Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Movie Review : पावनखिंड (Pawankhind) – माहितीपूर्ण, थरारक आणि संतुलितही!
शिलेदार शिवा (नरवीर) काशीदच्या हत्येनंतर पिसाळलेल्या सिद्दी जौहरने सिद्दी मसूदला शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्याचा हुकूम केला. मसूद हजारोंचं सैन्य घेऊन महाराजांना गिरफ्तार करण्यासाठी निघाला.
तो झाडा-झुडपातून महाराजांचा माग काढत पाठलाग करू लागला. पावसाचं थैमान सुरूच होतं. पौर्णिमेचा चंद्र तर पावसाच्या काळ्या ढगांआड लपलेला होता. महाराज काही शे मावळे घेऊन विशाळगडाची वाट चालत होते. पडणारा मुसळधार पाऊस, वादळ वारा आणि सह्याद्री जणू बांदल सेनेची साथ देत गनीमांना मागे सारत होतं.
महाराजांच्या जीवांच्या रक्षणासाठी घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे एखाद्या पहाडासारखे उभे होते. महाराज देखील म्यानातून तलवार काढून गनिमांना यमसदनी धाडण्यासाठी तयार होते. पण, वयाने वडीलधारी बाजीप्रभूंच्या विनंतीवजा आदेशाने महाराज पुढे विशाळगडाकडे निघाले. त्याप्रसंगी बाजींच्या तोंडी उद्दगार असतात की, ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाजला पाहिजे…!’ हा संवाद आणि ही थरारक गोष्ट आपल्या सर्वानांच ठाऊक आहे.

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात किंवा ऐतिहासिक पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला ही घटना कमी-अधिक फरकाने माहिती आहे. पण, या घटनेच्या पलीकडे जाऊन महाराजांच्या शिलेदारांच्या पराक्रमाची गाथा लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने त्यांच्या ‘पावनखिंड (Pawankhind)’ सिनेमात मांडली आहे. सोबतच उपरोक्त घटनेची पार्श्वभूमी, त्याची आखणी आणि बांदल सेनेचे शौर्य उत्कृष्टपणे दिग्दर्शकाने सिनेमात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत गनिमांची झुंज देणारी बांदल सेना; बाजीप्रभू देशपांडे (अजय पुरकर), रायाजीराव बांदल (अंकित मोहन) बहिर्जी नाईक (हरीश दुधाडे), फुलाजीप्रभु देशपांडे (सुनील जाधव) या शूरवीर योद्धयांची शौर्यगाथा त्यामागील कौटुंबिक कहाणी देखील सिनेमात आपल्याला पाहायला मिळते. हा थरारक लढा अतिशय उत्कृष्ट पद्धतिने विविध बारकाव्यांसह लेखक, दिग्दर्शक म्हणून लिलया दिग्पालने पडद्यावर चितारला आहे.
कलाकारांनी देखील त्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीने काम केले आहे. ज्याचे दर्शन पटकथेत वेळोवेळी होते. विशेष कौतुक करायचं झाल्यास बाजीप्रभूंच्या भूमिकेत असलेल्या अजय पुरकर आणि बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत असलेल्या हरीश दुधाडे याने आपापली व्यक्तिरेखा अफलातून साकारली आहे. अत्यंत जीव ओतून त्यांनी ही भूमिका उभी केली आहे.

बाजीप्रभूंच्या पात्रासाठी लागणारी शरीरयष्ठी आणि व्यक्तिमत्त्वाचं दर्शन अभिनेते अजय पुरकर यांनी पूर्णतयारीनिशी उभारल्याचे आपल्याला त्यांच्या कामाकडे पाहिल्यावर जाणवते. युद्धाच्या दृश्यांमधील त्यांचं काम अंगावर काटा आणणारे आहे. सोबतच सिद्दी मसूद भूमिकेत असलेल्या आस्ताद काळेने आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन या निमित्तानं घडवले आहे. भूमिकेची लांबी लहान असली तरी त्यांचा अभिनय विशेष लक्षात राहणारा आहे.
सिनेमाचा उत्तरार्ध काहीसा संथ आहे. एकामागोमाग घटना, संदर्भ पटकथेत दिल्याने प्रेक्षकांना तो रटाळ भासेल. परंतु माहितीपूर्ण ऐतिहासिक दाखले देण्यासाठी दिग्दर्शकाने असं केलं असावं. ‘पावनखिंड (Pawankhind)’ म्हटल्यावर आपण तो घोडखिंडीतला लढा पडद्यावर पाहण्यासाठी आतुर असतो. परंतु, त्या लढ्याचा सर्वोच्च बिंदू काढण्यासाठी त्यांचा सिनेमॅटिक परिणाम प्रेक्षकांवर व्हावा यासाठी सिनेमांच्या पूर्वार्धात कथानकात दाखवलेली पार्श्वभूमी महत्वाची ठरते.


पटकथेत दिग्पालने ऐतिहासिक दाखले शिताफिने दिले आहेत. जेणेकरून सिनेमा अधिकाधिक जिवंत होतो. साथीला असलेले सिनेसंगीतही लाजवाब आहे. ‘युगत मांडली’ हे गाणं विशेष लक्षात राहतं.
सिनेमांच्या केंद्रस्थानी जरी बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा असली तरी सिनेमात दिग्दर्शकाने प्रत्येक शूरवीराला योग्य स्थान दिले आहे. (प्रत्येक कलाकाराला योग्य स्क्रिन स्पेस मिळाली आहे.) जेणेकरून सिनेमा कथारूपी संतुलित झालाय.
अभिनेता चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारतोय, तर मृणाल कुलकर्णी पुन्हा राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत झळकतायत.या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अनुभवाला साजेसे सुरेख काम यावेळी केले आहेत.
=====
हे देखील वाचा: पावनखिंड – सिनेमाच्या ‘नावासाठीच’ त्यांनी लढवली खिंड
=====
सिनेमात युद्धांच्या दृश्यांचा थरार तांत्रिक पातळीवर अधिक चांगला झाला असता. व्हिएफएक्सच्या मर्यादा यात दिसून येतात. त्याचप्रमाणे पूर्वार्धातील संकलन देखील कमकुवत आहे. परिणामी सिनेमा तांत्रिकदृष्ट्या अधिक सकस होऊ शकला असता; असं म्हणायला हवं. निर्मितीमूल्याची मर्यादा पटकथेच्या आड आलेली दिसते. बाकी दिग्दर्शन आणि अभिनयाच्या पातळीवर सर्वांनीच चोख काम केलं आहे.
अक्षय वाघमारे, हरीश दुधाडे, वैभव मांगले, अजिंक्य नानावरे, आस्ताद काळे, समीर धर्माधिकारी, क्षिती जोग, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, सचिन भिलारे, बिपीन सुर्वे, विक्रम गायकवाड, शिवराज वायचळ या कलाकारांनी पडद्यावर रंगत आणली आहे. त्यामुळे हे अभिनयकौशल्य आणि ‘पावनखिंड (Pawankhind)’ सिनेमाचा थरार पाहण्यासाठी जरूर सिनेमागृहात जायला हवं.
सिनेमा: पावनखिंड (Pawankhind)
निर्मीती: आलमंड्स क्रिएशन्स निर्मित
लेखक/दिग्दर्शक: दिग्पाल लांजेकर
कलाकार: मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, हरीश दुधाडे
संगीत: देवदत्त मनिषा बाजी
छायांकन: अमोल गोळे
संकलन: प्रमोद कहार
दर्जा: साडे तीन स्टार