‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अभिनयाचा छंद जडलेला कलाकार
इश्किया मिजाज….
उम्र को अगर हराना है तो,
शौक जिंदा रखिए
घुटने चलें या न चलें
मन उडता परिंदा रखिए
हा शेर नसीरुद्दीन शहा या अभिनेत्याला अगदी चपखल बसतोय. वयाची सत्तरी ओलांडणारे नसीरुद्दीन शहा त्यांच्या एका छंदामुळेच तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात कायम असतात. त्यांनीही छंद म्हणजेच शौक आहे. तो आहे अभिनयचा. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नसीरुद्दीन यांचे योगदान अनमोल आहे. फक्त व्यावसायिक चित्रपटात अभिनय करुन लाखो रुपये कमावण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. पहिल्यापासून पठडीबाहेरच्या समांतर चित्रपटांमध्ये नसीरुद्दीन यांनी भूमिका केल्या.
या चित्रपटांना चांगले दिवस आणले ते त्यांच्या अजोड अभिनयामुळेच. शेक्सपियअरचा एक ड्रामा त्यांनी शाळेत केला होता. केवळ या एका नाट्यप्रयोगानं त्यांना त्यांचं भविष्य कशात आहे, हे समजलं. तिथपासून सुरु झालेला पाठपुरावा दिल्ली, पुणे या वाटेवरुन मुंबई पर्यंत आला. एक बारीकसा, बुटका मुलगा अभिनेता म्हणून कसा स्विकारला जाईल. पण हा नसीरुद्दीन कसलेले अभिनेते निघाले. जिद्द, चिकाटी आणि उपजत अभिनय या जोरावर हा सत्तरीचा युवा अद्यापही इश्किया म्हणून चाहत्यांना मोहात पाडत आहे.
नसीरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) जन्म उत्तरप्रदेशमधील बारांबाकी मध्ये झाला. अमजेर आणि नैनीताल मध्ये त्यांचे शिक्षण झालं. शाळेमध्ये मर्चंट ऑफ व्हेनिस या शेक्सपिअरच्या एका कथेवर नाटक झालं. त्यात नसीरुद्दीन यांनी भाग घेतला. यातून आपण उत्तम अभिनेते होऊ शकतो हे त्यांनी जाणलं. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी अलिगढ विद्यापठात पुढचं शिक्षण घेतलं. नंतर दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्युटमध्येही नसीरुद्दीन यांनी प्रवेश घेतला. तिथेच त्यांची ओमपुरी बरोबर ओळख झाली. हे दोघं नंतर जिगरी दोस्त झाले.
अभिनेता म्हणून अभिनयाचे किती गुण आहेत यापेक्षा ती व्यक्ती कशी दिसते याला महत्त्व देण्यात येतं. नसीरुद्दीन यांनाही या पद्धतीचा फटका बसला. अभिनेते म्हणून ते परिपूर्ण होते. पण सुरुवातीला त्यांना कोणीही व्यावसायिक चित्रपटांच्या प्रवाहात घेतले नाही. पण नसीरुद्दीन यांना बहुधा या सर्वांची कल्पना होती. त्यांनी व्यावसायिक चित्रपटांपेक्षा समांतर चित्रपटांवर अधिक भर दिला.
यातून परिपक्व झालेला हा अभिनेता मग अभिनयाच्या सर्व शाखांमध्ये मुक्त वावर करु लागला. कधी मारामारी करणारा हिरो, कधी कॉमेडी करणारा कलाकार, कधी खलनायक, कधी हळवा बाप अशा अनेकवीध भूमिकांमध्ये नसीरुद्दीन दिसू लागले. असं असलं तरी त्यांची खरी ओळख झाली ती समांतर चित्रपटांमधूनच. स्मिता पाटिल, शबाना आजमी, अमरीश पुरी आणि ओम पुरी या कलाकारांसोबत नसीरुद्दीन शहा यांना पठडीबाहेरील चित्रपटांची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहचवली.
निशांत, आक्रोश, स्पर्श, मिर्च मसाला, भवनी भवाई, अर्धसत्य, मंडी, चक्र, अलबर्ट पिंटों को गुस्सा क्यों आता है, मोहन जोशी हाज़िर हो, कथा या चित्रपटांनी मोठे व्यावसायिक यश खेचून आणले. केतन मेहता यांच्या मिर्च मसाला मध्ये तर नसीरुद्दीन आपली सासू, दिना पाठक, पत्नी रत्ना आणि मेहुणी सुप्रिया यांच्यासह दिसले. या सर्व चित्रपटांचा दर्जा उत्तम होता. भारताबाहेरही या चित्रपटांना मागणी होती. अद्यापही अभिनयचे शिक्षण घेणारे नवोदीत कलाकर या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचे धडे गिरवतात.
नसीरूद्दीन शाह यांनी हिंदी चित्रपटातील आपला प्रवास निशांत या चित्रपटापासून सुरु केला. त्यांच्यासोबत शबाना आजमी आणि स्मिता पाटील या दोन कसलेल्या अभिनेत्री होत्या. नवोदीत नसीरुद्दीनचा यातील अभिनय पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. यानंतर नसीरुद्दीन यांना नवीन मार्ग सापडला. व्यावसायिक चित्रपट मिळाले नाही तरी चालतील समांतर चित्रपटही काही कमी नाही, हे जाणून त्यांनी समांतर चित्रपटात एक क्रांती आणली…
समांतर चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केल्यावर नसिरुद्दीन यांना व्यावसायिक चित्रपटातही भूमिका मिळाल्या. विशेष म्हणजे यात विविधता होती. जाने भी दो यारो मध्ये रवी वासवानी यांच्यासोबत नसीरुद्दीन यांनी केलेली धम्माल, संवादाचे अचूक टायमिंग असलेल्या या चित्रपटानं नसीरुद्दीन यांच्या अभिनयाचं आणखी एक रुप समोर आणलं. मासूम हा सुद्धा एक त्यांचा चित्रपटही अशाच धाटणीतला. कितीही वेळा बघितला तरी मासूम जुना किंवा कंटाळवाणा वाटत नाही. शबाना आजमीच्या जोडीनं नसीरुद्दीन यांना हा चित्रपट खुलवला. मुलगा आणि वडील यांचं नातं. पती आणि पत्नी यांचं नातं आणि प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं. या वेगवेगळ्या पैलूवर मासूम मध्ये नसीरुद्दीन यांनी केलेल्या अभिनयाला तोड नाही.
सुभाष घाई यांच्या कर्मा या चित्रपटात तर त्यांच्यातील अभिनेत्याचा कस लागला. कर्मामध्ये दिलीप कुमार, नुतन, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, श्रीदेवी, दारा सिंग अशी तगडी स्टारकास्ट होती. या सर्वांत नसीरुद्दीन यांनी साकारलेला खैरु चांगलाच भाव खाऊन गेला. त्रिदेवही चित्रपट याच धाटणीतला. या चित्रपटात तर नसीरुद्दीन यांनी तिरछी टोपी वाले या गाण्यामधून रसिकांना वेड लावलं होतं. हे गाणं आणि त्रिदेव मधील जयसिंग खूप लोकप्रिय झाले. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट यशस्वी ठरला.
याशिवाय गुलजार यांचा इजाजत, तहलका, चमत्कार, विशात्मा, सर, लुटेरे, मोहरा, चायना गेट, सरफरोश, गजगामिनी, हे राम, एनकाऊंटर, मानसून वेडींग, मुझे मेरी बीवी से बचाओ, गुरु, मै हू ना, असंभव, इकबाल, पहेली, ओमकारा, क्रीश, जाने तू या जाने ना, दस कहानियां, अल्लाह के बंदे, सात खून माफ, जिंदगी न मिलेदी दोबारा, डर्टी पिक्चर, गर्ल इन येलो बूटस्, देओल, सिद्धार्थ, जिंदा भाग, जॉन डे, डेढ इश्किया, फाइंडींग फन्ना, डर्टी पॉलिटिक्स, वेलकम बॅंक, चार्ली के चक्कर में, तेरा सुररुर, जीवन हठी अशा न संपणा-या चित्रपटांमधून नसिरुद्दीन रसिकांना भेटत राहीले. प्रत्येकवेळी वेगळी भूमिका आणि त्यासाठी अगदी वेगळे नसीरुद्दीन….
बॉलिवूडमध्ये खलनायकाचे जे चित्र उभं केलं होतं, ते चित्र नसीरुद्दीन यांनी पुसून टाकलं. खलनायक होण्यासाठी उंची, तगडी शरीरयष्टी नसली तरी चालेल. पण खलनायकाची नजर प्रचंड बोलकी हवी आणि त्याच्या आवाजात जरब असावी हे नसीरुद्दीन यांनी दाखवून दिले.
हिंदी सिनेमांबरोबर नसीरुद्दीन यांनी हॉलीवूडच्या चित्रपटातही भूमिका केली. द लीग ऑफ एक्सट्रा ऑर्डिनरी जेंटलमेन या चित्रपटात नसीरुद्दीन कॅप्टन नीमो या भूमिकेत होते. याशिवाय त्यांनी पाकिस्तानच्या खुदा के लिये या चित्रपटातही भूमिका केली आहे. अर्थात यावरुन त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
नसीरुद्दीन शहा म्हटलं की अनेक चित्रपट समोर येतात. हे चित्रपट फक्त या कलाकाराच्या जोरावर अनेक वेळा बघितले जातात. त्यात हिरो-हिरोईन नाहीत. तरीही चित्रपट नावाजले गेले. अ वेनसडे हा त्यातला एक चित्रपट. सामान्य माणसाची घुसमट. त्याची या समाजव्यवस्थेत होणारी कोंडी जगण्यासाठी चाललेली धडपड. न्यायव्यस्थेबाबत त्याचं मत. आणि सामान्य माणसाची ताकद. नसीरद्दीन यांनी या भूमिकेत कमाल केली आहे. प्रत्येकाला ते आपलंच प्रतिनिधीत्व करत आहेत, असं वाटतं.
इश्किया, राजनिती, सात खून माफ, डर्टी पिक्चर, वेलकम बॅक या चित्रपटामधून नसीरुद्दीन यांचा बहारदर अभिनय रसिकांना प्रेमात पाडतो. वयाची साठी पार केल्यावर त्यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत, हे विशेष.
नसिरुद्दीन आपल्या प्रत्येक भूमिकेच्या प्रेमात असले तरी त्यांना सर्वात भावते ती त्यांनी साकारलेली मिर्झा गालीब यांची भूमिका. दूरदर्शनवर आलेल्या या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले. गुलजार मिर्झा गालिब यांच्यावर मालिका काढत आहेत, हे जेव्हा नसीरुद्दीन यांना समजले होते, तेव्हा त्यांनी गुलजार यांना एक पत्र पाठवलं होतं. यातून ही भूमिका आपल्याला करायला द्यावी अशी विनंती केली.
मात्र गुलजार येथे संजीव कुमार यांना घेऊ इच्छित होते. त्याच दरम्यान संजीव कुमार यांची तब्बेत बिघडली. मग गुलजार यांनी अमिताभ बच्चन यांनाही या भूमिकेसाठी विचारलं होतं. पण अमिताभ यांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. शेवटी गुलजार ही मालिका गुंडाळण्याच्या बेतात होते. तेव्हा त्यांनी नसीरुद्दीन यांच आठवण झाली. यथावकाश मालिका नसीरुद्दीन यांच्याकडे आली. या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठलं होतं.
या जेष्ठ कलाकाराला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये पद्मभूषण, पद्मश्री यांसह सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर आदींचा समावेश आहे.
नसीरुद्दीन यांचा विवाह रंगभूमीवर सक्रीय असलेल्या रत्ना पाठक यांच्याबरोबर झाला. सत्यदेव दुबे यांच्या नाटकाच्या दरम्यान रत्ना बरोबर त्यांची ओळख झाली. जेव्हा ही ओळख प्रेमात रुपांतरीत झाली, तेव्हा नसीरुद्दीन यांनी आपल्या पहिल्या लग्नाची गोष्ट रत्ना यांना सांगितली. त्यांचा पहिला विवाह झाला होता. तेव्हा नसीरुद्दीन वीस वर्षाचे होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. नसीरुद्दीन यांनी या लग्नाची कल्पना रत्ना यांना दिली. त्यानंतर 1982 मध्ये या दोघांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत.
दीडशेहून अधिक चित्रपट करणारे नसीरुद्दीन आणि वाद याचंही नात आहे. अनेकवेळा नसीरुद्दीन आपल्या वक्तव्यावरुन वादात सापडले आहेत. पण हे वाद एकीकडे आणि त्यांच्या चित्रपटातील भूमिक एकीकडे राहिल्या. पडद्यावर अनेक रुपात दिसणा-या नसीरुद्दीन शहा यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या पाठिब्यामुळेच आपण वयाच्या सत्तरीमध्येही मोठ्या पडद्यावर यायला उत्सुक असतो, असं नसीरुद्दीन म्हणतात. अर्थात रसिकांचे प्रेम हे त्यांचे टॉनिक आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याला वाढदिवसाच्या कलाकृती मिडीयातर्फे अनेक शुभेच्छा…