Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’ गोष्ट
मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त गाजलेली आणि अमाप लोकप्रियता मिळवलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेने लोकप्रियतेचे उच्चांक गाठत मोठे यश संपादन केले. येत्या ३० नोव्हेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. मालिका संपत असल्यामुळे प्रेक्षकांसह कलाकार देखील दुःखी आहेत. पाच वर्षांपासून सगळ्यांच्याच रोजच्या जीवनाचा ही मालिका भाग बनली होती.
आई कुठे काय करते ही मालिका संपत असल्यामुळे कलाकार तर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, सोबतच प्रेक्षक देखील त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी आतापर्यंत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. मात्र आता मालिकेत ‘अनिरुद्ध’ ही नकारात्मक मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देत या मालिकेच्या सेटवरील एक वस्तू आठवण म्हणून घरी नेत असल्याचे सांगितले.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “१९ नोव्हेंबर २०२४ ‘आई कुठे काय करते’चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं. २० तारखेला मतदान आणि २१ तारखेला ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ चं ‘आई कुठे काय करते’च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं. म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूम मध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो.
बंगल्याचा सेटिंगचा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं. मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला, हिच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक.
आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता. अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी-खरी वाटत होती आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तर तो एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं.
यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर-सुंदर गणपतीच्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन केली जाते. तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकांचं होत असावं. खरंतर, हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं, एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणारं घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो.
राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो. स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये ४० लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्टरूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल्स, ९० टक्के शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं. फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो.
ते पण दोन-चार किलोमीटरच्या परिसरात, तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डीकेपीच्या ‘अनुपमा’च्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचं रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणालं नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय.”
मिलिंद यांनी या पोस्टसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये समृद्धी बंगला तोडताना दिसत आहे, सोबतच काही जुने व्हिडिओ देखील त्यांनी यात जोडले आहेत. एकूणच काय तर मिलिंद यांनी या व्हिडिओमध्ये त्यांचा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंतचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत मालिका संपत असल्याचे दुःख होत आहे असे म्हटले आहे.