Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Manache Shlok Poster: ‘मना’चे श्लोक’मधून मृण्मयी देशपांडेचे निर्मिती क्षेत्रात पाऊल; सिनेमाचे अनोखे पोस्टर झाले लॉन्च !
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असलेला चित्रपट म्हणजे ‘मना’चे श्लोक’. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत झळकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे, कारण चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या मृण्मयी आणि राहुलच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांची केमिस्ट्री – या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. ‘श्लोक’ म्हणजे नक्की कोण? मृण्मयीच्या भूमिकेचा त्याच्याशी काय संबंध आहे? त्यांचं नातं प्रेमाचं की संघर्षाचं? लग्न, संबंध, मतभेद – नेमकं काय घडतंय? या प्रश्नांची उत्तरं लवकरच सिनेप्रेमींना मिळणार आहेत. या रोमँटिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथानकात मृण्मयी देशपांडे सोबत राहुल, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांसारखे लोकप्रिय चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.(Manache Shlok Movie Poster)

या चित्रपटाबाबत दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे सांगते, ‘मना’चे श्लोक’ ही कथा आहे मनवा आणि श्लोक या दोन पात्रांची त्यांच्या नात्यातून, संवादातून आणि वागण्यातून प्रेक्षकांना स्वतःचंच प्रतिबिंब दिसेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नात्यांमधील गुंतागुंत, आणि विशेषतः लग्नासारख्या विषयावर असणारी व्यक्तिनिष्ठ मतं ही सगळी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे आपल्याला भिडलेली असतात.” ती पुढे म्हणते, “कधी ठाम, तर कधी गोंधळलेली मतं – ही सगळ्यांचीच कथा असते. काहीजण आधीच हे सगळं जगलेले असतात, तर काहीजण ते लवकरच अनुभवतात. मी सध्या काहीही स्पॉईल करणार नाही, पण एवढं नक्की सांगते, चित्रपट पाहताना प्रेक्षक नक्की हसतील आणि मनात म्हणतील, ‘अरे, हे तर अगदी माझं आयुष्य वाटतंय!’ ’ म्हणूनच हे ‘मना’चे श्लोक म्हणजे तुमच्याच मनातले विचार आहेत.’’

गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स प्रस्तुत, नितीन वैद्य प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने येणारा ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला १ ऑगस्ट रोजी येत आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटाबाबत निर्माते संजय दावरा आपल्या भावना व्यक्त करत म्हणतात, “मराठी चित्रपटसृष्टीत हा माझा पहिलाच अनुभव आहे. आणि ‘मना’चे श्लोक’सारख्या वेगळ्या, नाजूक आणि अर्थपूर्ण विषयातून सुरुवात होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे.”(Manache Shlok Movie Poster)
=============================
=============================
सह-निर्माते श्रेयश जाधव चित्रपटाबाबत सांगतात, “या चित्रपटात प्रेक्षकांना काहीतरी नवीन, वेगळं बघायला मिळणार आहे. मृण्मयीचं दिग्दर्शन आणि ती गोष्टी बघण्याचा तिचा खास दृष्टिकोन या सगळ्यामुळे ही कथा प्रत्येकाच्या मनाला भिडणारी ठरणार आहे. प्रेक्षक निश्चितच स्वतःला या पात्रांमध्ये शोधतील.”