पास बैठो तबीयत बहल जायेगी ….
कलावंताची प्रतिभा कधी खुलेल आणि कधी रूसेल याचा काही नेम नसतो. सिनेमात असे अनेक किस्से आहेत ज्यात ऐन वॆळी कलावंत एकदम स्वीच ऑफ होवून जातात जणू काही काळासाठी त्यांच्यातील प्रतिभेने त्यांच्या पासून फारकत घेतली असते. हिंदी सिनेमाच्या सुवर्ण काळातील हे गाणे आहे त्याचा किस्सा आधी बघूया.
हे गाणं हिच आज या सिनेमाची ओळख राहिली आहे कारण हा सिनेमा काही चाललाच नाही पण गाणं आजही लोकप्रिय आहे. संगीतकार होते सी अर्जुन आणि गीतकार होते इंदीवर. दिग्दर्शकाला इथे हळवं प्रेमगीत हवं होतं. गाण्याची सिच्युवेशन अशी होती नवीन लग्न झालेली जोडी पोर्णिमेच्या टिपूर चांदण्यात नदी किनारी बसली आहेत. नायिका गावाकडची आहे, अबोल आहे, लाजरी आहे, संकोचलेली आहे. लग्न होवूनही ती नायकाच्या शेजारी बसायला संकोचते आहे. या प्रसंगाला समयोचित गाणं हव होतं.
इंदीवर सारख्या नामचिन गीतकाराला हवं तस गाणं काही सुचेना. त्यांनी अनेक मुखडे लिहिले, पुन्हा फाडून टाकले. इतकी रोमॅंटीक सिच्युवेशन आणि आपल्याला शब्द का सुचत नाहीत यामुळे आता स्वत:वरच चीड चीड सुरू झाली. डोक्याचा अक्षरश: भुगा व्हायची वेळ झाली पण हवे ते शब्द सुचत नव्हते. अशा तळमळीत दोन दिवस गेले. डोक्यात सतत त्या प्रसंगाचा व गाण्याचाच विचार.
तिसर्या दिवशी गीतकार इंदिवर अंधेरीहून बांद्र्याला बेस्टच्या बसने येत होते. एक सुंदर मुलगी त्यांच्या शेजारी येवून बसली. तिचं रूप, तिचं सौंदर्य, तिचा गंध, तिचं अस्तित्व यात गीतकार हरवून गेले. पण काही वेळातच तिचा स्टॉप आला व ती उतरून गेली. उतरताना तिनं गीतकाराकडे बघून मंद स्मित केलं. गीतकाराची ७२ तासापूर्वी हरवलेली प्रतिभा जागी झाली. लगोलग त्यांनी बेस्ट तिकीटाच्या पाठीमागे मुखडा लिहून काढला… ’पास बैठो तबीयत बहल जायेगी मौत भी आगयी हो तो टल जायेगी !’ बांद्रा येईपर्यंत संपूर्ण गाणं तयार झालं. सी अर्जुन यांनी अतिशय मधुर चाल या गाण्याला लावली व रफीने धुंद स्वरात गावून गाण्याला चार चांद लावले. चित्रपट होता १९६४ ’पुनर्मिलन’ आणि चित्रीत झालं होत हास्य अभिनेता जगदीप व अमीतावर!