‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘प्रिया तेंडुलकर’ – भारतातील पहिली टीव्ही स्टार
प्रिया विजय तेंडुलकर. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटर्स, लेखन अशा वेगवेगळ्या करिअरमध्ये स्वत:ला आजमावून पाहणाऱ्या अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांची आज पुण्यतिथी. ज्येष्ठ नाटककार आणि पटकथाकार विजय तेंडुलकर यांची मुलगी प्रिया.
मुंबईत १९ ऑक्टोबर १९५४ साली प्रिया तेंडुलकर यांचा जन्म झाला. त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कलामहाविद्यालयात पदविकेचे शिक्षण घेतले. सुरुवातील एका साडीच्या जाहिरातीत झळकलेल्या प्रिया तेंडुलकर यांना नंतर हळुहळु जाहिरातीच्या ऑफर येऊ लागल्या. प्रिया तेंडुलकर या भारतातील पहिल्या ‘टीव्ही स्टार’ म्हणून ही ओळखल्या जातात.
१९६९ साली गिर्निश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ यांच्या नाटकामधून अभिनयाला सुरुवात केली. या नाटकात प्रिया यांनी एका बाहुलीची भूमिका केली आहे. ‘पिग्मॅलियन’, ‘अँजी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाईंडर’ आदी नाटकांमध्ये ही त्यांनी काम केले आहे.
मराठी नाटकांसोबत त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती भाषांमध्ये चित्रपट तसेच मालिकांमध्येही काम केले . ‘ती फुलराणी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘गिधाडे’ या नाटकांमध्ये तर ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘ धाकटी जाऊ’, ‘तूच माझी राणी’ अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दूरदर्शनवरील ‘रजनी’ मालिका त्या काळात खूप गाजली होती. आजही प्रेक्षक रजनी नावाने त्यांना ओळखतात.
१९७२ च्या ‘अंकुर’ या हिंदी चित्रपटात अनंत नाग यांच्या पत्नीची भूमिका केली होती. ‘किस्से मियाँ बीवी के’, ‘हम पांच’ या हिंदी मालिकांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘पूजा ना फूल’ या गुजराती चित्रपटामध्येही त्यांनी भूमिका केली आहे.
‘असंही’, ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’, ‘जावे तिच्या वंशा’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘तिहार’ इ. काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
‘रजनी’ मालिकेतील ‘करण राजदन’ यांच्याशी प्रिया तेंडुलकर यांनी विवाह केला. पण काही मतभेदानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. प्रिया तेंडुलकर यांनी कर्करोगाने ग्रासले होते. १९ सप्टेंबर २००२ साली ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं झोपेतच निधन झालं.