मराठी चित्रपटांचा ‘नादखुळा’ फिल्मफेअर ॲवॉर्ड शो!
२०१९मध्ये आपल्या दर्जेदार कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा फिल्मफेअर ॲवॉर्ड शो नुकताच पार पडला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असलेला हा कौतुकसोहळा आपल्या मायमराठीची मान उंचावणारा ठरला. ‘फत्तेशिकस्त’, ‘बाबा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘कागर’, ‘खारी बिस्कीट’, ‘हिरकणी’, ‘गर्लफ्रेंड’, ‘ट्रिपल सीट’, ‘मोगरा फुलला’ इत्यादी एकाहून एक सरस अश्या कलाकृतींचा ह्या मंचावर यथोचित सन्मान केला गेला.
‘फास्टर फेणे’च्या यशानंतर दणदणीत ‘धुरळा’ उडवत आलेल्या अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव या जबरीया जोडीच्या प्रभावी सूत्रसंचालनाने या सोहळ्यात बहार आणली. पूजा सावंत आणि गश्मीर महाजनीच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सने रोमँटिक झालेलं वातावरण अमृता खानविलकर, आणि मानसी नाईक खरेरा यांनी आपला डॅशिंग जलवा दाखवत वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ह्या सगळ्यांवर कडी केली ती वैभव तत्त्ववादीच्या भन्नाट डान्स स्टेप्सने आणि सोनाली कुलकर्णीच्या आगळ्यावेगळ्या डान्स परफॉर्मन्सने! सोनालीने यावेळी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना त्यांच्याच गाजलेल्या गाण्यांवर नृत्य करून अनोखा ट्रिब्युट दिला. चला तर, एक नजर टाकूयात या ५व्या ‘प्लॅनेट फिल्मफेअर मराठी ॲवॉर्डस्’ च्या पुरस्कार विजेत्यांवर..
सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिका (पुरुष): दीपक डोब्रियाल (बाबा)
‘ओंकारा’पासून ‘अंग्रेजी मिडीयम’पर्यंतच्या प्रवासातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या दीपकचा हा पहिलाच मराठी चित्रपट. ‘बाबा’मधील माधव या भूमिकेसाठी त्याला त्याचा पहिलावहिला मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला असून या चित्रपटात त्याने एका मूक बधिर पित्याची व्यक्तिरेखा साकारली होती.
सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिका (स्त्री): मुक्ता बर्वे (स्माईल प्लीज)
मुक्ताने ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटात डिमेन्शिया आजाराने ग्रस्त असलेल्या नंदिनीचं पात्र साकारलेलं आहे. घटस्फोटीत गृहिणी, यशस्वी एम्प्लॉयी, हळवी आई असे विविध कंगोरे या भूमिकेला असून आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर मुक्ताने हे पात्र जिवंत केलेलं आहे.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (पुरुष): शशांक शेंडे (कागर)
प्रभाकर देशमुख उर्फ गुरुजी हे खलनायकी बाजाचं पात्र रंगवताना शशांक शेंडेंनी कसलीही कसर सोडलेली नाही. शांत आणि संयत स्वभाव, बोलके डोळे आणि एखाद्या तत्त्ववेत्त्याप्रमाणे कसलेली संवादशैली या भांडवलावर उभी केलेली गुरुजींची भूमिका चित्रपटावर एक वेगळाच छाप पाडते.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (स्त्री): नीना कुलकर्णी (मोगरा फुलला)
आई आणि मुलाच्या नात्यातील कडू-गोड आठवणींचा दरवळ जपणारा हा चित्रपट. यात नीना कुलकर्णी यांनी सुनीलच्या आईची भूमिका साकारली होती. अगदीच श्रावणबाळासारख्या आज्ञाधारक असलेल्या आपल्या मुलाबद्दल अतिशय पझेसिव्ह असलेली आई नीनाजींनी अतिशय सुरेख साकारली आहे.
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)
दृष्टिदोष असलेली लहान बहिण आणि तिच्या आनंदासाठी आकाशपाताळ एक करणारा तिचा भाऊ या दोन लहान मुलांची गोष्ट म्हणजे ‘खारी बिस्कीट’. अवघ्या सहा वर्षांच्या वेदश्रीने खारीच्या भूमिकेत कमाल केली असून, तिला बिस्कीटदादाच्या भूमिकेतील ९ वर्षीय आदर्शची अतिशय उत्तम साथ लाभलेली आहे.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष): आदर्श शिंदे (तुला जपणार आहे – खारी बिस्किट)
आपल्या अंध बहिणीच्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या आणि पदोपदी तिची काळजी घेणाऱ्या बिस्कीटच्या निरागस स्वभावातील गोडवा आदर्शच्या जादुई स्वरांमधूनही व्यवस्थित जाणवतो.
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सिंगर (महिला): शाल्मली खोलगडे (केरीदा केरीदो – गर्लफ्रेंड)
स्पॅनिश भाषेतील बरेचसे शब्द असलेलं हे गाणं जर कुणी गावं तर ते शाल्मलीसारख्या वेस्टर्न आणि पॉप गायनशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या गायिकेनंच! स्पॅनिश भाषा न समजणाऱ्यांनाही हे गाणं श्रवणीय वाटतं, यात शाल्मलीचा मोलाचा वाटा आहे.
सर्वोत्कृष्ट गीत: क्षितिज पटवर्धन (तुला जपणार आहे – खारी बिस्किट)
“कधी हसणार आहे, कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे”
बिस्कीटने खारीची उचललेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी या गाण्याचे बोलच पुरेसे आहेत. कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्याला समर्पक असं हे गाणं क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून अवतरलं आहे.
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: सौरभ भालेराव, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी (आनंदी गोपाळ)
रंग माळियेला, तू आहेस ना, वाटा वाटा वाटा गं, माझे माऊली आणि आनंदघन सारखी सुमधुर गाणी ‘आनंदी गोपाळ’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ऐकता आली. जसराज जोशी, हृषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांच्या प्रभावी संगीत दिग्दर्शनामुळे १९व्या शतकातील लोकसंस्कृतीचा सुरेल सांगीतिक आस्वाद प्रेक्षकांना घेता आला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: समीर विद्वांस (आनंदी गोपाळ)
‘लोकमान्य’च्या घवघवीत यशानंतर पुन्हा एकदा आणखी एका व्यक्तीचं आत्मचरित्र पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य समीरने अगदी लीलया पेललं आहे. कथेची मुद्देसूद मांडणी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आशय हि समीकरणे जुळवण्यात समीर यशस्वी ठरला असून, ‘आनंदी गोपाळ’ सारख्या दर्जेदार कलाकृतीचा दिग्दर्शक म्हणून त्याने हा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट: (आनंदी गोपाळ)
प्रथम भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवलेल्या आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट २०१९चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने गौरवला गेला. सुश्राव्य संगीत, कसदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाचं उत्तम उदाहरण म्हणून ‘आनंदी गोपाळ’ इतर चित्रपटांच्या तुलनेत वरचढ ठरला.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांना त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीला प्रदान केलेल्या अमुल्य योगदानासाठी आणि देदीप्यमान कामगिरीसाठी ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. राज आर. गुप्ता दिग्दर्शित ‘बाबा’ या चित्रपटाला समीक्षकांनी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून गौरविले तर ‘आनंदी गोपाळ’मध्ये गोपाळरावांची भूमिका साकारणाऱ्या ललित प्रभाकरला ‘समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेसाठी पुरस्कार (पुरुष)’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘हिरकणी’साठी सोनाली कुलकर्णी तर ‘आनंदी गोपाळ’साठी भाग्यश्री मिलिंद या दोन्ही गुणी अभिनेत्रींना ‘समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट प्रमुख भूमिकेसाठी पुरस्कार (स्त्री)’ या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘ट्रिपल सीट’मधून आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या शिवानी सुर्वेला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)’ या पुरस्काराने; तर आपल्या देहबोलीचा आणि भाषेचा रांगडेपणा दाखवत ‘कागर’मधून पदार्पण करणाऱ्या शुभंकर तावडेला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘वेडिंगचा शिनेमा’ हि हलकीफुलकी कौटुंबिक कथा पडद्यावर साकारणाऱ्या सलील कुलकर्णीला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक)’ हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
तांत्रिक विभागातील पटकथा, संवाद, निर्मिती, संपादन, छायाचित्रण इत्यादी पुरस्कारांवर ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने आपली मोहोर उमटवली. ‘बाबा’ या चित्रपटासाठी मनिष सिंग यांना ‘सर्वोत्कृष्ट मूळ कथा’ हा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. फत्तेशिकस्त’साठी निखिल लांजेकर आणि हिमांशु आंबेकर यांना ‘सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन’ तर पौर्णिमा ओक यांना ‘सर्वोत्कृष्ट वेशभूषा’ या फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ‘गर्लफ्रेंड’ साठी राहुल ठोंबरे आणि संजीव हवालदार यांना ‘सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन’ तर सौरभ भालेराव यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ हे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.