
Instagramवर धुमाकूळ घालणाऱ्या Pretty Little Baby च्या गायिका Connie Francis यांच निधन !
अमेरिकेच्या संगीतविश्वातील एक गोड, भावस्पर्शी आणि लाखो मनं जिंकणारा आवाज कायमचा शांत झाला आहे. आपल्या ‘स्टुपिड क्युपिड’, ‘प्रिटी लिटिल बेबी’ आणि ‘हूज सॉरी नाऊ?’ या अजरामर गाण्यांमुळे जगभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कोनी फ्रान्सिस (Connie Francis) यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या जवळच्या मित्र रॉन रॉबर्ट्स यांनी दिली. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं, “जड अंत:करणाने सांगतो, माझी प्रिय मैत्रीण कोनी फ्रान्सिस आता आपल्यात नाही.” त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र ही बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीतप्रेमींसाठी मोठा धक्का ठरली आहे.(Pretty Little Baby Singer Connie Francis Death)

1957 ते 1964 या कालावधीत कोनी फ्रान्सिस यांचा गायन कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. रॉक अँड रोल संगीताचा जमाना नुकताच सुरू होत असताना, त्यांच्या मधुर आणि भावनांनी भरलेल्या आवाजाने त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्या त्या काळातील पहिल्या आघाडीच्या यशस्वी महिला गायिकांमध्ये गणल्या जात. त्यांचं ‘हूज सॉरी नाऊ?’ हे गाणं रातोरात लोकप्रिय झालं आणि तिथून त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर एकापेक्षा एक हृदयस्पर्शी गाणी त्यांनी गायली. ‘द हार्ट हॅज अ माइंड ऑफ इट्स ओन’, ‘डोन्ट ब्रेक द हार्ट दॅट लव्ह्स यू’ यांसारखी अनेक गाणी अजूनही श्रोत्यांच्या मनात घर करून आहेत.

केवळ गाणं नव्हे, तर अभिनय क्षेत्रातही कोनी फ्रान्सिस यशस्वी ठरल्या. ‘वेयर द बॉईज आर’ आणि ‘फॉलो द बॉईज’ या चित्रपटांमधून त्यांनी त्या काळातील तरुणाईचं प्रतिनिधित्व केलं. त्यांचा साधेपणा, आत्मविश्वास आणि शैलीमुळे त्या एका फॅशन आयकॉन म्हणूनही ओळखल्या जायच्या. कोनी फ्रान्सिस या केवळ गायिका नव्हत्या, तर त्या अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत असणारा एक आवाज होत्या. त्यांच्या गाण्यांनी काळाची मर्यादा ओलांडून अनेक पिढ्यांपर्यंत पोच मिळवली. त्यांनी अमेरिकन संगीताला नवी दिशा दिली आणि जागतिक स्तरावर आपली छाप सोडली.(Pretty Little Baby Singer Connie Francis Death)
===========================
===========================
गेल्या काही दिवसांपासून त्यांच Pretty Little Baby हे गाण इंस्टाग्रामवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. त्यांचा जीवनप्रवास, त्यांची कला आणि त्यांच्या आवाजातली भावना हे सगळं संगीतप्रेमींना नेहमी आठवत राहील. कोनी फ्रान्सिस यांचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत…पण त्यांचा आवाज कायम काळाच्या पल्याड ऐकू येत राहील जिवंत, अनमोल आणि अजरामर.