
Motilal : विस्मृतीत गेलेला गुणी अभिनेता
भारतीय चित्रपट सृष्टीत सुरुवातीच्या काळात रंगभूमीवरून आलेल्या कलावंतांची विशेष उपस्थिती होती. या कलावंतांच्या अभिनयाचा काही प्रश्न नव्हता पण त्यांचा डायलॉग डिलिव्हरीचा सेन्स काहीसा नाटकी होता रंगभूमीवर असताना आपला आवाज शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचण्यासाठी त्यांना मोठ्यांनी बोलावे लागे. अभिनयातील अधिकचा ‘मेलोड्रामा’ येईल याची दक्षता घ्यावी लागेल, पण या सर्व गदारोळात ‘नैसर्गिक अभिनय’ ही महत्वाची बाब मागे पडली होती. या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयाला रुपेरी पडद्यावर सुरुवातीला ज्या अभिनेत्याने साकारलेले तो अभिनेता म्हणजे मोतीलाल (Motilal) !

त्याच्या अभिनयात सहजता होती बोलण्यात कमालीचा नैसर्गिकपणा होता. तो अभिनय करतोय असं कधीच वाटायचं नाही इतका जिवंत आणि रसरशीत अभिनय करणारा कलावंत त्याकाळी दुसरा कोणी नव्हताच! बिमल रॉय यांच्या ‘देवदास’ (१९५५) या चित्रपटात त्याने दिलीप कुमार (Dilip Kumar) चा समोर चुन्नीलाल उभा केला होता. आज साठ वर्षानंतर ही ‘देवदास’ प्रमाणेच रसिक चुन्नीलाल देखील विसरले नाहीत. Hrishikesh Mukherjee यांच्या ‘अनाडी’ (१९५९) चित्रपटात अभिनेता राज कपूरसमोर तोडीस तोड अभिनय करत त्याने बाजी मारली. बिमल रॉय यांच्या लोकशाहीवर उपहास गर्भ टीका करणाऱ्या ‘परख’ या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आज इतक्या वर्षांनंतर जेव्हा मोतीलाल (Motilal) यांचे चित्रपट त्यांचा अभिनय आपण पाहतो त्यावेळी त्यांच्या अभिनयातील सहजता पाहून हरखून जातो.

मोतीलाल (Motilal) यांचे वैयक्तिक आयुष्य खूप वेगळे होते ‘लिव्ह लाइफ किंग साइज’ असा त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. उंची गाड्या, महागडे विमान प्रवास, रेस, जुगार, स्त्रिया असे नवाबी शौक त्यांना होते. अभिनेत्री नादिरा, शोभना समर्थ यांच्या सोबत त्याने खुले आम अफेयर केले. मिळालेल्या प्रत्येक पैसा न पैसा शानो शौकतमध्ये उडवून टाकण्याची मस्ती त्यांच्यात होती.
Raj kapoor चा ‘जागते रहो’ (१९५६) या चित्रपटात मोतीलाल (Motilal) एका श्रीमंत दारुड्याची भूमिका केली होती यात त्याच्यावर ‘जिंदगी ख्वाब है बाबू मै झूठ है क्या और भला सच है क्या‘ हे गीत चित्रित केलं होतं. मोतीलालच्या आयुष्याकडे पाहिल्यावर या ओळी किती सार्थ वाटतात. अतिशय बेदरकारपणे ते आयुष्य जगले; स्वत: च्या मस्तीत जगले मर्जीत. त्यामुळे अनेक दंतकथांचे ते नायक ठरले.
पंतप्रधान नेहरू एकदा त्यांना एका कार्यक्रमात भेटले त्यावेळी नेहरुंनी मोतीलाल (Motilal) यांना विचारले ‘जंटल मन मे आय नो युवर नेम प्लीज‘ दुसऱ्या कुणाला हा गौरव वाटला असता पण यावर मोतीलालने उत्तर काय द्यावे ? तो म्हणाला ’सर माझ्या बोलण्याचा तुम्हाला कदाचित राग येईल पण एकतर तुम्ही सिनेमे पाहत नसणार त्यामुळे तुम्हाला माझे नाव माहित नाही आणि दुसरे म्हणजे तुमच्या वडलांचे आणि माझे नाव एकाच आहे!’

‘आयुष्याच्या अखेरीस त्यांनी छोटी छोटी बाते हा चित्रपट निर्माण केला याचे दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले होते पण हा चित्रपट बनवता बनवता ते पार कफल्लक बनले. जिंदगीची काय गंमत असते पाहा ज्या Mukesh च्या पहिल्या गीताने त्याला नाव मिळवून दिलं ते गीत होतं ‘दिल जलता है तो जलने दे‘ हे गाणं मोतीलालवर चित्रित झालं होतं. हे गीत मुकेशने गावे याचा आग्रह स्वत: मोतीलाल (Motilal) ने संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडे केल्याने ते गीत मुकेश गाऊ शकला. मुकेश मोतीलालचे हे ऋण कधी विसरला नाही.
============
हे देखील वाचा : B. R. Chopra : बी आर चोप्रा यांच्या अनुभवातून तयार झालं ‘हे’ गाण !
============
Motilal च्या शेवटच्या चित्रपटाला पूर्ण करण्याची जबाबदारी मुकेश घेतली आपल्या कलंदर पण कफल्लक मित्राला मुकेशने अखेर पर्यंत साथ दिली. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोतीलालचे निधन झाले या चित्रपटाला पुढे राष्ट्रपतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ज्या ज्या वेळी सहज सुंदर नैसर्गिक अभिनयाची चर्चा होईल त्यावेळी मोतीलाल (Motilal) चे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल यात तिळमात्र शंका नाही!