मराठी चित्रपट होतायत नायिकाप्रधान! ‘या’ लोकप्रिय नायिका साकारत आहेत जबरदस्त भूमिका…
गेल्या काही काळातील मराठी सिनेमे आणि ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या कंटेटवरून एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते आणि ती म्हणजे, त्यात मराठी अभिनेत्रींना केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार केले जात आहेत आणि त्या ही आपल्या भूमिकांबाबत धाडसी व प्रयोगशील झाल्या आहेत. वाय, मीडियम स्पाईसी, चंद्रमुखी, तमाशा लाईव्ह असे सिनेमे, तर रानबाजारसारख्या वेबसीरिजमधून मराठी अभिनेत्रींचं नवं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. (Marathi Movies)
एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकरचं ‘चंद्रा’च्या लूकमधलं पोस्टर एका विमानावर झळकवण्यात आलं आणि त्याची दखल महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशभरातल्या मीडियानं घेतली, तेव्हा नाही म्हटलं, तरी मराठी प्रेक्षकांची मान उंच झाली होती… हा सगळा मार्केटिंग- ब्रँडिंग किंवा बजेटचा विषय असला, तरी मराठी सिनेमाचं विशेषतः एखाद्या स्त्रीकेंद्रीत सिनेमाचं पोस्टर अशाप्रकारे अवकाशात झेपावणं हा नक्कीच कौतुकाचा विषय होता.
मध्यंतरीच्या काही वर्षांत मराठी सिनेमाचं रूप आमूलाग्र बदललं आहे. परंतु आशय उठावदार झाला, तरी मराठी अभिनेत्रींचा त्यातला वावर, त्यांच्या भूमिका यामध्ये फारसा बदल झालेला दिसत नव्हता. काही तुरळक अपवाद सोडले, तर मराठी अभिनेत्री सशक्त भूमिका करताना अभावानंच दिसत होत्या. अर्थात त्यामागे, तसे सिनेमे बनवले न जाणे किंवा तशा भूमिका लिहिल्या न जाणं ही कारणं होतीच. मात्र, गेल्या फक्त महिन्या-दोन महिन्यात ही परिस्थिती बदलल्याचं सुखावह चित्र दिसत आहे. (Marathi Movies)
या काळात मोठा पडदा किंवा ओटीटीवर आलेला कंटेट बघता मराठी अभिनेत्रींना त्यांच्या कौशल्याला न्याय देणाऱ्या भूमिका मिळत असल्याचं दिसतंय. चंद्रमुखीमध्ये अमृता खानविलकर, रानबाजारमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत, वाय सिनेमात मुक्ता, मीडियम स्पाईसी तसंच बी.ई. रोजगारमध्ये सई ताम्हणकर यांच्या जबरदस्त भूमिका पाहायला मिळाल्या.
बोल्ड अँड ब्युटीफुल
रानबाजार वेबसीरीजच्या पहिल्याच टीझरनं इंटरनेट आणि मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या सीरीजमधल्या बोल्ड सीनवरून अभिनेत्री प्राजक्ता माळीला खूप ट्रोल करण्यात आलं, मात्र ‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी सीरीज पाहावी, सीरीजचा विषय, त्यातून आम्हाला काय मांडायचं आहे ते पाहावं आणि मग टीका करावी’ असं ट्रोलर्सना सुनावत प्राजक्ता आपल्या कामावर ठाम राहिली. तिच्या म्हणण्याप्रमाणे सीरीज प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं कौतुकही केलं. (Marathi Movies)
अभिनेत्री मुक्ता बर्वे सुरुवातीपासूनच आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे आणि वाय सिनेमात तिचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. आजकाल ट्रेलरमध्ये सिनेमाची जवळपास सगळी गोष्ट सांगण्याचा ट्रेंड असताना ‘वाय’च्या ट्रेलरनं मात्र सिनेमाचा विषय शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवला. सिनेमात मुक्ताने साकारलेली धडाडीची प्रशासकीय अधिकारी प्रचंड लोकप्रिय झाली.
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये लीलया वावणाऱ्या सई ताम्हणकरनं पेट पुराण, बीई रोजगार आणि मीडियम स्पाईसी या तिन्ही कलाकृतींमध्ये एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न भूमिका सहजपणे साकारल्या. बीई रोजगारमधली गाड्यांबद्दल पॅशनेट असणारी वडा आणि मीडियम स्पाईसीमधली बिनधास्त शेफ या तिच्या भूमिकांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चंद्रमुखीच्या भूमिकेसाठी वजन वाढवण्यापासून रात्रं-दिवस सर्व प्रकारच्या मीडियातून सिनेमाचं धडाकेबाज प्रमोशन करणाऱ्या अमृताच्या अभिनयानं सर्वांची वाहवा मिळवली. (Marathi Movies)
=====
हे देखील वाचा – आर. माधवनचं काय आहे कोल्हापूर कनेक्शन?
=====
ट्रेंड सुरू राहणार?
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तमाशा लाइव्ह सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं धडाडीची टॉक शो होस्ट साकारत आपल्या अभिनयाची ताकद परत एकदा दाखवून दिली, तर लवकरच प्रदर्शित होणार असलेल्या अनन्या सिनेमात हृता साकारत असलेल्या शीर्षक भूमिकेचं ट्रेलर आल्यापासूनच कौतुक होत आहे. त्यावरून मराठी अभिनेत्रींच्या कसदार- मध्यवर्ती भूमिकांचा हा नव्याने सुरू झालेला ट्रेंड आगामी काळात आणखी बळकट होणार असल्याचं म्हणता येईल. (Marathi Movies)
– कीर्ती परचुरे