मुमताजची बॉलिवूडमधील इन्स्पायरिंग जर्नी…
बॉलीवूड मधील कलावंतांच्या स्ट्रगलच्या काळातील गोष्टी खूप इन्स्पायरिंग असतात. इन्स्पायरिंग शब्द याकरिता की, नंतर त्या कलावंताला खूप मोठे यश मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळातील संघर्ष त्याला ‘इन्स्पायरिंग स्ट्रगल’ असा वाटू लागतो. अभिनेत्री मुमताज हिने थोडी थोडी नव्हे तर तब्बल बारा वर्ष बॉलिवूडमध्ये स्ट्रगल केला. (Mumtaz)
तिच्यावर बी आणि सी ग्रेड सिनेमात काम करणारी अभिनेत्री असा शिक्का बसला होता. पण मोठ्या मेहनतीने आणि कर्तुत्वाने तिने तो ठसा पुसून टाकला आणि सत्तरच्या दशकातील ती आघाडीची अभिनेत्री बनली. या संघर्षाच्या काळात तिला अनेक अपमानाचे क्षण वाट्याला आले. पण या घटनांनी ती गांगरली अजिबात नाही किंवा तिने परिस्थितीपासून पळ देखील काढला नाही. अतिशय धीराने ती आपले पाय बॉलिवूडमध्ये टिकवून राहिली आणि सत्तरच्या दशकातील आघाडीची सुपरस्टारची नायिका बनली.
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पंधरा दिवस आधी म्हणजे ३१ जुलै १९४७ या दिवशी तिचा जन्म झाला. बालपणापासूनच तिच्या वाट्याला खडतर काळ आला कारण ती एक दोन वर्षाची असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि लहान वयातच तिला सिनेमाच्या दुनियेत यावं लागलं. वयाच्या अकराव्या वर्षी इस्मत चुगताई यांच्या ‘सोने की चिडिया’ या १९५८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून हिंदी सिनेमात प्रवेश केला. (Mumtaz)
नंतर अनेक सिनेमातून ते बालकलाकार म्हणून काम करत असताना. वयाच्या सोळाव्या वर्षी दारासिंग सोबत तिची जोडी जमली. मजबूत शरीरयष्टीच्या दारासिंगच्या सोबत कोवळी काकडी मुमताज प्रेक्षकांना आवडून गेली. तिने दारासिंग सोबत एक दोन नाहीतर तब्बल १६ सिनेमांमध्ये काम केले.
यामध्ये फौलाद , डाकू मंगलसिंग, टारझन कम्स टू दिल्ली, टारझन अँड किंग कॉंग, सन ऑफ हातिम ताई, सिकंदर ए आजम, हर्क्युलस, आंधी और तुफान, वीर भीमसेन, राका हे चित्रपट केले. या मारधाडीच्या सिनेमात तशी ती शोभेची बाहुलीचा असायची. पण तिने या भूमिका मोठ्या उत्साहात केल्या आणि बॉलीवूडमधील तिचा वावर ती वाढवत गेली. १९६५ सालच्या ‘ मेरे सनम’ या चित्रपटात ती सहाय्यक अभिनेत्री म्हणून चित्रपटात आली. (Mumtaz)
याच काळात व्ही शांताराम यांनी तिची निवड त्यांच्या ‘बूंद जो बन गई मोती..’ या चित्रपटासाठी मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी केली. या चित्रपटाचा नायक होता जितेंद्र. सिनेमाची नायिका मुमताज आहे हे पाहून त्याने काम करायला नकार दिला. शांताराम बापूंनी त्याला सांगितले,” तुला सिनेमा सोडायचा असेल तर खुशाल सोड. मी मुमताजला या सिनेमातून काढणार नाही. तिला मी निवडले आहे!” शांताराम बापूंनीच जितेंद्रला असेच एक्स्ट्रामधून मेन स्ट्रीम मध्ये आणले होते. बापूंचा शब्द त्याने पाळला आणि मुमताजला आता मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका मिळू लागल्या. याच काळात एक महत्त्वपूर्ण घटना घडली.
अभिनेते दिलीप कुमार यांनी आपल्या ‘राम और शाम’ या चित्रपटासाठी मुमताजला आपली नायिका म्हणून घेतले आणि तो मुमताजच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. कारण जेव्हा दिलीप कुमार सारखा अभिनेता तिला आपल्या चित्रपटात घेतो हे पाहिल्यानंतर तिच्याकडे पाहण्याचा बॉलिवूडचा दृष्टिकोन बदलला. (Mumtaz)
यानंतर १९७० साली तिला राज खोसला यांचा ‘दो रास्ते’ हा चित्रपट मिळाला आणि तिथून मुमताजचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला. या चित्रपटात तिचा नायक होता राजेश खन्ना. यातील चार गाणी तिच्यावर चित्रित झाली होती. त्यापैकी ‘बिंदिया चमकेगी’ हे गाणं तरी इतकं गाजलं की, त्या वर्षाच्या बिनाकाचं ते सरताज गीत ठरलं ! यानंतर संजीवकुमार सोबतच ‘खिलौना’ गाजला.
देव आनंदने तिला हरे रामा हरे कृष्णा, तेरे मेरे सपने या चित्रपटात नायिकेच्या भूमिका दिल्या. राजेश खन्ना सोबत मुमताजने तब्बल नऊ चित्रपट केले त्यापैकी सात चित्रपट सुपरहिट ठरले. १९६९ ते १९७४ हा काळ मुमताज साठी भरभराटीचा काळ होता. या काळातील तिचे जवळपास सर्व सिनेमे सुपरहिट ठरत होते. यामध्ये खिलौना, दुश्मन, धडकन, चोर मचाये शोर, आप की कसम, रोटी, लोफर, बंधे हाथ, रूप तेरा मस्ताना, अपना देश, अपराध हे सर्व ट सिनेमे हिट झाले. मनमोहन देसाई जेव्हा आपला ‘सच्चा झूठा’ हा सिनेमा बनवत होते त्यावेळी त्याचा नायक सुरुवातीला होता शशी कपूर. त्याने हा चित्रपट केवळ मुमताज नायिका आहे म्हणून सोडला. कारण मुमताजवळ तेव्हा ‘बी ग्रेड सिनेमाची नायिका म्हणून शिक्का बसला होता. शशी कपूरने तो सिनेमा सोडला आणि तिथे राजेश खन्ना आला, सिनेमा सुपरहिट झाला. (Mumtaz)
===========
हे देखील वाचा : महेश भट यांच्यासोबत भांडून अनुपम यांनी मिळवली भूमिका
===========
नियतीचा खेळ कसा असतो बघा ‘चोर मचाए शोर’ या चित्रपटासाठी शशी कपूरला आता नायिका म्हणून मुमताज हवी होती. त्याने तिला खास विनंती केली. परंतु तेव्हा मुमताज आघाडीचे अभिनेत्री होती. खूप मिन्नत वाऱ्या केल्यानंतर मुमताज (Mumtaz) ने तो सिनेमा साइन केला आणि सुपरहिट झाला. जो जितेंद्र तिला ‘बूंद जो बन गई मोती…’ या सिनेमातून काढून टाकत होता तोच जितेंद्र आता तिच्या सोबत काम करण्यासाठी तरसत होता. काळाचा महिमा आघात असतो तिथे कोण कधी कुठल्या पदावर जाईल काही सांगता येत नाही!