
‘नटरंग’मधील ‘गुणा’ या भूमिकेसाठी Atul Kulkarni नाही तर झी मराठीचा ‘हा’ चेहरा होता पहिली पसंती?
मराठी चित्रपटसृष्टीत बरेच अजरामर चित्रपटांची नोंद झाली आहे, यात रवी जाधव दिग्दर्शित ‘नटरंग’ (Natarang Movie) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. २०१० मध्ये आलेल्याया चित्रपटात अतुल कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका होती. तमाशापट आजवर बरेच आले, परंतु, याच तमाशातील नाचा किंवा मावशी यांचं जीवन कसं असतं? तो कलाकार कसा घडतो? हे सारं काही रवी जाधवांनी नटरंग या चित्रपटात फार उत्कृष्टपणे मांडलं आहे. आणि त्यांच्या दिग्दर्शनाला अतुल कुलकर्णी यांनी उत्तम साथ दिली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? अतुल कुलकर्णी नाही तर मराठीतील एका वेगळ्याच अभिनेत्याला घेऊन चित्रपट करावा असं रवी यांच्या मनात होतं.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni) यांनी ‘नटरंग’मध्ये ‘गुणा’ची भूमिका आव्हानात्मक पद्धतीने आपल्या खांद्यावर पेलली होती. बऱ्याच जणांनी त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं, तर काहींनी त्यांना ही भूमिका जमली नाही असं देखील म्हटलं. आणि आता याच कास्टिंगविषयी दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी अमोल परचुरेंच्या ‘कॅच अप’ला दिलेल्या मुलाखतीत फार महत्वाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, ‘गुणा’च्या भूमिकेसाठी अतुल नव्हे तर आदेश बांदेकर यांना घ्यायचा त्यांचा विचार होता.

रवी जाधव म्हणाले की, ‘नटरंगमध्ये अतुल हे मी केलेलं कास्टिंग नव्हतं, माझं पहिलं कास्टिंग होतं आदेश बांदेकर (Aadesh Bandekar). खरंतर अजय-अतुलशी माझी ओळख आदेश बांदेकरांनीच करून दिली होती, माझा त्यांच्याशी थेट संपर्क नव्हता. तो आधीपासून झी गौरव वगैरे करायचा, त्यामुळे त्याचा संपर्क होता.” (Aadesh Bandekar) पुढे रवी म्हणाले की, ‘अतुलचं कास्टिंग निखिल साने यांनी वगैरे कास्टिंग केलं. ते चॅनेलसाठी काम करतात त्यामुळे त्यांची दूरदृष्टी होती, प्रेक्षकांचा अभ्यास होता… त्यांनी म्हटले की, अतुल आला तर त्या सिनेमाचं अजून काहीतरी मोठं होऊ शकेल आणि ते झालं. अतुलने ज्या पद्धतीने या सिनेमात स्वत:ला समर्पित केलं, त्याने जी मेहनत केली त्याला तोड नाही.’
रवी यांनी पुढे असं देखील म्हटलं की, “आपण दिग्दर्शक म्हणून स्वार्थी असतो, मग ‘रंग दे बसंती’सारख्या चित्रपटात काम केलेला अतुल जेव्हा मराठीत काम करतोय, तो आपल्या चित्रपटासाठी एवढी मेहनत करतोय, त्यातील बारीक-सारीक गोष्टींवर काम करतोय… त्यातून आपण तयार होत जातो, आपल्याला खूप शिकायला मिळतं. पहिल्याच चित्रपटात मला अशी माणसं आजूबाजूला भेटली की, ज्यांच्याकडून मी हळूहळू समृद्ध होत गेलो. मला हळूहळू ती भाषा समज गेली, जी मला पुढील चित्रपटांसाठी उपयोगी ठरली. जेव्हा मला कळलं की अतुल कुलकर्णीला कथा ऐकवायची आहे तेव्हा मी संपूर्ण प्रेझेंटेशन पुन्हा केलं होतं. मी पद पुन्हा नव्याने केलं, कारण मला ते अतुलला दाखवायचं होतं. अतुलने अप्रतिम सूचनाही दिल्या, त्याने खूप चांगलं काम केलं. म्हणजे खरंतर माझ्या कल्पनेपलीकडील काम त्याने केलं.’ (Marathi Entertainment News)

दरम्यान, यावेळी रवी यांनी अतुल कुलकर्णींच्या गुणा या भूमिकेसाठी केलेल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं विशेष कौतुक केलं. ते म्हणाले की, ‘गुणाचा पैलवान होणं, तो बारीक होणं हे माझ्या कल्पेनत नव्हतं. ते अतुलला वाटलं होतं की, ही दोन रुपं झाली तर खूप मजा येईल. ट्रान्सफॉर्मेशनसाठी तर त्याला सलाम आहे. हॅट्स ऑफ शब्दही छोटा आहे. हल्ली एवढं समर्पण पाहायला नाही मिळत, हल्ली एक चित्रपट करतात आणि मग त्याचवेळी त्यांची एक मालिका सुरू असते… त्यात एवढं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेणं आणि त्या काळात दुसरं काहीही न करणं कठीण आहे. मी नशीबवान होतो की, मला अशी माणसं मिळाली.’
================================
हे देखील वाचा : Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?
================================
‘नटरंग’ हा २०१० मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तमाशापटाची एक वेगळी ओळख निर्माण करुन देणारा ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबतच बॉक्स ऑफिसवर १२ कोटींची कमाई देखील केली होती. या चित्रपटामुळे अतुल यांचा ताकदीचा अभिनय अधिक ठळकपणे प्रेक्षकांसमोर आला आणि सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या करिअरमधला हा चित्रपट टर्निंग पॉंईट देखील ठरला. या चित्रपटाची कथा जितकी जीवंत भासते, तितकीच या चित्रपटातील प्रत्येक गाणी मंत्रमुग्ध करणारी ठरली यात शंकाच नाही.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi