पब्लिक रिलेशन ते अभिनय
कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘स्वामिनी’ या मालिकेतील ‘बाई बाई बाई बाई’ या डायलॉग साठी फेमस असणारे भामिनीचे पात्र तुम्हाला माहीत आहेच! जाणून घेऊया भामिनी साकारणाऱ्या सुरभी भावे यांच्या आयुष्याबद्दल…
१. अभिनय क्षेत्रात पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?
खरं तर माझं क्षेत्र पत्रकारिता हे होतं. कालांतराने मी एका पब्लिक रिलेशन कंपनी मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यावेळेस माझ्या दीर्घांक स्पर्धा सुरू असायच्या आणि एका बाजूला जॉबही सुरु होताच. तेव्हा सह्याद्री वाहिनीवरील एका एपिसोडिक मालिकेत मला काम मिळाले. पण ते काम फारच लहान होतं. झी मराठी वाहिनीवरील अस्मिता या कार्यक्रमातून मला खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक मिळाला.
२. गोठ, स्वामिनी, तुला पाहते रे, मोलकरीण बाई, ग सहाजणी, तू माझा सांगाती, माझे पती सौभाग्यवती, सख्या रे या सीरिअल्स तुम्ही केल्यात. कसा होता हा सगळा अनुभव?
सुरुवाती पासूनच माझी एक इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी कॅमेरा फेस करायचा. कॅमेरासमोर काम करताना मला एक वेगळाच आनंद मिळतो. या प्रवासातला महत्त्वाचा अनुभव म्हणजे मला भेटलेली माणसं… आणि अशी माणसं भेटली की आपल्या आयुष्याची दिशा नेहमी योग्यच ठरते. आसपासच्या लोकांचा आपल्या आयुष्यावर पगडा असतो.
एका सिरियलचा अनुभव मला इथे नमूद करावासा वाटतो. मी चिन्मय मांडलेकर यांची खूप मोठी फॅन आहे. (आता आमच्यात खूप छान मैत्री झाली आहे!) ‘तू माझा सांगाती’ करत असताना सेटवर सीनशिवाय मी त्याच्याशी बोलूच शकले नाही. एक आदरयुक्त भीती मनात होती! त्याची काम करण्याची पद्धत मला आजही फार आवडते.
‘तुला पाहते रे’ या सिरीयल मध्ये काम करताना सुबोध भावे यांचे काम अप्रतिम प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
बऱ्याचदा मोठ्या अभिनेत्यांना स्क्रीनवर पाहताना जितकं छान वाटतं, त्याहून कित्येक पटींनी त्यांचा प्रत्यक्ष अभिनय पाहणं कमालीचं वाटतं.
रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत मी ‘आई तुला कुठे ठेवू’ हे नाटक केलं होतं. छळवाद मांडणाऱ्या सूनेची भूमिका मी केली होती.
प्रशांत दामले यांच्या एक्टिंग इंस्टिट्यूटची चीफ म्हणून काम पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट शिकले. ती म्हणजे ‘आपल्या कामावर आपलं नितांत प्रेम असायला हवं’! ते जेव्हा शिकवायचे तेव्हा मीदेखील तिकडे जाऊन बसायचे आणि विद्यार्थ्यांसोबत शिकायचे.
‘लेकरे उदंड झाली’ या नाटकात काम करताना सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित (या दोघांची मी खूप मोठी फॅन आहे!) यांच्यासोबत चॅट शेअर करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती.
अशा प्रत्येक सहकाराला कलाकाराकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मिळत आहेत.. यापेक्षा सुंदर अनुभव नाही.
३. सेटवरचा एखादा आठवणीतला किस्सा कोणता?
मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे रोहिणी ताईंसोबत ‘आई तुला कुठे ठेवू’ हे नाटक करत असताना ‘सासूचा छळ करणारी सून’ असं माझं पात्र होतं. नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर एक माणूस आम्हाला भेटायला आला होता. तो रागवून मला म्हणाला की, ‘सासूवर हात उगारायला लाज वाटत नाही का?’ मी खूप गोंधळले. मग आम्हाला त्याला समजवावं लागलं की हे सगळं खरंच नाटक असतं आणि आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. हे पटल्यानंतर तो माणूस शांत झाला.
‘स्वामिनी’ मालिकेतील ‘भामिनी’ हे माझं पात्र बऱ्याच लोकांना आवडतं. या पात्राचा एक डायलॉग फार प्रसिद्ध आहे. ‘बाई बाई बाई बाई’ हे शब्द एका लयीत म्हणण्याची या पात्राची सवय आहे. काही दिवसांपूर्वी मी भाजी आणायला गेले असताना एका बाईने मला ओळखले आणि मला आत्ताच आत्ता ‘बाई बाई बाई बाई’ असं करून दाखवण्याचा त्यांनी हट्टच धरला. हातात भाजीच्या पिशव्या असूनही मी त्यांना ते करून दाखवले आणि मग माझी सुटका झाली. असा हा मजेशीर किस्सा!
२-३ दिवसांपूर्वी मी बाहेर गेले होते. तोंडावर मास्क होता. तरीही डोळ्यांमुळे एका बाईने मला ओळखले. त्यावेळीही मला खूप आनंद झाला होता.
४. करियर म्हणून अभिनयाचा विचार कसा सुरु झाला ?
मी दहावीत असताना माझे वडील गेले. भावंडांमध्ये मी मोठी असल्याने माझ्यावर घराची जबाबदारी आलीच. तेव्हा मला असं खूप वाटायचं की आपण अभिनय क्षेत्रात जावं. पण अचानक आलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ग्रॅज्युएशन करून नोकरी धरणं गरजेचं होतं. त्यात कुठेतरी माझं स्वप्न मागे पडत चाललं होतं.
कालांतराने सहा महिने काही न करता पुरतील इतके पैसे जमा झाले. मी जे जॉब केले ते या फील्ड सोबत कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेले होते. पब्लिक रिलेशन या क्षेत्रात काम करत असताना असं खूपदा वाटायचं की लोकांसाठी योजना बनवण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी करावं, माझीही कोणीतरी मुलाखत घ्यावी!
त्यानंतर आईकडून परवानगी घेऊन मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.
लग्नानंतरही माझ्या सासरच्यांनी मला खूप खूप पाठिंबा दिला. मी आज जे काही आहे, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
५. अभिनय आणि हा प्रवास करत असताना आयुष्यात उपयोगी पडतील अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या आणि त्यातली कोणती गोष्ट सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
प्रत्येक नात्यात एक पारदर्शकपणा असावा, असं मला वाटतं. अगदी प्रोफेशनल गोष्टींतही! जे काही आहे ते क्लिअर असलं पाहिजे. पारदर्शकता, कामाबद्दलचा तुमचा प्रामाणिकपणा, प्रेम, वक्तशीरपणा हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आपण करत असलेल्या कामाशी एकनिष्ठ राहणं ही काळाची गरज आहे आणि हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं.
६. एखादं नाटकातलं किंवा चित्रपटातलं पात्र जिवंत करण्याची पुन्हा संधी मिळाली तर तुम्हाला कोणतं पात्र साकारायला आवडेल?
मी लहानपणी ‘कथा अरुणाची’ नावाचं नाटक पाहिलं होतं. मला ते करायला खूप आवडेल!
जगातले सगळे जॉनर मला साकारायचे आहेत. ही तर सुरुवात आहे!
७. रॅपिड फायर
ड्रीम कलाकार : अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दिकी
फेवरेट ऍक्टर : सुबोध भावे, प्रसाद ओक
फेवरेट एक्ट्रेस : रोलप्रमाणे आवडी बदलतात! (आधी मला कंगना आवडायची)
आवडतं फिरण्याचे ठिकाण : मूळ कोकणातली असल्याने समुद्राशी नाळ जोडली गेली आहेच! पण भविष्यात ऑस्ट्रेलिया आणि पॅरिस या आवडत्या ठिकाणी मला जायचं आहे.
आवडतं पुस्तक : रंगनाथ पाठारे यांची ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही साडेआठशे पानांची महाकादंबरी, दया पवार यांचं बलुतं.
छंद : गाणं, नाचणं आणि खूप बडबड करणं.
स्वतःला रिचार्ज करण्याचा मार्ग : ही व्याख्या सध्या बदललेय. माझ्या तीन महिन्यांच्या भाच्याचे फोटोज आणि व्हीडिओज पाहणं, हा माझा सध्याचा रिचार्ज आहे.
आपल्या अभिनय कौशल्याने आणि डोळ्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री सुरभी भावे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा!
- मुलाखत आणि शब्दांकन : सोनल रमेश सुर्वे