दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘नीले नीले अंबर पार चांद जब आये….’
किशोर कुमार (kishore kumar) यांना ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातील हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. एक अटॅक देखील येऊन गेला होता. त्यामुळे गाणं त्यांनी थोडसं कमी केलं होतं. पण आजारपणानंतर त्यांनी पहिल्यांदा जे गाणे गायले त्या गाण्यानंतर त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आणि पुन्हा एकदा ते मोठ्या जल्लोषात गावू लागले. हा किस्सा मोठा मनोरंजक आहे. कोणतं होतं ते गाणं आणि कोणता होता तो चित्रपट? १९८३ साली दक्षिणेकडील तमिळ दिग्दर्शक पी संभा शिवा राव यांनी त्यांच्याच एका गाजलेल्या तमिळ चित्रपटाचा हिंदी रीमेक करायचे ठरवले. मूळ Payanangal Mudivathillai चित्रपटात मोहन आणि पूर्णिमा जयराम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या तमिळ सिनेमाला संगीत इलीयाराजा यांचे होते.
‘कलाकार’ या चित्रपटाची नायिका होती श्रीदेवी. जी त्या वर्षीची म्हणजे १९८३ ची सुपरहिट नायिका होती. कारण फेब्रुवारी १९८३ सालीच तिला तिचा सुपरहिट सिनेमा ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित झाला होता आणि संपूर्ण देशात त्या चित्रपटाला मोठं लक्षणीय यश मिळालं होतं. ‘कलाकार’ हा चित्रपट मात्र अजिबात चालला नाही. सुपर फ्लॉप झाला. या चित्रपटात श्रीदेवीचा नायक होता कुणाल गोस्वामी म्हणजे अभिनेता मनोज कुमार यांचा मुलगा. त्याचा हा पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटात त्याला मोठं अपयश आलं.
हा चित्रपट आज कुणालाच आठवत नाही. कारण त्या काळातच या सिनेमाला मोठा अपयश मिळालं होतं. पण या चित्रपटातील एक गाणं आजही किशोर कुमार (kishore kumar)च्या टॉप रोमँटिक गीतांपैकी एक असं ते गाणं होतं. गीत होतं ‘नीले नीले अंबर पार चांद जब आये….’ पण तुम्हाला माहिती आहे का? हे गाणं किशोर कुमार गाणारच नव्हते. किंबहुना हे गाणं एस पी बालसुब्रमण्यम यांनीच गावं अशी दिग्दर्शकाची इच्छा होती. कारण मूळ तमिळ व्हर्शनमध्ये हे गाणं एस पी बालसुब्रमण्यम यांनीच गायलं होतं. पण संगीतकार कल्याणजी आनंदीजी यांचं म्हणणं असं होतं की या अशा रोमँटिक गाण्यासाठी किशोर कुमार यांचा आवाज अतिशय योग्य आहे. कारण अशी हळुवार रोमँटिक गाणी किशोर कुमार खूप चांगल्या पद्धतीने गातात.
मूळ तमिळ गाणं संगीतकाराला ऐकवलं गेलं. ट्यून बऱ्यापैकी तशीच ठेवून कल्याणजी यांनी गीतकार इंदिवर यांना या गाण्यांमध्ये जास्तीत जास्त रोमँटिक शब्द येतील असे टाकायला सांगितले. आता काळजी होती फक्त किशोर कुमार यांच्या तब्येतीची. कारण त्या काळात किशोर कुमार यांना नुकताच एक हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यांनी गाणं बऱ्यापैकी कमी केलं होतं. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण कल्याणजी आनंदजी यांना या गाण्यासाठी किशोर कुमार (kishore kumar)च हवे होते. त्यांनी थोडी वाट पहिली.
आता डॉक्टरांनी देखील त्यांना गायला तशी परवानगी दिली. रेकोर्डिंगची तारीख ठरली. किशोर कुमार स्टुडिओमध्ये आले . ते नुकतेच आजारातून उठले होते त्यामुळे त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा थकवा जाणवत होता. त्यामुळे ते नेहमीच किशोर कुमार वाटत नव्हते. पण गाण्याची तर्ज ऐकली आणि किशोर कुमार (kishore kumar) यांचा चेहरा खुलला. गाण्याच्या एक-दोन रिहर्सल झाल्या आणि किशोर कुमारने आपल्या जादुई स्वरात हे गाणं गायला सुरुवात केली. या गाण्याच्या सुरुवातीला बेस गिटारचा एक सुंदर पीस आहे; जो ख्यातनाम गिटारीस्ट सुनील कौशिक यांनी वाजवला होता.
सुरुवातीला हळुवार सुरात सुरू झालेले गाणे नंतर दृतगतीतमध्ये जातं आणि गाण्याला मग एक नैसर्गिक वेग येतो. ‘नीले नीले अंबर पर चांद जब आये प्यार बरसाये हमको तरसाये ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल कि बुझा जाये… ‘ आज ‘कलाकार’ हा चित्रपट सर्वांच्या विस्मृतीत गेला असला तरी हे गाणं मात्र सर्वांना माहिती आहे. बऱ्याच जणांच्या मधुर स्मृती देखील असतील या गाण्याबाबत.
==========
हे देखील वाचा : अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
==========
आपण प्रत्येकाने हे गाणे नक्कीच कधीतरी गुणगुणले आहे. आज देखील कोणत्याही हिंदी चित्रपट विषयक रोमँटिक गाण्यांच्या कार्यक्रमात या गाण्याला आवर्जून स्थान मिळतं. गंमत म्हणजे हेच गाणं साधना सरगम यांच्या आवाजात देखील चित्रपटात होतं. पण ते देखील मागे पडले. चित्रपट पडला पण गाणे चालले. या गाण्यामुळे एक फायदा नक्की झाला. (आजारपणा नंतरचा) किशोर कुमार (kishore kumar) यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आणि पुन्हा तो नव्या जल्लोषात नव्या जोषात गायला सिद्ध झाला!