मानवी नातेसंबंधाची निसर्गरम्य कथा… ‘द पोस्टमन इन द माऊंटन’
सध्या दिवस ई-मेल चे आहेत. आपल्याला अपेक्षित असणा-या पत्राची वाट पाहताना लागणारी हुरहूर, अचानकपणे एखादं पत्र किंवा तार आल्यानंतर होणारा आनंद, क्वचित प्रसंगी दुःख या सगळ्या भावना काळाआड गेल्यात. फेसबुक, व्हॉट्सअपच्या आभासी जगात पेन फ्रेंडने लिहिलेल्या पत्राची खुमारी संपून गेलेय. लॅपटॉपच्या स्क्रिनवरुन पत्र डिलिट करता येत असली तरीही पोस्टमनने आणून दिलेली पत्र ज्यांनी जपून ठेवली आहेत ती नष्ट करण्याचा धीर होत नसणार हे निश्चित ! पोस्टमन आणि त्याने आणलेली पत्र, या काही फार फार वर्षांपूर्वीच्या गोष्टी नव्हेत. ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये पोस्टमनशी आपलं जिव्हाळ्याचं नातं जुळलेलं असायचं. दूरवर राहणा-या नातेवाईकांची खुशाली असो की नोकरी लागल्याची खुशखबर, पोस्टमनच्या मार्फतच आपल्यापर्यंत पोहचायच्या. मनीऑर्डर किंवा मृत्यूची वार्ता पोस्टमनच आपल्यापर्यंत पोहचवायचा. पोस्टाची व्यवस्था अजूनही अबाधित असली तरीही पोस्टमनशी आपला जुळलेला दुवा हाऊसिंग सोसायटीज् व ई-मेल मुळे खिळखिळीत झालाय ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आठवतो तो १९९९ साली पाहिलेला ‘द पोस्टमन इन द माऊंटन’ हा चिनी चित्रपट. ह्यूओ जियानकी या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहताना चीनमधील हिरवेगार माऊंटन डोळ्यांना भुरळ पाडतात परंतु त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा असलेले पोस्टमन पिता-पुत्र कायमचे मनात ठाण मांडून बसतात.
प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याशी नातं जोडणारी कलाकृती जर सर्वश्रेष्ठ मानायची तर या कसोटीवर ‘द पोस्टमन इन द माऊंटन’ हा निश्चितच जागतिक स्तरावरील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानायला हवा. या चित्रपटाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कथा आहे शारिरीक व्याधीमुळे निवृत्त होऊ पाहणा-या एका पोस्टमनची. तो आपला कार्यभार आपल्या एकुलत्या एक मुलावर सोपवू इच्छितो. चीनमधील दुर्गम अशा डोंगरद-यांमध्ये वसलेल्या सुमारे दोनशे मैलाच्या परिसरात टपाल, मनीऑर्डर्स् पोहचवण्याचं काम हा पोस्टमन अनेक वर्ष निष्ठेने करीत असतो. आपल्या निवृत्तीनंतर मुलाने हे काम स्वीकारावं अशी त्याची इच्छा असते. आपल्या कार्यक्षेत्राचा, परिसराचा व तिथे राहणा-या माणसांचा परिचय करुन देण्यासाठी मुलासोबत तो निघतो. त्याच्या सोबतीला असतो त्याचा इमानी कुत्रा. पोस्टमन पिता पुत्रांचा डोंगरद-यांमधील प्रवास सुरु होतो. या प्रवासात बाप-लेकाला एकमेकांच्या अपरिचित स्वभावपैलूंचं दर्शन होतं. या दोघांच्या टपालवाटपाच्या प्रवासाची व एकमेकांना समजून घेण्याची तरल प्रक्रिया म्हणजे हा चित्रपट!
वडिलांबद्दल लहानपणापासूनच मुलाच्या मनात दुरावा निर्माण झालेला असतो, याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची पोस्टमनची नोकरी. लोकांची टपाल देत डोंगरद-यांमध्ये फिरणारे वडिल त्याच्या वाट्याला अभावानेच आलेले असतात. सर्वसामान्य मुलांप्रमाणेच या मुलाच्या मनात वडिलांबद्दल आदरयुक्त भीती आहे. या आदरापोटीच त्याची इच्छा नसतानाही तो पोस्टमनची नोकरी करण्यास तयार होतो.
बाप-लेकामधील हा दुरावा चित्रपटांच्या पहिल्या दृश्यांमधून अधोरेखित होतो. तरुणपणाच्या जोशामुळे मुलगा झपझप पुढे जातो तर गुडघेदुखीमुळे वडिल हळूहळू चालतात. या दोघांच्या वेगातील अंतर त्यांच्यातील मानसिक अंतरही स्पष्ट करते. मात्र त्यांच्या पहिल्या पडावातचं गावक-यांबरोबर असलेलं वडिलांचं जिव्हाळ्याचं नातं, गावातील मुलाचं वडिलांनी चॉकलेटस् देऊन केलेले कौतुक पाहून मुलगा भारावून जातो. डोंगरकपारीत वसलेल्या छोट्या छोट्या गावांमधून प्रवास करताना वडिलांनी पोस्टमनची नोकरी करताना घेतलेल्या कष्टांची जाणीव मुलाला होत जाते. आपल्या शिक्षणासाठी, सुखसोयींसाठी वडिलांनी केलेले कठोर परिश्रम आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं घराकडे आपल्या आईकडे झालेलं दुर्लक्ष या सर्व गोष्टींचा विचार तो सहानभूतीने करु लागतो. त्याचवेळी आपण स्वीकारलेलं काम सचोटीने पार पाडण्याचा संस्कारही नकळतपणे मुलाच्या मनावर होतो. चित्रपटाच्या शेवटी वडिलांचा पोस्टमनचा पेशा आपणही स्वीकारायचा हा निर्णय तो निश्चित करतो. वडिलांच्या नोकरीबरोबरच निष्ठेचा वारसाही त्याच्याकडे येतो.
पोस्टमनची नोकरी करता करता वडिलांनी अंगिकारलेले गुण मुलाने नकळत अंगीकारण्याचा एक प्रसंग दिग्दर्शकाने अत्यंत संवेदनशीलपणे चित्रित केला आहे. गावाबाहेर असलेल्या आडवाटेवरच्या घरात एक अंध वृद्ध स्त्री आपल्या नातवाच्या पत्राची व तो पाठवत असलेल्या मनीऑर्डची वाट पहात असते. वस्तुस्थिती अशी की, तिच्या नातवाने पैसे व पत्र पाठवण केव्हाच थांबवलेलं असतं. मात्र याची कुणकुण त्या वृद्धेला होऊ नये म्हणून पोस्टमन नियमितपणे तिला पैसे देत असतो व त्याचबरोबरीने एक कोर पत्र सुद्धा! या पत्रातील मजकूर तिला वाचून दाखवण्याचं कामही तो पार पाडत असतो. त्या पत्राचा हळूवार स्पर्श त्या वृद्धेसाठी अमूल्य असतो. यावेळी पोस्टमन आपल्या मुलाची ओळख त्या वृद्धेला करुन देतो. तिच्यासाठी वाचत असलेलं पत्र अर्ध्यावर थांबून आपल्या मुलाला वाचायला लावतो. मुलासाठी हा क्षण आत्यंतिक कसोटिचा असतो. मुलाने वाचलेला मजकूर वृद्धेसाठी नवा दिलासा देणारा असतो. तुमचा वारसा मी समर्थपणे पुढे चालवीन अशी ग्वाहीच जणू मुलगा पोस्टमनला देतो. या प्रसंगामुळे पिता-पुत्रातील अनुबंध दृढ होऊ लागतात. एकमेकांमधील अंतर कमी व्हायला लागतं.
आई आणि मुलगा हे नातं जितकं अधिक जिव्हाळ्याचं असतं तितकेच बाप-लेकामधील नातेसंबंध हे गुंतागुंतीचे असतात. आपल्या मुलाने आपला व्यवसाय पत्करावा ही वडिलांची असणारी सर्वसाधारण अपेक्षा पोस्टमनची देखील आहे. आपल्या मुलाने नोकरी करावी, लग्न करुन सुखी व्हावं अशी स्वप्न हा पोस्टमन पाहतोय. बापलेकांच्या प्रवासादरम्यान मुलगा एका सुंदर मुलीकडे आकर्षित होतो. ही मुलगी डोंगराळ भागात राहणारी असली तरीही हुशार आहे. आपल्या मुलाच तिच्याकडे आकर्षित होणं पोस्टमनला सुखावतं. तो आपल्या मुलाला लग्नाबद्दल विचारतो. मात्र पोस्टमनची नोकरी स्विकारणार असेल तर आपण लग्न करणार नाही, असं ठाम मत मुलगा व्यक्त करतो. वडिल नोकरी निमित्ताने सतत घराबाहेर राहिल्याने आपल्या आईची झालेली घुसमट मुलाने अनुभवलेली असते. आपल्या आईच्या वाट्याला आलेली ही विरहवेदना अजून एका मुलीच्या नशिबात येऊ नये अशी त्याची इच्छा असते. डोंगरदरम्यान वसलेल्या लोकांना त्याच्या आप्त स्वकीयांशी जोडणारा दुवा म्हणून आयुष्यभर काम करताना आपण आपल्या बायको-मुलाकडे दुर्लक्ष केलं याची तीव्र बोच पोस्टमनच्या मनाला लागते.
द पोस्टमन इन द माऊंटन मध्ये एक अत्यंत ह्रदयस्पर्शी प्रसंग आहे. नदी पार करताना मुलगा आपल्या वडिलांना खांद्यावर घेतो. आपला मुलगा लहान असताना त्याला खांद्यावर बसवून आपण जत्रेत फिरवला होता त्याची आठवण होऊन पोस्टमन मुलाच्या खांद्यावर हलकेच थोपटतो. त्या स्पर्शातून मुलाला वडिलांच्या मनातले भाव समजतात. मुलगा सहजपणे बोलून जातो, बाबा तुमचं वजन तर त्या टपालाच्या ओझ्यापेक्षाही हलकं आहे !
आई वडिलांच्या अस्तित्वाचं ओझं समजणा-या तमाम स्वार्थी तरुणांना या साध्याशा वाक्यातून पोस्टमनचा मुलगा सणसणीत चपराक लगावतो. सहज सोप्या संवादातून वैश्विक सत्य मांडण्याच्या दिग्दर्शकाचा या कौशल्याला मनापासून दाद द्यावीशी वाटते. या प्रसंगाच्या शेवटी तीरावरील अखंडपणे फिरत असणा-या दोन रहाटांच्या प्रतीकातून दोन पिढ्यांच्या चलनवलनाच व त्यातून निर्माण होणा-या सकारात्मक ऊर्जेच मनोज्ञ दर्शनही दिग्दर्शक आपल्याला घडवतो.
बाप लेकांमधील विसंवादाचं संवादात होणारं रुपांतर अतिशय तरलपणे चित्रित करताना चित्रपटात येणा-या इतर छोट्या पण महत्त्वाच्या व्यक्तिरेखाही लक्षात राहतील अशाच आहेत. पोस्टमनच्या पत्नीला आपल्या मुलाने ही नोकरी स्वीकारु नये अशी मनोमन इच्छा असते. पण ज्याप्रमाणे तिने नव-याला स्वीकारलयं, तशीच ती आपल्या मुलाच्या निर्णयाचाही आदर करते. पर्वतराजीमध्ये राहून कणखर झालेली ही स्त्री आपल्या भावनांना आवर घालून पुरुषाच्या मागे पहाडाप्रमाणे उभी राहते. त्यामुळे हा चित्रपट केवळ पिता-पुत्राचा न राहता, संपूर्ण कुटुंबाचा होऊन जातो. प्रत्येक पिढीचा आपला एक संघर्ष असतो, जुनी पिढी नव्या पिढीला दोष देते आणि नवी पिढी जुन्या पिढीशी जुळवून घ्यायला कमी पडते. ‘द पोस्टमन इन द माऊंटन’ दोन पिढ्याना जोडण्याचं काम कुशलतेने करतो.
या चित्रपटातील प्रमुख कलाकार तेंग रुजून, ली ये आणि हाओ इअली यांनी अभिनय केलाय असं म्हणणं चुकीचं ठरेल इतके ते आपल्या भूमिकांशी एकरुप झाले आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट सफाईदार आहे परंतु या तंत्रानं चित्रपटाच्या आशयावर मात केलेली नाही. पार्श्वसंगीताची लय पिता-पुत्रांच्या प्रवासाशी तन्मय झालेली आहे. प्रत्येक दृश्यामध्ये दिसणारा चीनच्या पर्वतराजीमधील हिरवाकंच निसर्ग डोळ्याचं पारणं फेडतो. परंतु केवळ प्रेक्षणीय व नयनरम्य एवढच वर्णन या चित्रपटाला लागू होऊ शकत नाही. प्रत्येक संवेदनशील माणसाला पोस्टमन आणि त्याचा मुलगा यांच्यातील जुळून आलेला बंध, आपल्या नात्याशी ताडून बघायला भाग पाडतात. ‘शक्ती’ पासून ‘कभी खुशी कभी गम’ सारख्या बाप मुलाचा मेलोड्रॅमेटिक संघर्ष पाहण्याची सवय लागलेल्या प्रेक्षकांनी मानवी नातेसंबंधाना वैश्विक परिमाण देणारा ‘द पोस्टमन इन द माऊंटन’ पहायलाच हवा.
संतोष पाठारे