…आणि ओपींच्या संगीताने सगळ्यांचे आयुष्य घडले
भारतीय चित्रपट संगीत आणि त्यांची विविध घराणी यांचा धांडोळा घेताना पंजाब/लाहोर कडील ढंगदार संगीताचा विचार केल्याशिवाय रसिक पुढे जावूच शकत नाही. या संगीतात एक “ह्रिदम” होता, एक ठेका होता, जोश होता, उल्हास होता, जीवनाचं सार चैतन्यच जणू संगीतात सामावलं होत…! या घराण्याचा आद्य पुरुष संगीतकार गुलाम हैदर असला तर त्या घराण्याचा ध्वज ज्या संगीतकाराने दाही दिशात फिरवून त्रिखंडात लौकिक मिळवला असा अवलिया संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओ.पी.नय्यर…
ओपी हा तसा बंडखोर संगीतकार. बंडखोर यासाठी त्याने प्रस्थापित संगीताची चाकोरी बदलली. तोवर भारतीय संगीत म्हणजे मनाला मंत्रमुग्ध करणारा अनुभव येत असताना ओपीने रसिकांच्या मनावर धुंदी तर घातलीच शिवाय साऱ्या शरीराला नाचायला/डोलायला शिकवलं. त्याचं संगीत एक झपाटून टाकणार चेटूक होत. आज पन्नास वर्षाचा कालखंड उलटून गेला तरीही “बहुत शुक्रिया बडी मेहरबानी”, “मेरी जिंदगी में हुजूर आप आये”, “आई ये मेहरबान बैठीये जाने जा”, “पुकारता चला हूँ मैं गली गली बहार की”, “कजरा मुहोब्बत वाला आन्खियो मे ऐसा डाला” या गाण्याची गोडी तसूभरही कमी झाली नाही उलट रसिकांच्या दिलातील ओपीच्या संगीताचा “गहिरा”, “बादल” आणखीनच “दिवाना” होत गेला.
हे देखील वाचा: पंचम यांची सदाबहार गाणी…
लता मंगेशकरांना ओपीनी नाकारलं…
ओपी आपल्यातून जावून आता तेरा वर्ष झाली. हिंदी सिनेमातून तो १९७२ पासूनच आवूट झाला होता. पण त्याची गाणी, त्याच तेच ऐटबाज राजबिंड रहाण, त्याची ती सुप्रसिद्ध शुभ्र वस्त्रातला त्याचा वावर यामुळे तो रसिकांना कायम भेटतच होता. ओपीच्या संगीताचं सर्वात ठळक आणि अधोरेखित कराव असं वैशिष्ट्य म्हणजे त्याने उभ्या कालखंडात सूरश्री लता मंगेशकरचा स्वर कधीच आपल्या संगीतात वापरला नाही. सारे संगीतकार, सारी सिनेसृष्टी जेव्हा लताच्या आवाजाकरीता जंग जंग पछाडत होते त्यावेळी ओपी मात्र लता शिवाय तिच्याशी समांतर अशा काळात आपली कला कारकीर्द बहरून टाकत होता…! लताच्या स्वराबाबत ओपीच्या मनात जराही किल्मिष नव्हते किंबहुना हजारो वर्षातून क्वचितच असा स्वर तयार होतो अशीच त्यांची भावना होती.
केवळ आपल्या संगीत रचनेकरीता लताचा आवाज फिट नाही ही त्या मागची प्रांजळ भावना होती. लताचा स्वर वापरला नाही, पण आशाचा स्वर मात्र ओपीच्या संगीताचा “प्राण”, “स्वर” ठरला. आशाने थोडी थोडकी नाही तर ६० सिनेमातून तब्बल ३१७ गाणी गायली त्यापैकी १६५ गाणी सोलो होती तर १२१ युगल गीते होती. आशाचा स्वर जोवर त्याच्या संगीतात होता तोवर संगीत हिट होत गेलं, पण त्यानंतर मात्र संगीताला ओहोटी लागली. सुरुवातीला शमशाद बेगम, गीतादत्त या दोघींच्या स्वराने ओपीने कारकीर्द सुरु केली. पुढे १९५७ च्या “नया दौर” पासून आशाचा आवाज ओपी करीता प्रमुख स्वर ठरला. आशाच्या स्वराला स्थिरस्थावरत्व देण्याचं काम ओपीनीचं केले.
ओपींचा जन्म…
आज पाकिस्तानात असलेल्या लाहोर या कलासंपन्न शहरात १६ जानेवारी १९२६ रोजी ओपीचा जन्म झाला. उच्च विद्येचा वारसा लाभलेल्या नय्यर कुटुंबात ओपी मात्र अभ्यासात फारशी गती घेवू शकले नाहीत. गाणी/संगीत याची जन्मजात आवड. (ओपी पोटात असताना त्यांच्या आईला हार्मोनियम वाजविण्याचे आणि ऐकण्याचे डोहाळे लागले होते) जन्माच्या आधीपासून झालेले हे संगीताचे संस्कार त्यांना आयुष्यभर पुरले. त्यांनी शास्त्रीय संगीताचे विधिवत असे शिक्षण कधी घेतलेच नाही.
हे नक्की वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
संगीत त्यांच्या रक्तातच होत. (तसं नसतं तर “फागुन” मधली सगळीच्या सगळी गाणी त्याने “पिलू” रागात बांधली नसती. सिनेमा संगीतात हा एक विक्रम आहे.) लाहोरच्या हिरामंडीचे तिथल्या संगीतमय वातावरणाचा नकळत परिणाम त्यांच्यावर होत होताच. इथेच त्यांनी मल्लिका पुखराजला ऐकल. लाहोर आकाशवाणी केंद्रावर “कबीर वाणी” गायल्यावर त्यांना गायक म्हणून विचारणा होऊ लागली. गायक की संगीतकार हे मनात द्वंद्व सुरु झालं. सी. एच. आत्मा यांच्या “प्रीतम आन मिलो” या गीता द्वारे ओपीला संगीत नियोजनाची संधी मिळाली.
कनीझ सिनेमाकरिता पार्श्वसंगीत देण्याची संधी…
याच काळात देशाची फाळणी झाली आणि नय्यर कुटुंबाला लाहोर सोडाव लागलं. मुंबई महानगरी त्यांना खुणावत होतीच. लाहोर सोडल्यावर काही काळ त्यांनी अमृतसरला संगीत शिक्षकाची नोकरी देखील केली. १९४९ साली “कनीझ” सिनेमाकरीता पार्श्वसंगीत देण्याची संधी मिळाली. पण सिनेमा पडल्याने पुन्हा पायपीट चालू झाली. मुंबईत त्यावेळी सी.एच.आत्मा यांच्या “प्रीतम आन मिलो” या गाण्याने जबरदस्त हवा केली होती. लोक रांगा लावून ध्वनीमुद्रीका घेत होती पण या गीताचा संगीतकार मात्र ‘स्ट्रगल’ करीत होता.
लाहोरच्या एका मित्राने त्यांची शिफारस पंचोलींकडे केली. पंचोलीनी ताबडतोब तार करून बोलावून घेतले तो दिवस होता १९ मे १९५१…! याच दिवशी त्यांचा विवाह होता. मोठा शुभशकुन घडला. नोकरी अन छोकरी एकाच दिवशी मिळाली. ओपींना पहीला चित्रपट मिळाला “आसमान” पहिला डाव देवाला या न्यायाने या सिनेमाने यशाचे तोंड पहिले नाही. पण पुढे “छम छम छम”, “बाज” या सिनेमाच चांगल संगीत असूनही सिनेमे पडत गेले. शमशाद/गीता या त्या कालच्या लीड गायिका गात होत्या, गाणी ही गाजत होती पण यश मिळत नव्हत. ओपी एव्हाना बाड बिस्तरा गुंडाळून पुन्हा परतीच्या विचारात असतानाच आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली.
गुरुदत्त आणि ओपींची साथ…
गुरुदत्तचा “आरपार” हा सिनेमा मिळाला. ब्रिंग कोस्बी यांच्या रेकॉर्ड्स गुरूने ओपीच्या हवाली केल्या आणि चमत्कार घडला, आजवर कधीही न ऐकलेलं धुंद संगीत जन्माला आलं. “सून सून जालीम, कभी आर कभी पार, एलो मैं हारी पिया, बाबूजी धीरे चलना, मुहोब्बत करलो जी भरलो ” या गीतांनी एकाच धुमाकूळ घातला. ओपीला मुंबईत स्थिरायला हे यश चिरंजीव ठरलं. गुरूच्या पुढच्या मि.एंड मिसेस ५५, सी.आय.डी. यातलं ओपीच संगीत काय झकास होत. पण नंतर गुरूने ओपीची साथ सोडली. गुरूच्या सिनेमाशी ओपीचा परत संबंध आला तो थेट गुरूच्या मृत्यू नंतर “बहारे फिर भी आयेगी” (१९६६) च्या वेळी. दरम्यान ओपीला बी आर चोप्राचा “नया दौर” मिळाला. “मांग के साथ तुम्हारा”, “रेशमी सलवार कुडता जालिका”, “उडे जब जब जुल्फे तेरी” या गीतांनी ओपीला आयुष्यातील एकमेव “फिल्म फेयर” मिळवून दिल. पुढे “तुमसा नही देखा” ने शम्मी कपूरचा भाग्योदय झाला.
ओपीच्या ह्रिदमने शम्मी सुपर हिट ठरला नव्हे त्याच्या बॉडी लँग्वेजला साजेसं अस संगीत ओपीने जन्माला घातलं पुढे तीच त्याची शैली आणि ओळख ठरली.ओपीच्या संगीतात आता आशाचा स्वर सुरेल पणे खेळत होता. हावडा ब्रिज, फागून, रागिणी, दो उस्ताद, बसंत (यात आशाची तब्बल चौदा गाणी होती), कल्पना, मिट्टी में सोना आणि “एक मुसाफिर एक हसीना” आशा आणि रफी हेच ओपीचे प्रमुख गायक होते.विश्वजीत, जॉय मुखर्जी या पडेल हिरोंना ओपीच्या संगीताने तारले. साठच्या दशकात त्यांच्या संगीताने भन्नाट झेप घेतली. कश्मीर की कली, मेरे सनम, फिर वही दिल लाया हू, सावन की घाटा, ये रात फिर न आयेगी, हम साया, किस्मत आणि संबंध. ओपी त्याकाळी सर्वत्र प्रचंड गाजत होता. त्याची गाणी तरुणांच्या तोंडी होती. पण याच वेळी ओपीच्या हितशत्रूमध्ये वाढ होत होती. त्याला “टार्गेट” करण्याचा वारंवार प्रयत्न होत होता. त्याच निर्भळ यश काहींच्या नजरेत खूपत होत.
घरातल्यांसोबत दुरावा…
सत्तरच्या दशकात ओपीचा “एक बार मुस्कुरा दो” १९७२ साली झळकला. दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा सुपर हिट संगीत असलेला सिनेमा ठरला. या नंतर १९७३ साली आलेल्या “प्राण जाये पर वचन न जाये” यात आशा शेवटच ओपी कडे गायली “चैन से हमको कभी आपने जीने न दिया” आशा त्याच्या संगीतातून बाहेर पडली आणि ओपी संपला. मग पुष्पा पागधरे, कृष्ण कल्ले, दिलराज कौर यांना घेवून तो रसिकांपुढे आला पण दुसरी आशा बनवू शकला नाही. १९७२ ते २००७ साली ओपी तसा रिकामा होता पण त्याच्यावरील चाहत्यांच प्रेम तसूभरही कमी झाल नाही. १९९० नंतर ओपीचे त्याच्या कुटुंबियांसोबत मतभेद झाल्याने ओपी घरातून बाहेर पडले. आयुष्याची शेवटची काही वर्षे ते ठाण्याला नाखवा कुटुंबीया सोबत राहत होते.
हे वाचलंत का: चित्रपटाचे ‘मदर इंडिया’ हे नाव ठेवण्यामागील कारण तुम्हाला माहित आहे का?
मनोहारी सिंग (सेक्सो फोन),अल बुकर (चेलो) परशुराम हळदीपूर (मेंडोलीन), गजानन कर्नाड (व्हायोलीन), बाबू सिंग (हर्मोनियम-आठवा एक मुसाफिर एक हसीना बहुत शुक्रियाचा पीस किंवा कजरा मोहब्बत वालाचा पीस) शिवकुमार शर्मा (संतूर) हजारा सिंग (गिटार), बासरी (सुमंत राज) या सोबतच, जी एस कोहली हे सहाय्यक आणि सबेस्तीयन हे अरेंजर म्हणून ओपीना लाभले त्यामुळे त्याचं संगीत रसरशीत बनलं. या सर्वांचा त्यांच्या कामगिरीचा ओपीच्या संगीतात मोठा हात होता ओपीच्या गाण्यांची त्याच्या घोड्याच्या टप्याच्या गाण्यांची चर्चा रसिकांच्या अनेक पिढ्या करत राहतील. तो एक “जादूगार” होता गंधर्व नगरीतून आला आणि पुन्हा परत तिकडेच गेला २८ जानेवारी २००७ ला…!