हटके अंदाजाची देसी गर्ल
अवघ्या सतराव्या वर्षी मिस वर्ल्ड चा मुकुट तिच्या डोक्यावर होता. अवघ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणा-या या सौदर्यवतीचं नाव होतं, प्रियंका चोप्रा. गव्हाळ वर्णाची प्रियंका भारतीय सौदर्यांचं प्रतिक ठरली. त्यासोबत तिचा आत्मविश्वास आणि तिला जे योग्य वाटेल ते करण्यासाठी सर्व अडचणींनी सामोरी जाण्याची वृत्ती, यामुळेच हे यश तिला एवढ्या कमी वयात मिळालं. प्रियंकाचा हा स्वभाव तिच्या यशाचा मार्ग आहे. प्रियंका चोप्रा ते प्रियंका निकोलस जोनस या प्रवासात तिचा हा आत्मविश्वासच कामी आला. आपल्यापेक्षा दहा वर्ष कमी असणा-या निकबरोबर प्रियंकानं लग्नाचे फेरे घतले तेव्हा सोशल मिडीयावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण या सर्वांनी तिनं अक्षरशः फाट्यावर मारत निकबरोबर आपलं लग्न थाटात केलं. बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडवरही आपला ठसा उमटवणारी प्रियंका लहानपणापासूनच अशी निग्रही वृत्तीची आहे.
प्रियंकाचा जन्म बिहारच्या जमशेदपूरचा. तिची आई मधू चोप्रा आणि वडील अशोक चोप्रा हे दोघंही आर्मीमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. अर्थात लहानपणी प्रियंकाच्या शाळाही तेवढ्यात प्रमाणात बदलल्या गेल्या. दिल्ली, चंदीगढ, अंबाला, लखनौ, बरेली, पुणे येथील आर्मी स्कूलमध्ये प्रियंकाने आपला भाऊ सिद्धार्थसह शिक्षणा निमित्त फिरत होती. तेरा वर्षाची प्रियंका जेव्हा या सततच्या शाळा बदलांना कंटाळली तेव्हा तिला थेट अमेरिकेत पाठवण्यात आलं. तेथील एका नातेवाईकांकडे प्रियंका रहायची. या काळात प्रियंकाला रंगभेदावरुन त्रास झाला. पुन्हा प्रियंकाची शाळा बदलली. अमेरिकेपेक्षा आपला देश बरा म्हणत, प्रियंका तीन वर्षांनी मायदेशी परतली. बरेली येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये तिने पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तिथेच तिनं मे क्विन ब्युटी पेजेन्ट या स्पर्धेत भाग घेतला आणि विजेतेपद मिळवलं.
प्रियंका बारावीला होती, तेव्हा तिच्या आईनं तिचे फोटो फेमिना मिस इंडीयासाठी पाठवले. हे फोटो निवडले गेले. प्रियंकाच्या वडीलांचा ही तिला पाठिंबा होता. या स्पर्धेत प्रियंका दुसरी आली आणि मिस वर्ल्डसाठी रवाना झाली. अंतिम पाच सुंद-यांमध्ये तिची निवड झाली. जगात सर्वात यशस्वी महिला कोण असा प्रश्न तिला विचारला गेला. तेव्हा तिनं मदर तेरेसा यांचं नाव घेतलं होतं. अवघ्या अठरा वर्षाची, सावळ्या रंगाची प्रियंका, फिकट अबोली रंगाच्या गाऊनमध्ये, विश्वसुंदरीचा मुकुट घालून रॅम्पवर आली. तिथेच तिच्या सौदर्याबरोबर, तिचा आत्मविश्वास आणि हजरजबाबीपणा याची साक्ष जगाला पटली होती. प्रियंका ही मिस वर्ल्ड होणारी पाचवी भारतीय महिला ठरली.
या यशानंतर आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय तिनं घेतला. मुंबईच्या जय हिंद कॉलेजमध्ये ॲडमिशनही घेतलं. पण याचवेळी प्रियंकाकडे चित्रपटाच्या अनेक ऑफर आल्या होत्या. परिणामी तिनं फिल्मी करिअरला पसंती दिली. हिंदीतील अनेक चित्रपटाच्या ऑफर तिच्याकडे होत्या. पण पहिला चित्रपट तिनं केला तो तामिळ. थामिजान नावाचा. त्यानंतर मात्र प्रियंका हिंदीमध्ये आली आणि स्थिरावलीही. इतकी की तिला लेडी डॉन सुद्धा म्हणू लागले. गॉडफादर ही संकल्पना बॉलिवूडमध्ये खूप महत्त्वाची. पण असं कोणीही प्रियंकाच्या पाठीशी नव्हतं. तिची तिच गॉडफादर होती. त्यामुळे ती आली, पडली, धडपडली. पण तेवढीच खंबीर होऊन उभी राहीली. इतकी की, तिचे मानधनही पुरुष सहकलाकापेक्षा काहीवेळा अधिक असायचे. प्रियंका चोप्रा. हा ब्रॅन्ड तिनं तयार केला.
अंदाज, द हिरो, मिस इंडीया दि मिस्टरी, प्लान, असंभव, ऐतराज, मुझसे शादी करोगी, किस्मत, ब्लैकमेल, वक्त, यकीन, बरसात, ब्लफ मास्टर, करम, अलग, टैक्सी नंबर 9211, क्रीश, डॉन, आप की खातिर, 36 चायना टाऊन, ओम शांती ओम, माय नेम इज एंथोनी गोंजालेज, लव स्टोरी 2050, बिग ब्रदर, किस्मत टॉकीज, सलाम-ए-इश्क, गॉड तुस्सी ग्रेट हो, फैशन, द्रोणा, दोस्ताना, बिल्लू, कमिने, वॉटस यॉर राशी, प्यार इम्पोस्सीबल, अंजाना अंजानी, 7 खून माफ, रा.वन, डॉन 2, अग्निपथ, तेरी मेरी कहानी, बर्फी, शूटआऊट एट वडाला, प्लेन्स, जंजीर, क्रिश 3, गुंडे, मैरी कॉम, दिल धडकने दो, बाजीराव मस्तानी हा तिचा बॉलिवूडचा प्रवास बघितला की जाणवतं विसाव्या वर्षी या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेल्या प्रियंकानं किती भिन्न भिन्न स्वरुपाच्या भूमिका केल्या आहेत. डॉन, बर्फी, फॅशन, गुंडे, मैरी कॉम, बाजीराव मस्तानी या चित्रपटात तर प्रियंकाचं हे आगळं रुप बघता आलं. फक्त अभिनयावरच तिनं समाधान मानलं नाही. तर निर्माती म्हणूनही स्वतःला सिद्ध केलं.
बम बम बोल रहा है काशी, व्हेंटीलेटर, सरवन, पहुना, काशी अमरनाथ, फायरब्रांड या मराठी, भोजपुरी, पंजाबी, नेपाळी चित्रपटांची निर्मिती तिनं केली आहे.
प्रियंकानं आपलं लक्ष व्यापक ठेवलं. त्यात बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडही होतं. जिथं हिंदी कलाकार एन्ट्री मिळावी म्हणून ध़डपडतात, त्या हॉलिवूडमध्ये प्रियंका सहज गेली आणि वरचढ ठरलीही. क्वॉन्टिंगो हा टिव्ही शो तिनं केला. त्यातूनच प्रियंकाला बेवॉच हा चित्रपट मिळाला. ड्रायन जॉन्सनसारख्या तगड्या अभिनेत्याबरोबर प्रियंका झळकली. त्यात तिचा निगेटीव्ह रोल होता. यानंतर तिने इज नॉट ईट रोमॅंटिक हा हॉलिवूडपट केला. या सर्वात हॉलिवूडच्या रेड कारर्पेटवर प्रियंकाचा वावर वाढला. तिनं परदेशी मिडीयाचं लक्ष वेधून घेतलं. ब्रिटनचा दुसरा राजकुमार प्रिन्स हॅरीच्या लग्नात आपली प्रियंका दिसली आणि तिच्या नावाची अधिकच चर्चा होऊ लागली. मेघन मार्कलची खास मैत्रिण म्हणून प्रियंका या शाही विवाह सोहळ्यात वावरली. या सर्वात प्रियंका आणि निक जोहानस यांचं प्रेमप्रकरणही चर्चेत होतं.
निक हा हॉलिवूडमध्ये गायक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. निकबरोबर प्रियंका दिसू लागल्यावर या दोघांबाबत चर्चा सुरु झाली. पण त्यात टिकेचा सूरच अधिक होता. कारण निक हा प्रियंकापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. पण या लेडी डॉननं या सर्व टिकाकारांना गप्प करीत निकबरोबर लग्न केलं. तिचं हे लग्नही अनेक दिवस चर्चेत होतं. एकतर त्यात प्रियंकानं या लग्नात अवाढव्या खर्च केला आणि दुसरं म्हणजे प्रियंकांनं घातलेले सुंदर ड्रेस. जोधपूर येथील राजवाड्यात प्रियंका आणि निक या दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं झालं. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या या शाही सोहळ्यासाठी देशातील आणि विदेशातील पत्रकार मोठ्या संख्येने आले होते. या लग्नासाठी तब्बल चार करोड रुपये खर्च झाल्याची चर्चा होती. यातील सर्व पाहुण्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पॅलेसवर नेण्यात आलं होतं. त्यात प्रियंकानं घातलेला पंचाहत्तर फूट लांबीचा गाऊनही तेवढाच चर्चेचा विषय झाला.
या लग्नानंतरही प्रियंका ट्रोल झाली. पण या देशी गर्लचा अंदाज काही औरच असतो. हम है डॉन अशाच थाटात ती वावरते. त्यामुळेच बहुधा हे जोडपं कुठंही गेलं तरी प्रसिद्धीचा झोत त्यांच्यावर असतो. मध्यंतरी गाला फेस्टमध्ये प्रियंकाचा अवतारही चर्चिला गेला. फार काय आता या लॉकडाऊनच्या काळातही आपल्या कॅलिफोर्नियाच्या अलिशान निवासात हे जोडपं आपल्यात रममाण असतांना त्यांचे फोटो सोशल मिडीयावर भाव खावून जात आहेत.
एकूण काय ही देशी गर्ल आता विदेशी सून झाली आहे. प्रसिद्धीची झोत तिच्यावर कायम आहे. आपल्यापेक्षा लहान असलेल्या निकबरोबर विवाह करण्यामागे तिची आपली मतं होती. लग्न म्हणजे फक्त दोन शरीराचं मिलन की मनाचं. स्वभावाचं. प्रियंकानं यात निकच्या स्वभावाला. त्याच्यातील कौटुंबिक प्रेमाला पसंती दिली. निक ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या जोहानस कुटुंबात ती सामावली गेली ते तिच्या या विचारांमुळेच. आपल्याला कोण काय बोलतं यापेक्षा आपल्याला समजून घेणारी माणसं काय बोलतात. याकडे तिचं लक्षं असतं. म्हणूनच या मिसेस जोहानसची नवीन इनिंग तेवढ्याच जोमात चालू आहे. आगामी काळात तिचे काही हॉलिवूडपट येत आहेत. देसी गर्ल, विदेशी म्हणून त्यात आपला ठसा उमटवेल हे मात्र नक्की…