पम्मी तिथे काय कम्मी : अपूर्वा सांगतेय पम्मीचा प्रवास
रात्रीस खेळ चाले या मालिकेतून घराघरात पोचलेली सगळ्यांची आवडती शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. शेवंतानंतर ती आता झी युवा वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतय’ या मालिकेतून पम्मी या नव्या भूमिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीरच ‘पम्मी तिथे काय कम्मी’ आणि ‘ओह माय गॉड’ असे तिचे डायलॉग खूप गाजत आहे. पम्मीची भूमिका, भूमिकेची तयारी, मालिका करतानाचा अनुभव, ट्रोलिंग याविषयी तिने कलाकृती मिडियाशी मारलेल्या दिलखुलास गप्पा .
१. शेवंताने तुला काय दिलं?
शेवंतामुळे नावलौकिक आणि लोकप्रियता मिळालीच. पण एक अभिनेत्री म्हणून केवळ कपड्यांवरून बोल्डनेस न दाखवता डोळ्यांमधून ती मादकता कशी दाखवायची हे शिकवलं. या व्यक्तिरेखेने खूप संयम शिकवला. शेवंतामुळे आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.
२. आता पम्मी कशी आहे?
पम्मी छोट्या – मोठ्या भूमिका करणारी अभिनेत्री आहे. ती प्रसिद्ध नसूनही तिला असं वाटतं की तिला जग ओळखतं. प्रचंड श्रीमंत असल्याने आर्थिक गरज म्हणून ती अभिनय करत नाही. तिला भपकेगिरी करायला खूप आवडते. पम्मी ही कॉमेडी व्यक्तिरेखा आहे. गरज नसते तिथेही ती जाऊन ‘मी आहे मी आहे’ असं सांगणारी पम्मी आहे. म्हणून ती सातत्याने म्हणत असते ‘पम्मी तिथे काय कम्मी!’ पम्मीची पदर पकडण्याची स्टाइल, बोलण्याची वेगळी लकब या सगळ्यात मला वेगळेपण जपावं लागतं.
३. अपूर्वा आणि पम्मीमध्ये काय साम्य आहे?
काहीच साम्य नाही. आम्ही जरी दोघी अभिनेत्री असलो तरी पम्मी सतत अभिनेत्रीचा आविर्भाव घेऊन जगणारी आहे. मी कोणीतरी वेगळी आहे हे दाखवण्याचा पम्मीचा सारखा अट्टहास असतो. मी अशी आजिबात नाही. पम्मीला खूप सजायला, मेकअप करायला आवडतो. पण मी घरी असते तेव्हा केसांचा एक आंबाडा असतो. कुठलाही मेकअप केलेला नसतो. त्यामुळे पम्मीच्या मानाने अपूर्वा खूपच साधी आहे.
४. पमीसाठी काय वेगळी तयारी करावी लागते? आव्हानं काय आहेत साकारताना?
‘रात्रीस खेळ चाले’चा शेवटचा एपिसोड प्रसारित झाला आणि दुसर्याच दिवशी मला पम्मीसाठी विचारणा झाली. शेवंता ही पंचेचाळीस वर्षांची स्त्री होती ज्यासाठी मी माझं १२ किलो वजन वाढवलं होतं. केसांचा रंग बदलला होता. आणि आता ‘तुझं माझं जमतय’ मधील पम्मी जी मी साकारतेय तिचं वय ३० आहे. ती नखरेल, नाटकी, टापटीप राहणारी श्रीमंत स्त्री आहे. त्यामुळे मला आधी केसांचा रंग पुन्हा बदलायला लागला. वजन कमी करावं लागलं. त्यामुळे जेव्हा सेटवर बाकी सगळे मस्त जेवणावर ताव मारत असतात तेव्हा मी वजन वाढू नये म्हणून सलाड किंवा घरगुती जेवण जेवत असते. यासाठी माझी आई खास माझ्याबरोबर येऊन अहमदनगरमध्ये राहिली आहे.
५. दिग्गजांबरोबरच आता नवीन कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे ?
आमच्या मालिकेत अनेकजण नवखे आहेत. मालिका आत्ताच सुरू झाली आहे त्यामुळे एकमेकांना समजून घेत, आधार देत आम्ही पुढे जातोय. माझे जास्त सीन्स हे माधवी गोगटे यांच्याबरोबर असतात. त्याही मुरलेल्या अभिनेत्री असल्याने त्यांच्याबरोबर काम करताना वेगळीच मज्जा येते. ‘तुझं माझं जमतय’ मालिकेमध्ये आमची ठसन दाखवल्याने रिअॅक्शन्स काढायला खूप वाव मिळतो.
६. ट्रोलिंगकडे कसं बघतेस?
मला मिम्स, ट्रोलिंग हा एक यशाचा भाग वाटतो. कारण ज्या लोकांपर्यंत आपण पोचू शकत नाही त्यांच्याचबद्दल आपण बोलतो असं मला कायम वाटतं. मी माझ्या कौतुकाला किंवा माझ्यावर झालेल्या टीकेला फारसं महत्त्व देत नाही. पण अगदीच पाणी डोक्यावरून जायला लागलं तर मग मी योग्य शब्दांत प्रत्युत्तर देते.
७. एखादी भूमिका स्विकारताना नेमकं काय बघतेस?
मी जेव्हा सुरूवात केली तेव्हा मी याच क्षेत्रात करिअर करायचं वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं. एक-दोन मालिका केल्यानंतर मी उच्चशिक्षणाकरता लंडनला जाणार होते. पण त्यानंतर अभिनयक्षेत्र हे आवडीचं झालं. एकामागोमाग एक वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या. मग माझं या क्षेत्रात काम करायचं हे नक्की झालं. आता इतक्या वर्षांनंतर मला स्वत:ला एखादी भूमिका नाही आवडली तर मी ती स्विकारत नाही. एक काळ असा होता की त्याच बाजाच्या, टिपिकल सासू-सूना या प्रकारच्या भूमिका मला सातत्याने येत होत्या. पण माझं मन त्यात फारसं रमत नाही. त्यामुळे मी त्या नाकारून नाटकात कामं केली. नाटकात अभिनयाला लगेच दाद मिळते. मला सतत प्रयोगशील राहयला आवडतं. एक अभिनेत्री म्हणून जिथे माझ्या अभिनयाचा कस लागेल, वेगवेगळी आव्हानं घेऊन, विविध प्रकारच्या भूमिका साकारायला मला आवडतात.
रॅपिड फायर :
१. पाणी पुरी की भेळपुरी : पाणीपुरी
२. सुबोध भावे की सुनिल बर्वे : सुनिल बर्वे
३. नाटक की मालिका : नाटक
४. शेवंता की पम्मी : शेवंता
मुलाखत आणि शब्दांकन : गौरी भिडे