
Priya Marathe Death: ‘देव अशी चांगली माणसं का नेतो,’ प्राजक्ता माळी प्रियाबद्दल नेमकं काय म्हणाली?
मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठे (Actress Priya Marathe ) हिचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी शनिवारी पहाटे समोर आली. अवघ्या ३८ वर्षांच्या वयात प्रिया कर्करोगाशी झुंज देत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र तिचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. अखेर मुंबईतील मीरारोड येथील निवासस्थानी तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन क्षेत्र शोकाकुल झाले आहे. प्रिया मराठे ही दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून आणि अभिनेता शंतून मोघे (Actor Shantanu Moghe) यांची पत्नी होती. कलाविश्वातील या नात्यामुळे तिच्यावर सर्वांचं विशेष प्रेम होतं. तिच्या आकस्मिक निधनाने मराठी प्रेक्षक, सहकलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.( Priya Marathe Death)

अभिनेत्री आणि सूत्रसंचालक प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने प्रिया मराठेच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “आम्ही ‘एकापेक्षा एक’ आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले. प्रिया ही अत्यंत गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी प्रामाणिक राहायची, कधीच इतरांना त्रास देत नसे. तिच्या कामावर तिचं प्रचंड प्रेम होतं. देव अशी चांगली माणसं का नेतो, हा प्रश्न मला पडतोय,”असे प्राजक्ताने भावनिक शब्दांत सांगितले. प्रियाने मराठी रंगभूमी, सिनेमे आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला. ‘या सुखांनो या’ मालिकेत नकारात्मक भूमिकेतून तिने आपली वेगळी छाप सोडली. यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील तिच्या कामाची चांगलीच दखल घेण्यात आली.

हिंदी मालिकांमध्येही प्रियाने आपला ठसा उमटवला. ‘कसम से’ मालिकेतून तिने हिंदीत पदार्पण केले. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील वर्षा ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली. ‘बडे अच्छे लगते हैं’ मध्ये तिने ज्योती मल्होत्रा, तर ‘साथ निभाना साथिया’ मध्ये भावनी राठोड ही नकारात्मक पण लक्षवेधी भूमिका साकारली.इतकेच नव्हे तर मराठी इतिहासावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत ‘गोदावरी’ची भूमिका तिने इतक्या प्रभावीपणे साकारली की प्रेक्षकांनी तिला कायम लक्षात ठेवलं. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मधील ‘मोनिका’ या भूमिकेमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली.(Priya Marathe Death)
====================================
====================================
प्रिया मराठे ही केवळ अभिनेत्री नव्हती, तर एक सोज्वळ व्यक्तिमत्त्व आणि प्रामाणिक कलाकार होती. तिच्या अकाली जाण्यामुळे मराठी तसेच हिंदी मनोरंजनविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तिच्या आठवणी आणि तिची कामं मात्र कायम प्रेक्षकांच्या मनामध्ये जिवंत राहतील.