Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!
अलीकडच्या १०-१२ वर्षांमध्ये मल्टी स्टार कास्ट असणारे बरेच मराठी-हिंदी चित्रपट रिलीज झाले. यात ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीती’, ‘हाऊसफुल्ल’, ‘सिंघम अगेन’ हे झाले हिंदीतले; मराठीत ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘धर्मवीर’, ‘फलक्लास दाभाडे’ असे चित्रपट आले. पण मल्टी स्टारर चित्रपट खरं तर ५०-६० वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत तयार केले जात आहेत. फरक फक्त इतकाच आहे की आता मल्टी स्टार कास्ट चित्रपट ही काळाची गरज झाली आहे आणि पूर्वी येणारे Multi Starrer चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी होती… काळाच्या ओघात Multi star Cast चित्रपट कसा बदलत गेला याचा थोडक्यात आढावा घेऊयात…(Indian cinema)

१९६५ साली आलेला ‘वक्त’ (Waqt) हा चित्रपट खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला मल्टी स्टार कास्ट चित्रपट मानला जातो. ज्यात राज कूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिला टागोर, बलराज सहानी, शशीकला आणि अचला सचजेव हे दिग्गज कलाकार होते. आता बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या यशाचं मोजमाप आता जरी बॉक्स ऑफिस कलेक्शनने मोजलं जात असलं तरी पूर्वीच्या काळी थिएटरमध्ये सर्वाधिक आठवडे टिकणारा चित्रपट हा ब्लॉकबस्टर ठरत होता. असंच काहीसं घडलं होतं पहिल्या मल्टी स्टार कास्ट चित्रपटाबद्दल. यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ चित्रपट ६०च्या दशकात सुपरहिट ठरला होता. ५ आठवड्यांपर्यंत ‘वक्त’ चित्रपट थिएटरमध्ये सुरु होता. शिवाय, मल्टी स्टार कास्ट चित्रपटांचा समाजावरही प्रभाव पडत असल्यामुळे समाजात कल्चरल बदल फार झाले होते. (Bollywood news)

तर मराठीत तसं पाहायला गेलं तर ‘सामना’ (Samana) हा चित्रपट बऱ्याच अॅंगलने महत्वाचा चित्रपट ठरला आहे. त्यात मल्टी स्टार कास्टमध्ये हा चित्रपट नक्कीच यायला हवा. कारण या चित्रपटातील प्रत्येक कलाकार आज जरी दिग्गज असले तरी त्यांचा तो पहिलाच चित्रपट होता. ज्यात निळू फुले, मोहन आगाशे, डॉ. श्रीराम लागू, स्मिता पाटील (Smita Patil) यांचा समावेश आहे. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा सामाजिक आणि राजकीय चेहरा-मोहराच बदलून टाकला होता. (Marathi multi star cast movie)

‘वक्त’ आणि ‘सामना’ चित्रपटानंतर हिंदी-मराठीत अनेक मल्टीस्टार कास्ट चित्रपट आले. ‘शोले’, ‘त्रिदेव’, ‘चायना गेट’, ‘बॉर्डर’, ‘खाकी’, ‘सिंहासन’ ‘श्वास’, ‘बिंधास्त’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘धडाकेबाज’, ‘झिम्मा’, ‘दुनियादारी’ असे अनेक चित्रपट आहे. आता मल्टीस्टार कास्ट चित्रपट म्हटलं की चित्रपटातील सगळ्याच कलाकारांना समान स्क्रिन स्पेस अपेक्षित असते. महत्वाचं म्हणजे पुर्वीच्या काळी आलेल्या मल्टी स्टार कास्ट चित्रपटांमधील प्रत्येक कलाकाराने आपला अभिनय चोख करत आपल्या सहकलाकाराच्या अभिनयालाही तितकाच वाव दिल्याचं दिसून आलं. म्हणजे ‘शोले’ (Sholay) चित्रपटाचं उदाहरण घ्यायचं झालं तर अमिताभ (Amitabh Bachchan) यांचे जरी चाहते असले तरी त्यांच्या अभिनयासमोर धर्मेंद्र, संजीव कूमार किंवा हेमा मालिनी यांचा अभिनय फिका पडला नाही.तर मराठीत ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाचं उदाहरण घ्यायचं झालं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांना सचिन, अशोक सराफ यांच्यासोबत निवेदिता सराफ आणि सुप्रिया यांनी देखील टफ फाईट अभिनयात नक्कीच दिली होती. आणि त्यामुळे संपूर्ण टीम म्हणून हा चित्रपट अजरामर झाला. (Marathi movies)

२००० किंवा २०१० पर्यंत मल्टी स्टार कास्ट चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक पर्वणी होती आणि निर्मात्यांच्या खिशाला परवडणारी कलाकृती देखील होती. मात्र, जसा काळ पुढे गेला तसं प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यासाठी म्हणून मल्टीस्टार कास्ट चित्रपट तयार केले जाऊ लागले. त्याचं उदाहरण म्हणजे मराठीत ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’ किंवा ‘अलीकडचा फसक्लास दाभाडे’. आणि हिंदीत म्हणायचं झालं तर ‘सिंघम’, ‘हाऊसफुल्ल’ किंवा ‘स्त्री’ सारखे चित्रपट. मात्र, आता आर्थिकदृष्ट्या मल्टी स्टारर चित्रपट निर्मात्यांना परवडणं जरा कठिण जातंय ही सत्य परिस्थिती नाकारता नक्कीच येत नाही. कारण, ओटीटीमुळे विभागलेला प्रेक्षक विविध भाषांमधील कंटेट घरबसल्या पाहतो आणि थिएटरकडे पार कमी वळतो परिणामी बॉक्स ऑफिस कलेक्शनच गणितच गंडतं.(Box office collection of movies)
================================
=================================
प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिएटरकडे आणण्यासाठी मल्टी स्टार कास्ट चित्रपट महत्वाचा आहेच आणि त्याच अनुशंगाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी काम करताना दिसतेय. किंबहुना सध्या एकच सुपरस्टार घेऊन चित्रपट तयार करण्याचा ट्रेण्डच नकळतपणे हरवला आहे आणि याकडे कुणाचंही फारसं लक्ष गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. येत्या काळात मराठीसह हिंदीत ‘राजा शिवाजी’, ‘दुनियादारी २’, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’, ‘हाऊसफुल्ल ५’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘किंग’ असे बरेच मल्टीस्टार कास्ट चित्रपट येणार आहेत. त्यामुळे सध्याचा भारतीय चित्रपटसृष्टीचा काळ हा सिंगल सुपरस्टार्सचा नसून मल्टी स्टार्सचा आहे असं नक्कीच म्हणावं लागेल.(Upcoming multistar cast movies of Bollywood)
रसिका शिंदे-पॉल