एकेकाळी पृथ्वीराज कपूर यांच्यासारखे कलावंत चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापुरात येत असत.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया भक्कम करण्यामध्ये कोल्हापुरातील कलामहर्षि बाबूराव पेंटर, चित्रपती व्ही. शांताराम, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर अशा अनेक दिग्गजांचा मोलाचा वाटा आहे. आज खरं वाटणार नाही, पण एकेकाळी पृथ्वीराज कपूर यांच्यासारखे कलावंत चित्रपटात काम करण्यासाठी कोल्हापुरात येत असत. चित्रपट निर्मितीची कला अवगत करून घेण्यासाठी दक्षिणेतील अनेक निर्माते-दिग्दर्शक कोल्हापूरचीच पायधूळ मस्तकी लावत. राज कपूर यांच्यासारख्या ‘शोमन’ ने नारदाच्या भूमिकेसाठी कोल्हापुरात पहिल्यांदा चेहर्याला रंग लावला. भालजी खरे जोहरी. अस्सल हिर्याचे तेज त्यांनी ओळखले. छोट्या राजचे कलागुण त्यांनी हेरले. त्याच्या निळ्या डोळ्यातील भव्य स्वप्नांना प्रथम वाचले भालजींनीच. त्यावेळी कौतुकाने भूमिका छोटी आणि राज नवखा असूनही त्यांनी त्याला पाच हजार रुपये दिले. पृथ्वीराज कपूर यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पैसे घेऊन पुन्हा भालजींकडे आले आणि म्हणाले, ‘अहो, इतके पैसे कशाला दिलेत मुलाला? त्यानं केलेलं काम इतक्या मोबदल्याचं नाही!’ – भालजींनी मात्र हे पैसे परत घेतले नाहीत. ते म्हणाले, ‘एका मामाने त्याच्या भाच्याला कौतुकानं बक्षीस म्हणून दिलेले पैसे आहेत हे! तुला ते नाकारण्याचा अधिकारच नाही. राजच्या भविष्यासाठीच त्याचा वापर करा.’ याच पैशात आणखी भर घालून मुंबईत चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओची जागा खरेदी करण्यात आली. आर. के. स्टुडिओ आणि राजकपूर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत जे एक युग आणलं ते सर्वांनाच माहिती आहे.
राज कपूर देखील भालजी आणि कोल्हापूरला कधीच विसरला नाही. त्याची एक ह्र्दय स्पर्शी आठवण आहे. राजचा १९८६ साली कोल्हापूर महानगर पालिकेच्या वतीने मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्या वेळी राज कोल्हापूरात आला होता. भालजींना भेटण्यासाठी तो जयप्रभा स्टुडिओत गेला. भालजींची तब्येत तेंव्हा बरी नव्हती. ते झोपले होते. त्यांना जागं करून त्रास देण्यापेक्षा राज त्यांना दूरूनच अभिवादन करून गेला. जाताना त्याने स्टुडिओतील चिमूटभर माती घेवून आपल्या मस्तकी लावली. हा कोल्हापूरच्या मातीचा सन्मान होता कारण याच मातीत त्याने अभिनयाचा श्री गणेशा केला होता. दुर्दैवाने ही त्याची शेवटची कोल्हापूर भेट ठरली. पुढे काही दिवसातच त्याचे निधन झाले. त्या दिवशी राज आपल्याला भेटायला आला होता पण भेट झाली नाही ही हळहळ भालजींच्या मनाला कायम सलत राहिली.
आज राज कपूर नाही, भालजी नाहीत आणि आर. के. स्टुडीओ देखील नाही!
धनंजय कुलकर्णी.