स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !
स्टार प्रवाह वाहिनीवर जुन्या मालिकांच्या समाप्तीनंतर आता प्रेक्षकांसाठी अनेक नवीन मालिकांचा प्रवास सुरू होतोय. या मालिकांमुळे प्रेक्षकांना आवडत्या कलाकारांचे पुन्हा छोट्या पडद्यावर दर्शन होणार आहे. अशातच २७ ऑक्टोबर २०२५ पासून वाहिनीवर ‘काजळमाया‘ (Kajalmaya Serial) ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. चला, जाणून घेऊया ती अभिनेत्री कोण आहे. (Kajalmaya Marathi Serial)

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde) मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी मराठीबरोबरच काही हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. आता प्रिया बेर्डे ‘काजळमाया’ या हॉरर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेत अक्षय केळकर, वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल या कलाकारांसोबत प्रिया मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘काजळमाया‘ ही मालिका चेटकीण वंशातील पर्णिका नावाच्या सुंदर चेटकीणीच्या कथाभूमीवर आधारित आहे. प्रिया बेर्डे या मालिकेत पर्णिकाच्या आई, कनकदत्ता या भूमिकेत दिसणार आहेत. कनकदत्ता ही स्वतःच्या चेटकीण मुलीच्या वर अभिमान बाळगणारी आणि सुडाच्या भावना असलेली अत्यंत निर्दयी खुनशी व्यक्ती आहे. पर्णिकाचा वंश पुढे जावा, यासाठी कनकदत्ता तिच्या मुलीच्या राक्षसी वृत्तीला प्रोत्साहन देते.

कनकदत्ता या भूमिकेबाबत प्रिया बेर्डे (Priya Berde) म्हणाल्या, “माझ्या अभिनय प्रवासात अशा प्रकारची भूमिका मला प्रथमच साकारायची आहे. कनकदत्ताला पाहताच प्रेक्षकांना धडकी बसते. ती क्षणातच वेषांतर करते आणि हिप्नोटायझेशनसारख्या अद्भुत कौशल्यांचा वापर करते. या पात्रात अनेक थर आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना कनकदत्ता नक्कीच आवडेल.” (Kajalmaya Marathi Serial)
=============================
हे देखील वाचा: ‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
=============================
प्रिया बेर्डे यांचा अभिनयाचा अनुभव पाहता, त्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘जबरदस्त’, ‘जत्रा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यांच्या समृद्ध अभिनय अनुभवामुळे ‘काजळमाया’तील कनकदत्ता ही भूमिका प्रेक्षकांसाठी विसरता न येणारी ठरणार आहे.