आर. माधवनचं काय आहे कोल्हापूर कनेक्शन?
“असं म्हणतात की, मोठ्या लोकांशी संबंध यायला हवा असेल, तर नामवंत विद्यापीठांत जायला हवं. म्हणजे, तुम्ही हावर्डमध्ये गेलात तर उद्याच्या जागतिक नेत्यांशी तुमची ओळख होईल वगैरे वगैरे. मी गेलो कोल्हापुरात… माझी तिथे दोस्ती झाली ती विश्वास नांगरे पाटील, सतेज पाटील आणि संभाजीराजेंशी, जे आजही माझे खास मित्र आहेत… आणि हे सगळे आज मोठमोठ्या पदांवर आहेत. त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजतो की, मी महालक्ष्मीची कृपा असलेल्या कोल्हापुरात गेलो आणि मला तिथे जे हे मित्र मिळाले, ते हावर्ड किंवा प्रिन्स्टनमध्ये मिळाले नसते.”- आर माधवन (R. Madhavan)
माधवन बालाजी रंगनाथन नावाचा हा कोल्हापूरबद्दल प्रचंड आत्मीयतेनं बोलणारा माणूस मुळचा दक्षिण भारतीय. पण लहानपण झारखंड- बिहारमध्ये गेलेलं. शाळेत असताना केलेल्या विविध उद्योगांनंतर वडिलांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं. पुण्याच्या पोरी पाहून पोरगं बावचळलं आणि आणखीनच वाहावत जायला सुरुवात झाली. वडिलांनी शेवटी चिडून त्याला कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये इंजिनियरिंगला टाकलं. ती त्याच्यासाठी एकप्रकारे शिक्षाच होती. पण कोल्हापूरच्या पाण्यानं या वाया चाललेल्या पोराची गाडी परत ट्रॅकवर आणली, त्याला शिस्त लावली आणि अलगद प्रगतीच्या वाटेवर नेऊन सोडलं.
कोल्हापूरमध्ये सुसाट
शाळेत असताना फारशी प्रगती न दाखवू शकलेला मॅडी (R. Madhavan) कोल्हापूरमध्ये आला तेव्हा मराठी भाषा किंवा संस्कृतीचा त्याला गंधही असण्याचं कारण नव्हतं. विश्वास नांगरे- पाटील नावाच्या त्याच्या रूमपार्टनरनं त्याला मराठी शिकवलं आणि त्यानं विश्वासचं इंग्रजी सुधारण्याचं काम आपल्याकडे घेतलं. शाळेत झालेल्या अधोगतीची सगळी कसर भरून काढायचा जणू निश्चय केल्याप्रमाणे त्यानं अभ्यासापासून सगळ्याच आघाड्यावर चमकण्याचा धडाका लावला.
१९८८ मध्ये राजाराम कॉलेजनं सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून त्याला स्कॉलरशीप दिली आणि पुढचं वर्षभर तो कॅनडामध्ये होता. तिकडून आल्यावर त्यानं परत कोल्हापूरमध्ये शिक्षण सुरू ठेवणं पसंत केलं, शिवाय एनसीसी होतंच. मॅडीला पुढे सैन्यात जायचं होतं त्यामुळे तो मनापासून एनसीसीमध्ये रमला होता. तेव्हा तो महाराष्ट्रातल्या टॉप एनसीसी कॅडेट्सपैकी एक होता. चांगल्या कामगिरीमुळे एनसीसीनं त्याला इंग्लंडला ब्रिटिश सैन्यदल, रॉयल नेव्ही आणि रॉयल एयर फोर्समध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यानंतर सैन्यात जाण्याची संधी मात्र वयातल्या फक्त सहा महिन्यांच्या फरकानं हुकली. ते ही बरोबरच होतं म्हणा कारण त्याचं यश दुसरीकडेच लिहिलेलं होतं.
पदवी पूर्ण झाल्यावर मॅडीनं (R. Madhavan) ‘पब्लिक स्पीकिंग’चं पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याचं वर्कशॉर्प घेण्यासाठी कोल्हापूरलाच त्यानं पहिलं प्राधान्य दिलं आणि तिथे त्याची भेट सरिता बिर्जे नावाच्या मराठी मुलीशी झाली. तिला हवाईसुंदरी बनायचं होतं आणि त्यासाठी काही सॉफ्ट स्किल्स शिकायला हवेत म्हणून तिनं मॅडीच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला.
मैत्री आणि डेटिंगचा टप्पा पार करत पुढे ही सरिता मिसेस माधवन बनली. एकीकडे वर्कशॉप्स सुरू असताना माधवननं आपला पोर्टफोलिओ बनवून घेतला आणि ग्लॅमर इंडस्ट्रीज आपलं नशीब आजमावायला सुरुवात केली. ९० च्या दशकातला टिपिकल ग्रे सूट घातलेल्या माधवनचा मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळातला कोल्हापूरमध्ये काढलेला असाच एक फोटो आजही इंटरनेटवर लोकप्रिय आहे.
अजूनही कोल्हापूरकर
मॅडीनं (R. Madhavan) कोल्हापूर सोडल्याला आता जवळपास वीस वर्ष झाली असतील. पण ना तो कोल्हापूरला विसरला आहे, ना कोल्हापूरकर त्याला! राजाराम कॉलेजची ओळख सांगताना, ‘आर. माधवन इथे शिकायला होता’ असं आजही कोल्हापूरात आवर्जून सांगितलं जातं. त्याच्याबरोबर कॉलेजला असलेले आजही त्याचे किस्से सांगतात.
परवाच एका मुलाखतीत कोल्हापूरचीच मिसळ कशी अस्सल असते आणि त्याची तर्री कशी झणझणीत असते, हे सांगताना माधवनच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. संधी मिळेल तेव्हा तो कोल्हापूरबद्दल वाटणारा जिव्हाळा व्यक्त करत असतो. कधी तिथल्या आठवणींना उजाळा देत, कधी तिथे एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावत तो आपलं कोल्हापूर प्रेम जाहीर करत असतो.
=========
हे देखील वाचा – सचिन दरेकर: सदैव ‘ॲक्शन’ मोडवर असलेला मनस्वी कलावंत
=========
आज तो त्या स्टारपदाला पोहोचला आहे, तिथे असताना आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात हातभार लावणाऱ्या संस्था, शिक्षक किंवा मित्र यांची खूपदा गरजेनुसारच ओळख सांगितली जाते. मात्र, अशांच्या गर्दीत मॅडी उठून दिसतो. आज मॅडीच्या यशाचं रॉकेट खूप पुढे गेलेलं असलं, तरी कोल्हापूरच्या काळ्या मातीनं लावलेलं वळण तो अजूनही विसरला नाहीये.
– कीर्ती परचुरे