Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे
Omkarnath Thakur: ‘या’ हुकुमशहाच्या निद्रानाशाचा विकार बरा केला संगीतकाराने !
आपली भारतभूमी हे खरोखरच कलावंतांची खाण आहे. पण बऱ्याचदा आपण आपला समृद्ध इतिहास विसरतो आणि जेव्हा कधी आपल्याला हा विस्मृतीत गेलेला इतिहास अनपेक्षितपणे सापडतो तेव्हा एक सुखद असा धक्का बसतो! आज संगीताचार्य पंडित ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) हे नाव कोणाला आठवत नाही पण त्यांनी संगीत क्षेत्रात केलेलं कार्य फार भरीव आणि संस्मरणीय असे आहे. त्यांचा इटलीचे सर्वेसर्वा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी (Benito Mussolini) यांच्या बाबतचा एक किस्सा खूप मशहूर आहे. तो किस्सा आपल्या सोबत शेअर करतोच पण त्यापूर्वी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या बद्दलची थोडीशी माहिती पुढच्या पिढीला असणे गरजेचे आहे.
२४ जून १८९७ या दिवशी बडोदा गुजरात येथे जन्मलेले पंडित ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) यांचे बालपण अतिशय खडतर अवस्थेत गेले. त्यांचे वडील गौरीशंकर हे देखील संगीताचे अभ्यास होते पण आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. ओंकार चौदा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झालं आणि त्यांना कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ओंकारचा कल हा पूर्वी पासूनच संगीताकडे होता.
गुजरातमध्ये संगीताची शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये विष्णु दिगंबर पलुस्कर (Vishnu Digambar Paluskar) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. ओंकार हा मुळातच हुशार विद्यार्थी असल्यामुळे पलुस्कारांकडे तो त्यांच्या तालमीत चांगलाच तयार झाला आणि भारतात सगळीकडे त्याच्या मैफली सुरू झाल्या. गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचं नाव खूप मोठं झालं. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांच्या लग्न झाले. लग्नानंतर त्यांचा सुखी संसार सुरू झाला.
देश विदेशात त्यांचे गायनाचे कार्यक्रम होऊ लागले. ओंकारनाथ ठाकूर या नावाला आता वलय प्राप्त झाले होते. आपल्या गायकीने त्याने सर्वांवर छाप टाकली होती. एकदा परदेश दौऱ्यावर असताना त्यांना एक वाईट बातमी कानावर आली त्यांची पत्नी पहिल्या बाळंतपणातच मृत्युमुखी पडले तिच्यासोबत नवजात बालक देखील मृत्यू पावले. ओंकारनाथ (Omkarnath Thakur) यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता ते या बातमीने पुरते कोलमडले.
असे म्हणतात की त्यांनी गाणं पण सोडून दिलं. ते भ्रमिष्टागत वागू लागले. त्यांना पूर्वीचं काहीच आठवायचं नव्हतं. पण त्यांना अंजली देवी या स्त्रीने आधार दिला. ओंकार त्यांना दीदी मा म्हणून बोलवायचा. अंजली देवी ओंकारसाठी बहीण आणि आई झाली. त्यांच्या मुळेच ओंकार पुन्हा एकदा संगीताच्या क्षेत्रात कार्यरत झाले. १९३४ साली त्यांचा दौरा इटलीला चालू होता. त्यावेळी इटलीचे सर्वेसर्वा मुसोलिनी होते.
मुसोलिनी हुकूमशाह होते. सर्व काही त्यांच्या इशाऱ्यावर चालत होते. पण एवढे सारे हाताशी असताना त्यांना सुख अजिबात मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांना रात्री झोपच लागत नव्हती. त्यांना निद्रानाशाचा रोग झाला होता. त्या काळात मागची सहा महिने मुसोलिनी झोपलेच नव्हते! म्हणजे रात्री त्यांना झोप लागायची पण काही मिनिटांनी पुन्हा त्यांची झोप उडायची. अखंड साऊंड स्लिप त्यांना मिळत नव्हती. याच काळात पं. ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) इटलीमध्ये होते.
मुसोलिनी यांची एक प्रेयसी होती. तिला भारतीय संगीताचा चमत्कार आणि जादू माहिती होती. ती पंडित ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) यांना भेटली आणि त्यांना विनंती केली की, “तुम्ही तुमच्या संगीताचे उपचार मुसोलिनी यांच्या निद्रानाशावर करा!” मुसोलिनींचा आदेश म्हटल्यानंतर ओंकारनाथ त्यांच्याकडे गेले. त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी सांगितले, “मी सांगतो त्या पद्धतीने करा. पुढचे तीन दिवस फक्त शाकाहारी भोजन करा. संध्याकाळी थोडसं लवकर भोजन करा.” तिसऱ्या दिवशी ते पुन्हा मुसोलिनी यांना भेटायला गेले. सायंकाळी लवकर मुसोलिनी यांनी शाकाहारी भोजन केले. थोडा फलाहार केला.
=============
हे देखील वाचा : Amit Kumar : ‘ही’ गाणी अमित कुमारकडून कुमार सानूकडे कशी गेली?
=============
त्यानंतर ओंकारनाथ (Omkarnath Thakur) यांनी त्यांना त्यांच्या शयनकक्षात झोपायला पाठवले आणि त्या शयनकक्षाच्या एका बाजूला त्यांनी मैफल सुरू केली. त्यांनी त्या रात्री आपल्या मैफिलीची सुरुवात यमन रागाने केली. मग यमन कल्याण, शिवरंजनी, बागेश्री, चंद्रहास, मारवा… संगीत आणि वादन यामुळे मुसोलिनी यांना एक सुकून मिळू लागला. एक शांतता मिळू लागली आणि त्याने डोळे मिटले आणि निद्रेच्या स्वाधीन झाले. इकडे ओंकारनाथ भारतीय राग संगीताची मैफल साकारत होते नंतर त्यांनी पाहिलं मुसोलिनी यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला असून त्यांना शांत झोप लागली आहे, मग त्यांनी गाणं थांबवलं आणि फक्त हळू आवाजात वादन सुरू केलं. पहाटे जेव्हा मुसोलिनी यांना जाग आली त्यांचा चेहरा तृप्त वाटत होता.
ते ओंकारनाथ यांना म्हणाले, “मागच्या सहा महिन्यात मला इतकी चांगली झोप लागली नव्हती. आता मला खूप फ्रेश वाटत आहे.” सकाळी ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) यांना दोन पत्र मुसोलिनी यांच्याकडून प्राप्त झाली. एका पत्रात त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले होते आणि दुसऱ्या पत्रात त्यांना इटलीच्या नागरिकत्व बहाल करून तिथल्या एका संगीत महाविद्यालयात प्राचार्य पदाची नेमणूक केली होती. पण पंडित ओंकारनाथ ठाकूर यांनी ही विनंती नम्रपणे नाकारली आणि मला भारतात काही काम करायचे आहे असे म्हणून ते म्हणाले की, “मला निरोप द्या.” त्यावर हुकुमशहा मुसोलिनी यांनी सांगितल की, “मर्जी आपली. पण हा देश देखील तुमचाच आहे. तुम्ही केव्हाही इथे येऊ शकता राहू शकता.” नंतर काही दिवसांचा पाहुणचार घेऊन ओंकारनाथ मायदेशी आले.
ओंकारनाथ ठाकूर (Omkarnath Thakur) यांनी संगीतावर एक महान ग्रंथ लिहिला होता. त्यांना संगीत नाटक अकॅडमीचे अवॉर्ड मिळाले होते. १९५५ साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. २९ डिसेंबर १९६७ रोजी पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दीला १९९७ साली भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ डाक तिकीट जारी केले. सुरतमध्ये त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. तर इटलीमध्ये देखील त्यांचे स्मारक आज देखील दिमाखात उभे आहे. एका भारतीय संगीततज्ञाचा हा फार मोठा सन्मान आहे. पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचे अनेक ऑडिओ युट्युबवर उपलब्ध आहे.