पडद्यावरचे ९/११
अमेरिकेचे ट्विन्स टॉवर अल कायदा या दहशवादी संघटनेने उद्धस्त केले, त्याला एकोणीस वर्ष पूर्ण होत आहेत. ९/११…म्हणून हा हल्ला ओळखला गेला. अनेक निष्पाप अमेरिकन नागरिक या हल्ल्यात मारले गेले. पैशात मोजले जाणार नाही, एवढे नुकसान अमेरिकेला सहन करावे लागले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आर्थिक महासत्ता म्हणून गौरविलेल्या अमेरिकेच्या ह्दयावरच हा हल्ला होता. अमेरिकेनं यथावकाश या हल्ल्याचा बदला घेतला. पण ९/११….ची जखम मात्र कायम राहीली आणि रहाणार….या दहशतवादी हल्ल्याचे अनेक परिणाम झाले. आर्थिक, सामाजिक आणि राजकीयही. अगदी हल्ला झाल्यावर अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात परिणाम झाला. एरवी बेफिकीर जीवन जगणारे अमेरिकन नागरिक प्रचंड धास्तावले. आपण सुरक्षित आहोत की नाही, या प्रश्नानं पछाडले गेले. यातूनच अनेक आशियायी नागरिकांवर अमेरिकेत हल्ले झाले. अनेकांची दुकानं लुटली गेली. अनेकांच्या नोकरीवर गदा आली. अर्थातच या सर्वांपासून चित्रपट दूर राहू शकले नाहीत. ९/११ नंतर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटही आले. काही चित्रपटात ९/११च्या हल्ल्याची पार्श्वभूमी होती. तर काहीमध्ये प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हाची कथा मांडण्यात आली. काही चित्रपट हल्ला झाल्यानंतर बदलेल्या समाजमनावर काढण्यात आले. ट्विन्स टॉवर या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा पडद्यावर आले. ९/११ च्या हल्ल्यातील भयानकता…त्यामागची अतिरेक्यांची मानसिकता…या हल्ल्यासाठी ज्या नागरिकांना विमानात ओलीस ठेवण्यात आले होते, त्यांची मानसिकता आणि हल्ला झाल्यानंतर अमेरिकन माणसाची मानसिकता….हा चित्रपटासाठी मोठा विषय होता. हॉलिवूडमध्ये तर ९/११ नंतर अशा चित्रपटांची लाटच आली. आपलं बॉलिवूडही काही मागे नाही….बॉलिवूडमध्येही ९/११ च्या हल्ल्यावर चित्रपट काढण्यात आले. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे फॅरेनहाइट हा अमेरिकन माहितीपट. मायकेल मूर या माहितीपटाचे दिग्दर्शक आणि निर्मातेही. त्यांनीच यात मुख्य भूमिका केली आहे. २००४ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाला महोत्सवाचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आत्तापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा माहितीपट म्हणून फॅरेनहाइटची नोंद आहे.
द फ्लाईट दॅट फॉट बॅक ही अशीच एक डॉक्युमेंन्ट्ररी फिल्म ९/११ च्या हल्यावर करण्यात आली. ९/११ च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त ही डॉक्युमेंन्ट्ररी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचे कौतुक झाले. वर्ल्ड ट्रेड सेंटर हा ओलिवर स्टोन यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला. दोन पोलीस अधिकारी वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या ठिगा-याखाली सापडतात. त्यांची कथा या चित्रपटात आहे. निकोलस केज, माइकेल पेना, मारिया बेलो आणि मैगी ग्लिनहाल हे कलाकार या चित्रटात प्रमुख भूमिकेत आहेत. इनसाइड द ट्विन टॉवर्स हा असाच एक उत्कृष्ट चित्रपट. रिचर्ड डेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ९/११ पासून ओसामा बीन लादेन प्रत्येक अमेरिकन नागरिकांसाठी खलनायक ठरला. याच ओसामावर आधारीत चित्रपट म्हणजे जीरो डार्क थर्टी. 2012 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. ९/११ नंतर ओसमा बिन लादेनच्या आयुष्य कसे बदलले. आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे स्थान, आदीवर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, तरीही या चित्रपटाच्या कथेवरुन अनेक वाद झाले होते. मात्र त्यातील ओसामाला मारण्यात आले तो प्रसंग हुबेहुब असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मोठ्याप्रमाणात मिळाली.
१३ आवर्स: द सीक्रेट सोल्जर्स ऑफ बेन्गाजी हा अमेरिकेची सैन्य ताकद दाखवणारा चित्रपट. मायकल बे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक. ९/११च्या हल्ल्याच्या वेळी सुरक्षाव्यवस्थेचे काम करणा-या ६ जवानांना घेऊन बे यांनी हा चित्रपट केलाय.
युनायटेड हा बायोग्राफिकल ड्रामा-थ्रिलर आणि पहाण्यासारखा चित्रपट. पॉल ग्रीनग्रास हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ९/११ च्या हल्यात अनेक विमान प्रवासी मारले गेले. याच प्रवाशांच्या कुटुंबियांच्या सहकार्यांने हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरातील ट्रीबिका फिल्म फेस्टिव्हलमध्ये २६ एप्रिल २००६ रोजी यूनाइटेड ९३ चा प्रीमियर झाला. त्यावेळी ९/११ च्या हल्ल्यावेळी जी विमानं वापरण्यात आली होती, त्यातील प्रवास करणार्या प्रवाशांच्या अनेक कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. बॉक्सऑफीसवरही हा चित्रपट यशस्वी ठरला.
याच प्रवाहातील वर्ल्ड ट्रेड सेंटर हा आणखी एक चित्रपट. ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित चित्रपटात निकोलस केज, मारिया बेलो, मायकेल पेना, मॅगी गिलेनेहल, स्टीफन डॉर्फ आणि मायकेल शॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटानंही बॉक्सऑफीसवर चांगलंच यश संपादन केलं. ९/११ हल्ल्याची पार्श्वभूमी असणारा रिमेंबर मी हा कूटर दिग्दर्शीत चित्रपट. त्यात रॉबर्ट पॅटिनसन, एमिली डी रविन, ख्रिस कूपर, लेना ओलीन आणि पियर्स ब्रॉस्नन यांच्या प्रमुक भूमिका आहेत.
हॉलिवूडमध्ये ९/११ वर अनेक चित्रपट येत असतांना बॉलिवूडमध्येही ९/११ चा परिणाम होता. माई नेम इज खान हा शहारुख खान चा चित्रपट याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आलेला. ९/११ नंतर अमेरिकेत मुसलमानांकडे संशयीत नजरेने पहू लागले होते. त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. याशिवाय कतरीना कैफ, निल नितीन मुकेश आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. ९/११ नंतर बदलेले सामाजिक वातावरण यावर चित्रपटाची कथा आधारीत आहे.
अमेरिकेच्या ट्विन्स टॉवरचे अस्तित्व ९/११ च्या हल्ल्यानं पुसून टाकण्यात आले. आता त्याजागी स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र हे ट्विन्स टॉवर अमेरिकन नागरिकांच्या मनात कामय रहाणार आहेत. या घटनेला आता १९ वर्ष झाली. या वर्षात तेवढेच चित्रपट या घटनेवर काढण्यात आले. आणि यापुढेही काढण्यात येतील…