इचलकरंजी ते मुंबईचा सुरेल प्रवास
मायानगरी मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. स्वप्नांची मुंबई इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करते. फक्त धैर्य आणि हिंमत असली पाहिजे. मूळचा इचलकरंजीचा असणारा एक तरूण संगीत क्षेत्रात ‘काहीतरी’ करायचं असं ठरवून मुंबईला येतो. तबलावादक म्हणून आलेला हा तरूण चिकाटीने आणि प्रामाणिक प्रयत्न करत बासरीवादक, संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून हळूहळू आपलं नाव प्रस्थापित करतो. या संगीतवेड्या तरूणाचं नाव आहे प्रणव हरिदास. इचलकरंजी ते मुंबई हा त्याचा सांगितिक प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
प्रणव लहानपणी अभ्यासाच्या कमी आणि गाण्याच्या, पेटीवादनाच्या, तबलावादनाच्या क्लासेसना जास्त जायचा. गिरीश कुलकर्णी, जितेंद्र कुलकर्णी यांच्या सारख्या संगीत गुरूंबरोबरच प्रणवचे बाबा सतार वाजवत असल्याने त्याच्या आवडींना पोषक असं सांगितिक वातावरण घरातच होतं. आणि अर्थात आई-वडीलांनीदेखील त्याची आवड कुठलीही आडकाठी न करता लहानपणापासून कायम जोपासली. १२ वी सायन्सची परीक्षा देऊन प्रणवने कलांगण संस्थेच्या संस्थापिका वर्षा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली थेट मुंबई गाठली. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजमध्ये आर्टसला प्रवेश घेऊन प्रणवच्या संगीत क्षेत्रातील करिअरची खर्या अर्थाने सुरूवात झाली. एव्हाना रुपारेल कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी ( कमलेश भडकमकर, अजित परब, कौशल इनामदार ) संगीत क्षेत्रातले नामवंत कलाकार झाले होते. मग त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत रुपारेल कॉलेजमधील ‘स्वरसाधना’ या संगीत ग्रुपच्या माध्यमातून कॉलेजमधील तीन वर्ष असंख्य कार्यक्रम, स्पर्धा, युथ फेस्टिवल यांमुळे भरभरून गेली. याच काळात प्रणवने बासरी हे वाद्य वाजवायला सुरुवात केली.
शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यानंतर रुपारेल कॉलेजच्या हॉस्टेल मधून प्रणव डोंबिवली येथे वास्तव्यास आला. ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रणव ‘बी हाय ग्रेड’चा मान्यताप्राप्त कलाकार आहे. एन. सी. पी. ए. येथील शाळांमध्ये संगीतशिक्षक म्हणून तो काही वर्ष नोकरी करत होता. पण नोकरीतील बंधनांमुळे त्याच्या आवडीचं काम करायला वेळ मिळत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. दरम्यान वर्षा भावे आणि कमलेश भडकमकर यांच्यामुळे अनेक मोठ्या कलाकारांशी, वादकांशी प्रणवचा परिचय झाला.
आपल्यातल्या संगीतकाराची सुरूवात वर्षा मावशीच्या विविध कँपमध्ये झाल्याचं प्रणव आवर्जून सांगतो. संगीत संयोजक म्हणून काम करायला सुरुवात करत असताना कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, विनय राजवाडे, अमित पाध्ये या कलाकारांची खूप मदत झाल्याचे तो सांगतो. प्रणव बासरीवादक म्हणून नावारूपाला येण्याचं श्रेय तबला वादक आणि आयोजक अमेय ठाकूरदेसाई यांना देतो. अनेक सिंगल गाण्यांबरोबर अजित परब यांच्याबरोबर ‘सोयरे सकळ’ आणि नुकत्याच झालेल्या ‘मोगरा’ या नाटकाचं पार्श्वसंगीत आणि संगीत संयोजन, कथ्थक नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्या ‘हे नदे सरिते’ ही नृत्यनाटिकेचे संगीत, कथ्थक नृत्यांगना डॉ. वृषाली दाबके यांच्या ‘मेघ’ नृत्यनाटिकेचे संगीत आणि संगीत संयोजन, ‘शेक्सपिअर गेला उडत’ या नाटकाचं पार्श्वसंगीत, दूरदर्शनवरील विविधांगी कार्यक्रम यामुळे अनुभवाची शिदोरी हळूहळू जमा होत असल्याचे प्रणव सांगतो.
विविध कार्यक्रमात वाजवत असताना निरीक्षणातून प्रणव अनेक गोष्टी शिकला. एखादं वाद्य कसं वाजत, त्याचा वापर कुठल्या गाण्यात कसा केला जातो किंवा संगीत संयोजन म्हणजे नेमकं काय याचा बारकाईनं त्याने अभ्यास केला. हळूहळू शिकत, एक – एक गाणं करत दोन वर्षांपूर्वी प्रणवने संगीतबद्ध केलेली तीन तर त्याचं संगीत संयोजन असलेल्या ८ गाण्यांचा ‘दोन किनारे दोघे आपण’ हा अल्बम प्रकाशित झाला. आजपर्यंत प्रणवने संगीत आणि संगीत संयोजन केलेली गाणी रविंद्र साठे, पं. संजीव चिम्मलगी, ह्रषीकेश रानडे, शेखर रावजीयानी, आर्या आंबेकर, अनुजा वर्तक, मंदार आपटे अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत. तर पं. सुरेश वाडकर, श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर, बेला शेंड्ये, स्वप्नील बांदोडकर अशा नामवंत गायकांना बासरीवादक म्हणून प्रणवने साथ केली आहे.
आपल्या पी. आर. क्रिएशन्स या संस्थेद्वारे नवोदित कलाकारांसाठी प्रणवने हक्काचं व्यासपीठ तयार केलं. याच नावाने असलेल्या त्याच्या युट्युब चॅनेलवर त्याच्या गाण्यांचे व्हिडिओ बनवून विविध सांगितिक प्रयोग तो करत असतो. या क्षेत्रात वावरत असताना अनेक चांगले – वाईट अनुभव त्याला आले. पण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकल्याचे तो सांगतो. ‘माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या माणसांमुळे, आई-वडील, माझे सगळे गुरू, नातेवाइक यांच्या आशीर्वादामुळे त्याचबरोबर सगळ्या वादक साथीदारांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आत्तापर्यंतचा हा प्रवास काहीसा सुखद झाला. ही तर सुरुवात आहे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. आजकालची पिढी चांगली गाणी करत नाही असा सर्वसाधारण रसिकांचा समज असला तरी आमची पिढीदेखील खळे काका, बाबूजी यांचीच गाणी ऐकत मोठी झाल्याने त्यांच्याच संगीताचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आमची नवी गाणी एकदा तरी ऐकून बघा. चुका सांगा त्यावर आम्ही नक्कीच विचार करू, बदल करू.’, असे प्रणव सांगतो.
प्रणवच्या पुढील संपूर्ण सांगितिक वाटचालीला कलाकृती मिडीयाकडून हार्दिक शुभेच्छा !
- गौरी भिडे