‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुछे हो तो नथ्थुलाल जैसी.. वरना ना हो…
आपल्याकडे हिंदी सिनेमाचा पगडा इथल्या पब्लिकवर इतका जबरदस्त असायचा की सिनेमातील कलाकारांना प्रेक्षक त्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखायची. ‘शोले’तील मॅक मोहनला आयुष्यभर लोक ‘सांभा’ म्हणूनच ओळखायचे तर राजेंद्रनाथ या कॉमेडीयनला सर्वजण पोपटलाल या नावाने ओळखायचे. असाच काहीसा प्रकार कॉमेडियन मुक्री (Mukri) यांच्या बाबत झाला ‘अमर अकबर अँथनी’ या सिनेमातील मुक्री यांनी साकारलेला तय्यब अली इतका फेमस झाला की लोक मुक्रीला तय्यब अली म्हणूनच ओळखू लागले.
नंतर १९८४ साली अमिताभ बच्चन यांचा ‘शराबी’ हा चित्रपट आला होता. यात मुक्री (Mukri) यांनी नथ्थुलालची भूमिका केली होती. त्याच्या मोठ्या मोठ्या मिशांना पाहून अमिताभ बच्चन म्हणतो ‘मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो…’ हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला होता की लोक मुक्रीला आता नथ्थुलाल या नावाने ओळखू लागले. अभिनेता मुक्री खरंतर दिसायला अतिशय सामान्य. बुटबैगण. उंची जेमतेम साडेचार फूट. पण या सर्व उणीवांवर मात करत त्यांनी तब्बल सहाशे सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका केल्या ! अर्थात या सर्व भूमिका तशा एकसारख्या साचेबद्धच होत्या. पण १९४४ पासून १९९५ पर्यंत तब्बल पन्नास वर्षे हिंदी सिनेमांमध्ये मुक्री टिकून होते.
मुक्री यांना हिंदी सिनेमांमध्ये ब्रेक देण्यासाठी त्यांच्या एका मित्राची खूप मोठी मदत झाली होती. या मित्रासोबतच ते मुंबईच्या अंजुमान ए इस्लाम या शैक्षणिक संस्थेत शिकत होते. दोघांनाही नाटकाची आवड होती. पण घरची परिस्थिती दोघांची ही चांगली नव्हती. त्यामुळे शाळेनंतर या दोघांचे मार्ग वेगळे झाले! मुक्री (Mukri) यांचा हा मित्र म्हणजे अभिनेता दिलीप कुमार! दिलीप कुमार यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमामध्ये मुक्री यांची भूमिका असायचीच. इतकी या दोघांची घट्ट मैत्री होती. दिलीप कुमार (युसुफ खान) सिनेमात येण्यापूर्वी फळांचा व्यापार करत असे तर मुक्री एका मदरशामध्ये लहान मुलांना कुराण शिकवत असे . नंतर एका मशिदीमध्ये ते काझी पण झाले होते.
१९४४ साली दिलीप कुमार यांना देविका रानी यांनी बॉम्बे टॉकीजमध्ये घेतले आणि ‘ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एकदा दिलीप कुमार आणि मुक्री (Mukri) रमजानच्या महिन्यात एका मशिदीमध्ये परस्परांना भेटले. मुक्री तेव्हा करीत असलेल्या कामावर काही फारसे खुश नव्हते. त्यांनी आपल्या मित्राकडे दिलीप कुमारला मला देखील सिनेमात काम करायची इच्छा आहे असे सांगितले. दिलीप कुमार मुक्रीला घेऊन पुन्हा देविका रानी यांच्याकडे गेला.
देविका रानीने मुक्रीला प्रोडक्शन डिपार्टमेंटला ठेवले. त्याला लहानपणापासून करामती करायची सवय. चेहरा निरागस ठेवून सेटवर तो सगळ्यांना गमती जमती करून हसवत राहायचा. त्याची हीच शैली ओळखून बॉम्बे टॉकीजच्या ‘प्रतिमा’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका मिळाली. तिथून त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. दिलीप कुमार सोबतची त्यांची मैत्री त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम होती. दिलीप कुमार स्वतः दिग्दर्शकांकडे मुक्रीच्या (Mukri) नावाची शिफारस करत असे.
मुक्रीकडे (Mukri) कॉमिक सेन्स खूप चांगला होता. दंत विहीन मुखातून ते निरागसपणे जेव्हा पडद्यावर अवतरत तेव्हा थेटरमधून हास्याचा कडेलोट होत असे. एकदा सुनील दत्त यांच्या अजंता आर्टच्या कार्यक्रमात मुक्रीला स्टेजवर ढकलून माईकच्या समोर उभे केले. या कार्यक्रमाला काही परदेशी नागरिक देखील उपस्थित होते. मुक्रीला इंग्रजी अजिबात बोलता येत नव्हते. तरी त्यांनी वेळ मारून नेली आणि तुटक्या फुटक्या इंग्लिशमध्ये दोन तीन वाक्य बोलून त्याने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.
========
हे देखील वाचा : देखा है पहली बार साजन कि आंखो प्यार…..
========
योगायोगाने अमिताभ बच्चन देखील तिथे उपस्थित होते. त्यांना मुक्रीचा हा कॉमिक सेन्स आणि हे भाषण खूप आवडले. पुढे अमिताभ बच्चन यांनी मुक्रीची हीच स्टाईल उचलून ‘आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज…’ हि वाक्य ‘नामक हलाल’ सिनेमात वापरली. एकेकाळी शेख मुख्तार या धिप्पाड अभिनेत्या सोबत मुक्रीची चांगली जोडी जमली होती. भारतीय प्रेक्षकांना ते लॉरेल आणि हार्डी वाटत होते. सुनील दत्त, राजकपूर, दिलीप कुमार हे त्यांचे खास दोस्त होते. १९९४ सालच्या ‘बेताज बादशहा’ या चित्रपटानंतर त्यांनी सिनेमात काम करणे थांबवले. ४ सप्टेंबर २००० या दिवशी वयाच्या ७८ व्या वर्षी मुक्री त्यांचे निधन झाले.