Pran : प्राण यांच्या हिंदी सिनेमातील प्रवेशाचा भन्नाट किस्सा!
मागच्या शतकातील हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख होतो त्या प्राण (Pran) या अभिनेत्याचा सिनेमात प्रवेश कसा झाला हा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. प्राण यांनी या फिल्मी दुनियामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा इतका जबरदस्त उमटवला आहे की आज देखील प्राणचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. साठ आणि सत्तरच्या दशकात तर नायकापेक्षा जास्त मानधन प्राण यांना मिळत असे. पण गंमत म्हणजे प्राण सुरुवातीला सिनेमात काम करायलाच तयार नव्हते! पण त्यांच्या नशिबात सिनेमाच लिहिला होता. म्हणून ते या इंडस्ट्रीमध्ये आले आणि इथले सुपर अॅक्टर बनले. काय होता हा नेमका किस्सा?
हा किस्सा १९३९ सालचा आहे. त्यावेळी प्राण लाहोर येथे एका फोटोग्राफरकडे असिस्टंट म्हणून काम करत होते. दिसायला अतिशय देखणे, रुवाबदार, पर्सनॅलिटी एकदम ग्रँड. एकदा लाहोरच्या एका पानपट्टीवर संध्याकाळी साडेसात आठ वाजता काही मित्रांसमवेत प्राण गप्पा मारत बसले होते. तोंडात पान. हातात सिगारेट आणि स्टाईलमध्ये सिगारेटचे झुरके घेत प्राण (Pran) बोलत होते. हे दृश्य त्या पानपट्टीवर आलेल्या एका व्यक्तीने पहिले. त्यांना प्राण यांची ही पर्सनलिटी खूपच आवडली.
त्यांनी विचारले, ”जनाब, आपका नाम क्या है?” त्यावर प्राण यांनी थोडसं गुश्यातच उत्तर दिलं, ”आपसे कोई मतलब?” आणि पुन्हा ते आपल्या गप्पांमध्ये सामील झाले. काही वेळाने पुन्हा त्या व्यक्तीने विचारलं, “जनाब, मै आपको आपका नाम पूछ रहा हूं.” तेव्हा प्राण (Pran) म्हणाले, ”मेरे नाम से आपको क्या मतलब?” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ”देखिये, मेरा नाम वली मोहम्मद वली है. और मै दलसुखलाल पंचोली (Dalsukh M. Pancholi) के साथ काम करता हूं. क्या तुम फिल्म मे काम करना पसंद करोगे?” यावर प्राण यांनी काहीच उत्तर दिले नाही.
नंतर वली साहेब म्हणाले, ”मी दलसुखलाल पंचोली यांच्याकडे रायटर म्हणून काम करतो माझ्या कहाणीवर त्यांनी एक सिनेमा बनवला तो हिट झाला आता एक नवीन सिनेमा ‘यमला जट’ मी त्यांच्याकडे लिहितो आहे आणि मला या सिनेमातील व्यक्तिरेखा तुमच्यासारखी वाटते म्हणून मी तुम्हाला या सिनेमात काम करण्यासाठी विचारतो आहे.” आणि त्यांनी आपल्या खिशातून कार्ड काढून प्राण यांना दिले आणि सांगितले, ”उद्या सकाळी ११ वाजता पंचोली स्टुडिओमध्ये या.” आणि ते निघून गेले. प्राण (Pran) यांना वाटले ‘हा कोण कुठला माणूस ? बहुतेक दारू पिऊन आला असेल आणि फुशारकी मारण्यासाठी मोठ्या मोठ्या गप्पा मारत असेल.” म्हणून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे कार्ड देखील फाडून फेकून दिले.
काही दिवसानंतर प्राण यांची पुन्हा एकदा वली साहेबांसोबत गाठ पडली तेव्हा ते सिनेमा पाहिला थिएटरमध्ये गेले होते. प्राणला पाहिल्यानंतर वली साहेब चिडले आणि म्हणाले, ”अरे यार, तुम क्या आदमी हो? उस दिन क्यू नही आये? मै और पंचोली साब आपके दिन भर आपकी राह देखते रहे!” आता मात्र प्राण (Pran) यांच्या लक्षात आलं की हा कुठला बेवडा किंवा फुशारकी मारणारा नाही हा खरोखरच सिनेमाशी रिलेटेड माणूस आहे. मग त्याने सांगितले, ”सॉरी, उद्या मी येतो.” त्यावर वली साहेब म्हणाले, ”नको. मला तुमचा पत्ता द्या. मी स्वतः तुम्हाला गाडी घेऊन घ्यायला येतो. कारण मागच्या वेळेससारखे तुम्ही परत आम्हाला वाट पाहायला लावणार!”
प्राण (Pran) यांनी आपला पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी वली साहेब आपली गाडी घेऊन त्यांच्याकडे गेले आणि प्राणला घेऊन ते पंचोली साहेबांकडे गेले. पंचोली साहेबांनी प्राणची स्क्रीन टेस्ट घेतली आणि ‘यमला जट’ या सिनेमासाठी प्राणची निवड केली. पण प्राण पुन्हा म्हणाले, ”मला एकदा माझ्या घरी विचारलं पाहिजे. कारण माझ्या घरी कोणीच आतापर्यंत सिनेमात काम केलेले नाही.” आता मात्र पंचोली चिडले ते म्हणाले, ”अरे यार, कहा से इसको उठाके लाया है? कितने नखरे दिखाता है. मेरे यहा पिक्चर मे काम करने के लडको की लाईन लगी रहती है और इस मै पिक्चर ऑफर करना हो तो ये घर वालो को पूछ रहा है.”
त्यावर वली साहेबांनी प्राणला पुन्हा सांगितलं की, ”सिनेमा हे चांगलं प्रोफेशन आहे. मिळते आहे चांगली संधी काम कर.” त्यावर प्राण यांनी विचारले, ”पण मला पैसे किती मिळतील?” त्यावर पंचोली साहेब म्हणाले, ”महिना पन्नास रुपये पगार मिळेल.” प्राण (Pran) पुन्हा बिघडला. तो म्हणाला, ”मला फोटोग्राफीच्या दुकानांमध्ये दोनशे रुपये महिना आहे आणि तुम्ही मला पन्नास रुपये देत आहे. कसे काय शक्य आहे?” त्यावर पंचोली म्हणाले, ”तसं असेल तर मग आयुष्यभर दुकानदारीच करत बस. इथे तुला चांगली संधी मिळते. आज तुला पन्नास रुपये महिना मिळतो पण हाच पगार कायम राहील का? हा पगार वाढत जाईल. आज पन्नास रुपये मिळतात उद्या लाख रुपये मिळतील!”
===========
हे देखील वाचा : B. R. Chopra : ‘गुमराह’चा आणि दिलीप कुमारच्या या प्रेम प्रकरणाचा काय संबंध?
===========
आता मात्र प्राण (Pran) डोके ठिकाणावर आले आणि त्याने सिनेमाचा करार केला. पन्नास रुपये महिना या पगारावर सुरू केलेला अभिनयाची यात्रा प्राणला सुपर अॅक्टरपर्यंत घेऊन गेली. साठ आणि सत्तरच्या दशकात तर प्राणचा रुतबा एवढा जबरदस्त होता की नायक नायिकांपेक्षा जास्त मानधन हे प्राणला मिळत असे!
जाता जाता: प्राण (Pran) यांनी अभिनय केलेला पहिला सिनेमा ‘यमला जट’ (Yamla Jat) १९४० साली प्रदर्शित झाला यात त्याची नायिका नूरजहाँ होती!