Rahul Deshpande : डोंबिवलीमध्ये रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’!

Rahul Deshpande : डोंबिवलीमध्ये रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’!
शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार, भावस्पर्शी आणि तितक्याच तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गायकीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय बंदिशी असोत, नाट्यसंगीताची रंगत असो किंवा भावगीतांची कोमलत, त्यांच्या सादरीकरणात नेहमीच सुरेलपणा, नेमकी लय आणि हृदयाला भिडणारी अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाणी, ‘घेई छंद मकरंद’, ‘सूर निरागस हो’, ‘रंग रंगीला श्याम’ यांसारख्या रचना त्यांनी रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून ठेवल्या आहेत.
आता याच सुरेल प्रवासाचा एक नवा अध्याय डोंबिवलीत रंगणार आहे. ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ हा त्यांचा भव्यदिव्य लाईव्ह कॉन्सर्ट डोंबिवलीकरांना अनुभवता येणार आहे. खास महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संगीताची एक अविस्मरणीय मैफल रंगणार आहे. विविध शैलींमधील निवडक सादरीकरणांमुळे हा कॉन्सर्ट रसिकांसाठी खास ठरणार आहे.

तरूण मित्र मंडळ, श्रीखंडेवाडी प्रस्तुत ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ ही त्यांची मैफल केवळ सुरांचा उत्सव नसून सामाजिक कार्यासाठी आयोजित विशेष निधी संकलन कार्यक्रम आहे. या संपूर्ण इव्हेंटची जबाबदारी सांभाळली आहे इव्हेंट फॅक्टरी यांनी. यात त्यांना विशेष सहकार्य मिळाले आहार डोंबिवलीकर संस्थेचे त्यामुळे संगीताच्या माध्यमातून एका उदात्त हेतूसाठी हातभार लावण्याची ही संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे.
================================
हे देखील वाचा : Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”
================================
हा भव्य कार्यक्रम संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडणार असून, डोंबिवलीकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या निमित्ताने राहुल देशपांडे म्हणाले, ”डोंबिवलीतील रसिकांसमोर ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून संगीताचा उत्सव साजरा करायचा आहे. शास्त्रीय संगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत आणि भावगीतांपासून नव्या धाटणीच्या रचनांपर्यंतचा प्रवास आम्ही या कॉन्सर्टमध्ये घडवणार आहोत. डोंबिवलीकरांनी या सुरेल मैफलीचा जरूर भाग व्हावे.”
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi