‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
कालीन भैय्या: मिर्झापूरचा ‘बाप’माणूस!
कालीन भैय्याच्या भूमिकेत पंकज त्रिपाठींना (Pankaj Tripathi) पाहून आश्चर्य वाटणं साहजिकच होतं कारण नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सॅक्रेड गेम्स’च्या पहिल्या सीझनमध्ये त्यांना गुरुजींच्या सोज्वळ, शांत भूमिकेत पाहण्यात आलं होतं. एखादा बगळा जसा शिकारीपुर्वी एखाद्या व्रतस्थ संन्याशाप्रमाणे ध्यान करतो, त्याप्रमाणे कालीन भैय्या आपल्या संयत देहबोलीतून स्वतःचं ‘बाहुबली’ असणं सहजासहजी जाणवून देत नाहीत.
राजकीयदृष्ट्या, मिर्झापूर (Mirzapur) हा पूर्वांचलचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. इथली लोकसंख्या, उद्योगधंद्यांसाठी उपलब्ध संसाधने पाहता प्रत्येकाचाच या शहरावर डोळा आहे, पण मिर्झापूरवर फक्त आणि फक्त त्रिपाठी खानदानाचीच सत्ता आहे. सत्यानंद त्रिपाठींनी उर्फ बाऊजींनी या शहरावर हुकूमत मिळवली आणि वंशपरंपरागत ही जबाबदारी त्यांच्या मुलावर, अखंडानंदवर सोपवली ज्यांना ‘कालीन भैय्या’ या टोपण नावाने ओळखलं जातं. कालीन या शब्दाचा अर्थ होतो गालिचा. आपण एक सभ्य आणि ‘शालीन’ व्यापारी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी या वरवरच्या कार्पेटच्या धंद्याचा वापर करून ‘कालीन भैय्या’ (kalin bhaiya) हे नामाभिधान अखंडानंद मिरवताना दिसतो.
पण या ‘बाहुबली’ कालीन भैय्याचा खरा व्यापार हा कार्पेटचा नसून अफू आणि बंदुकीचा आहे. गालिचे बनवताना त्यातून अफू निर्यात करण्याच्या जोडधंद्याला हा गावठी पिस्तुलांचा धंदा डॉमिनेट करतो. मिर्झापूरवर दहशत गाजवण्यासाठी या धंद्याचा पुरेपूर वापर कालीन भैय्यांनी केला असून, यातून मिळणाऱ्या आर्थिक लाभाच्या जोरावर त्यांनी पोलीस यंत्रणेबरोबरच राजकारण्यांनाही आपल्या खिशात टाकलं आहे. कायद्याची कसलीही भीती नसल्याने कालीन भैय्यांच्या कृपाशीर्वादाने मिर्झापूर आणि पंचक्रोशीत खुलेमाम हिंसाचार, रक्तपाताच्या घडामोडींना उधाण येतं.
मिर्झापूरमध्ये वाढणाऱ्या हिंसाचाराचं कारण आपणच आहोत, हे माहित असूनही या सर्व प्रकरणांपासून नामानिराळं राहण्याची कला कालीन भैय्यांना चांगलीच अवगत आहे. त्यामुळे नव्या SSP मौर्यला पहिल्या भेटीत शहराचे ‘बाहुबली’ असल्याचं न जाणवू देता एक व्यापारी म्हणून आपली ओळख पटवून देतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कुठल्याही थराला जायला तयार असलेला हा माणूस रतिशंकरसारख्या आपल्या एकेकाळच्या घनिष्ठ मित्रालाही दगा देतो आणि मिर्झापूरच्या गादीवर हक्क मिळवतो. गोड बोलून तो आपल्या बरोबरीच्या मकबूलला नकळत स्वतःचा अंगरक्षकही बनवून टाकतो. मुन्नाला ‘फॅमिली’ आणि ‘वफादार’ या संकल्पना समजावून वेळ आल्यावर आपल्या स्वार्थासाठी ‘वफादार’ असलेल्यांचा बळी कसा द्यावा, हे शिकवण्यासाठी तो ललितला ‘वफादार’ बनवतो.
कालीन भैय्या ज्या सिंहासनावर बसलेत ते सिंहासन, त्या सिंहासनापर्यंतचा प्रवास आणि डोक्यावरचा मुकुट काटेरी असल्याची जाणीव त्यांना पदोपदी होत राहते. आपला एकुलता एक मुलगा फुलचंद उर्फ मुन्नाभैय्या हा त्या सिंहासनाचा वारस असून, मिर्झापूरवर हुकूमत गाजवण्यासाठी तो उतावीळ झाला असल्याची जाण त्यांना आहे. जरी दाखवत नसले तरी मुन्नावर त्यांचं अतोनात प्रेम आहे पण मुन्ना उत्साहाच्या भरात करत असलेल्या चुकांकडे दुर्लक्ष न करता ते वारंवार त्याची कडक (अप)शब्दांत सर्वांसमोर त्याची कानउघाडणी करतात, ज्यामुळे मुन्नाला सदैव अपमानित झाल्यासारखं वाटतं. मुन्नाला मारहाण केलेल्या गुड्डू आणि बबलूला जेव्हा ते आपल्या गँगमध्ये सामील करून घेतात, तेव्हा सगळ्यांनाच याचं आश्चर्य वाटतं पण धंदा वाढवण्यासाठी हे दोघेही फायद्याचे ठरतील असा त्यांचा ठाम विश्वास असतो.
एकीकडे दगाफटक्याचा बदला घेण्यासाठी धुमसत असलेला रतिशंकर, सत्तेच्या लालसेपायी जीवावर उठलेला मुन्नाभैय्या, गुड्डू आणि बबलू पंडित ही बंडखोर भावंडं, इलेक्शन फंडासाठी हपापलेला जेपी यादव आणि अवैध धंद्यांना बंद करू पाहणारी पोलीस यंत्रणा, अश्या सर्व बाजूंनी कोंडीत सापडलेल्या कालीन भैय्यांची मनस्थिती मात्र कायमच अतिशय भक्कम असते. एकदाही त्यांचा स्वतःवरील संयम ढासळत नाही. जणू प्रत्येक गोष्टीची आपल्याला पूर्वकल्पना आहे, अश्या थाटात ते सर्व संकटाना पद्धतशीर दूर करत निघतात.
वेळ आल्यावर ते मुन्नाची बाजू घेऊन, त्याला आवश्यक ते अधिकार देऊन बाप म्हणून स्वतःचं पारडं जड करतात आणि मुन्नाकरवी पंडित भावंडांच्या बंडाला लगाम घालतात. SSP मौर्यची स्पेशल टीम संपवून त्यांना ‘व्यापारी’ अखंडानंद आणि ‘बाहुबली’ कालीन भैय्या हा फरक मिर्झापूरी पद्धतीने समजवतात. जेपी यादवचे नखरे सहन करण्यापेक्षा सरळ मुख्यमंत्री असलेल्या त्याच्या मोठ्या भावाला भेटून ताणलेले व्यावहारिक संबंध सुरळीत करतात. मुख्यमंत्र्याच्या विधवा मुलीला आपली सून म्हणून स्वीकारून ते या व्यावहारिक मैत्रीचं रुपांतर नात्यात करतात आणि सक्रीय राजकारणातही आपली जागा पक्की करून टाकतात. मुख्यमंत्र्याच्या आकस्मिक निधनानंतर कालीन भैय्या जेपीच्या सेक्रेटरीला हाताशी धरून जेपीची राजकीय कारकीर्द संपवतात आणि मुख्यमंत्रीपदाकडे वाटचाल सुरु करतात. पण नवी सून त्यांचे सर्व मनसुबे उधळून लावत मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेते.
=====
=====
वारंवार मिर्झापूरच्या गादीचा ताबा मागितल्यानंतरही आपल्यावर अन्याय होत असल्याची खंत मुन्ना बोलून दाखवतो. सुनेचं राजकारण आणि मुलाने पुकारलेल्या उघड बंडापुढे कालीन भैय्या खचून जातात. एकीकडे त्रिपाठी खानदानाला लाभलेल्या नवा वारसाच्या सुरक्षिततेची काळजी (मुन्नाचा सावत्र भाऊ) आणि दुसरीकडे मुन्नाच्या वाढत्या उपद्व्यापांना घालता न येणारे निर्बंध कालीन भैय्यांना हतबल करतात. बाऊजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मुन्ना पुन्हा एकदा वाद घालून मिर्झापूरकडे परततो पण यावेळी त्याच्यावरच सावत्र आईच्या प्रियकराकडून हल्ला होतो आणि त्यासाठी कालीन भैय्या जबाबदार असल्याचं त्याला खोटंच सांगण्यात येतं.
सुडाने पेटलेला मुन्ना कालीन भैय्याला संपवण्यासाठी निघतो. बदला घेण्यासाठी उत्सुक असलेले गुड्डू, गोलू आणि शरद या संधीचा लाभ घेण्याचं ठरवतात आणि मुन्ना व कालीन भैय्याला एकत्रच संपवण्याची योजना आखतात. इकडे मुन्ना कालीन भैय्याला मारण्यासाठी त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो खरा, पण मृत्यू समोर असतानाही क्षणभरासाठी विचलित न झालेला बाप पाहून तो हबकून जातो. या शेवटच्या प्रसंगात मुन्ना आणि कालीन भैय्याऐवजी सत्ता मिळवू पाहणारा मुलगा आणि मुलाच्या शोधात असलेला बाप प्रेक्षकांना पाहायला मिळतो.
“बाप कभी बेटोंको मारनेका नही सोचते, मुन्ना” म्हणणारा हा बाप मिर्झापूरचा राजा असलेल्या कालीन भैय्यापेक्षाही महान ठरतो. मुन्नाची मिर्झापूरबद्दलची आत्मीयता समजल्यावर मुलाला निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सोपवून फक्त सल्ला देण्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवत हा राजा मिर्झापूरच्या सिंहासनावरून पायउतार होतो. पहिल्या सीझनच्या क्लायमॅक्समध्ये ‘बाहुबली’ असणारा अखंडानंद त्रिपाठी दुसऱ्या सिझनच्या ह्या क्लायमॅक्समध्ये फक्त एक ‘बाप’ म्हणून मागे उरतो…
=====
हे नक्की वाचा: पुढच्या सिजनचा किंग ऑफ मिर्झापूर कोण? त्यागी का आणखीन कोण?
=====