिझन प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया वेबसिरीजच्या बहुचर्चित सीझन्सबद्दल. (Most Awaited Hindi Web Series)
१. मिर्झापूर ३
प्रेक्षकांना सर्वात जास्त उत्सुकता आहे ती अमेझॉन प्राईम वरच्या मिर्झापूर या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनची. मिर्झापूरचा पहिला सिझन नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये दुसरा सिझन प्रदर्शित करण्यात आला होता. खरंतर याचवर्षी मार्चपर्यत तिसरा सिझन येणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही.
मिर्झापूरच्या गादीवर कोण बसणार? कालीन भैय्याचं काय होणार? दद्गा त्यागी, बिना त्रिपाठी आणि शरद शुक्ला आता कोणती खेळी खेळणार? दुसऱ्या सीझनच्या शेवटी निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी प्रेक्षकांना ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. (Most Awaited Hindi Web Series)
२. पंचायत २
या लिस्टमध्ये दुसरी वेबसिरीज आहे ती अमेझॉन प्राईम वरची पंचायत ही वेबसिरीज. एप्रिल २०२० मध्ये प्रदर्शित झालेली ही कॉमेडी- ड्रामा प्रकारातील साधं कथानक असणारी वेबसिरीज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अभिषेक नावाचा इंजिनिअर मुलगा मनासारखी नोकरी न मिळाल्यामुळे एका दुर्गम खेड्यात जाऊन तेथील पंचायतीमध्ये नोकरी करतो. या काम दरम्यान त्याला आलेले अनुभव आणि समस्या कथेमध्ये अधोरेखित करण्यात आल्या होत्या.
आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती अभिषेकचा पुढचा प्रवास पाहण्याची. ही वेबसिरीज २० मे २०२२ म्हणजे याच महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय.
३. ब्रीद सीझन 3
अमेझॉन प्राइम वरील या सायको थ्रिलर मालिकेमध्ये अभिषेक बच्चन, नित्या मेनन आणि अमित साध प्रमुख भूमिकेत आहेत. तिसर्या सीझनमध्येही हेच कलाकार कायम असू शकतील. ओटीटी प्लॅटफॉर्म व निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीखही अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नसली, तरी ऑक्टोबर २०२२ च्या अखेरपर्यंत तिसरा सिझन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या सीझनमध्ये नक्की काय होणार? अविनाश पूर्णपणे बरा होणार की काही नवीन अनपेक्षित घटनांची श्रुंखला बघायला मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मात्र प्रेक्षकांना वाट बघावी लागणार आहे.
४. असुर २
वूट (Voot) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मार्च २०२० मध्ये प्रदर्शित झालेली ‘असुर’ ही क्राईम थ्रिलर वेबसिरीज असून याचं कथानक काही धार्मिक गोष्टींशी संबंधित आहे. यामध्ये अर्शद वारसी, वरुण सोबती, शरीब हाश्मी आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
=====
हे देखील वाचा – आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज
=====
खरा असुर कोण? या उत्कंठावर्धक वळणावर संपलेल्या सिझन १ नंतर प्रेक्षक याच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट बघतायत. निर्मात्यांकडून दुसऱ्या सिझनची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी या वर्षअखेरीस दुसरा सिझन प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. (Most Awaited Hindi Web Series)
५. स्कॅम २००३ – द क्युरीअस केस ऑफ अब्दुल करीम तेलगी
भारतीय वेबसिरीजमध्ये टॉपला असणारी वेबसिरीज म्हणजे स्कॅम ९२. ऑक्टोबर २०२० मध्ये सोनी liv या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ही वेबसिरीज हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित होती. यामध्ये प्रतीक गांधी या कलाकाराने साकारलेल्या हर्षद मेहताच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्याच्यासोबत श्रेया धन्वंथर, अंजली भानोत, हेमंत खेर, चिराग व्होरा, सतीश कौशिक, इ कलाकार मुख्य भूमिकेत होते. (Most Awaited Hindi Web Series)
स्कॅमच्या या सिरीजमध्ये दुसरा सिझन अब्दुल करीम तेलगी स्कॅमवर आधारित असणार ही घोषणा झाल्यापासून प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु या वेबसिरिजच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जरी जाहीर करण्यात आली नसली तरी ही सिरीज या वर्षअखेरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.