Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Mumbai Local Movie Teaser: प्रथमेश आणि ज्ञानदाच्या सिनेमाचा कलरफुल टीझर लॉन्च !
“आयुष्याच्या गर्दीत एकमेकांना गमावत चाललेले ते… आणि त्याच गर्दीत अचानक एकमेकांपर्यंत पोहोचत गेले! दोन हरवलेली माणसं, दोन संघर्षमय आयुष्यं आणि एक नाजूक, हळवं प्रेम… ही गोष्ट आहे ‘मुंबई लोकल’ची!” या प्रेमकथेचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार असून, ‘मुंबई लोकल’ हा चित्रपट येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.(Mumbai Local Marathi Movie Teaser)

या चित्रपटातून ‘प्रथमेश परब’ आणि ‘ज्ञानदा रामतीर्थकर’ ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. दोघांमधलं हळवं नातं आणि त्यांची जीवनगाथा, मुंबईच्या गजबजलेल्या लोकल ट्रेनमध्ये फुलताना दिसणार आहे. जीवनाच्या रोजच्या लढाईत दमलेल्या दोन व्यक्ती, लोकलच्या गर्दीतून हळूहळू एकमेकांजवळ येतात… आणि मग सुरू होतो त्यांचा भावनांनी भरलेला प्रवास. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून, बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स या तीन बॅनर्सखाली निर्मिती करण्यात आली आहे.

निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल, तन्वी माहेश्वरी हे चित्रपटाचे निर्माते असून, त्र्यंबक डागा यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात अनेक लोकप्रिय आणि अनुभवी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत, ज्यात मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी आणि स्मिता डोंगरे यांचा समावेश आहे. (Mumbai Local Marathi Movie Teaser)
==============================
==============================
छायांकन योगेश कोळी, संकलन स्वप्निल जाधव, असोसिएट डिरेक्टर विनोद शिंदे, कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील, तर नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे यांनी चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. गीतलेखन अभिजीत कुलकर्णी आणि दिग्दर्शक अभिजीत यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी आणि हर्षवर्धन वावरे यांनी केलं असून, पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचं आहे. ‘मुंबई लोकल‘ ही केवळ प्रेमकथा नाही… तर ती आहे आपल्या सारख्या सामान्य माणसांची कथा, जी रोज आयुष्याशी लढते, स्वप्नं पाहते आणि प्रेम करत राहते. या प्रेमकथेचं चित्रण अगदी हळुवार, वास्तव आणि हृदयस्पर्शी पद्धतीने करण्यात आलं आहे.