
१०० वी जयंती विशेष : शोमॅन राज कपूर
भारतीय सिनेसृष्टीमधे आजपर्यंत अनेक स्टार, सुपरस्टार कलाकार होऊन गेले आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एक कलाकार, एक दिग्दर्शक, एक निर्माता खूपच वेगळा होता, ज्याने भारतीय चित्रपटांना आणि भारतीय प्रेक्षकांना संपूर्ण ओळखले आणि त्यांना काय अपेक्षित आहे, तसेच सिनेमे बनवले. त्यामुळे या ‘शो मॅन’चे जवळपास सर्वच सिनेमे काही अपवाद वगळता नुसते हिट नाही तर ब्लॉकबस्टर झाले. तुम्ही ओळखले असेलच आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत हो…राज कपूर.
भारतीय चित्रपटांना एक नवीन ओळख आणि नवीन उंची मिळवून देणारे शो मॅन अर्थात राज कपूर. आज याच राज कपूर यांची १०० वी जयंती आहे. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये ना केवळ अभिनय, तर दिग्दर्शन आणि निर्मितीमध्ये देखील हात आजमावत अमाप यश मिळवले. राज कपूर यांनी त्यांच्या वडिलांकडून पृथ्वीराज कपूर यांच्याकडून मिळालेला चित्रपटांचा वारसा अगदी यशस्वी पद्धतीने पुढे नेला. आज राज कपूर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी.
राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी आजच्या पाकिस्तानातील पेशावर येथे झाला होता. फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतात येऊन स्थायिक झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे मनोरंजन विश्वातील मोठे नाव होते. पृथ्वीराज कपूर हे चित्रपटांमधील मोठे आणि प्रसिद्ध अभिनेते होते. असे असूनही या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी राज कपूर यांना मोठा संघर्ष करावा लागला होता.
राज कपूर यांचे अभ्यासात कधी मनच रमले नाही. एकवेळ अशी आली की, राज कपूर यांनी अभ्यास सोडून चित्रपटांनाच पूर्ण वेळ देण्याचे ठरवले. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्टुडिओमधेच कामाची सुरुवात केली होती. मात्र पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा असल्याचा राज कपूर यांना काहीही फायदा झाला नाही. राज कपूर वडील पृथ्वीराज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये झाडू मारण्याचे काम करायचे. यासाठी त्यांना एक रुपया पगार मिळायचा. इतर कामगारांप्रमाणेच राज कपूर यांना वागणूक मिळत असे.
राज कपूर यांना कुठलीही गोष्ट आयती मिळून तिची किंमत कमी होऊ नये, याची पुरेपूर काळजी पृथ्वीराज कपूर घ्यायचे. राज कपूर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना कधीही कार
मिळाली नाही. ते इतर मुलांप्रमाणे पायी अथवा ट्रेननेच शाळेत जायचे.
राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी ‘इन्कलाब’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळात ते बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये सहायक म्हणून काम करत होते. यानंतर ते केदार शर्मा यांच्यासोबत क्लॅपर बॉय म्हणून काम करू लागले होते. पुढे केदार शर्मा दिग्दर्शक निर्माते झाल्यानंतर त्यांनीच राज कपूर यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांना ‘नीलकमल’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका ऑफर केली होती. इथूनच त्यांच्या अभिनय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
त्यापूर्वी राज कपूर यांनी ‘गौरी’, ‘इंकलाब’ आणि ‘हमारी बात’ या सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या रुपात काम केले होते. राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव होता. १९४८ मध्ये वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी ‘आग’ या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात ते पहिल्यांदा मुख्य अभिनेत्याच्या रुपात झळकले होते. १९५० मध्ये त्यांनी आर. के. स्टुडिओची स्थापना केली.
बॉलिवूडमध्ये अनेक नवोदित अभिनेत्रींना त्यांनी पहिली संधी दिली होती. ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर यांनी ‘बॉबी’ची निर्मिती केली होती. या सिनेमात त्यांनी डिंपल कपाडियाला अभिनेत्री म्हणून पडद्यावर आणले. त्यानंतर ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमात त्यांनी मंदाकिनीला संधी दिली. तर ‘हिना’मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तीयार आणि मराठमोळ्या अश्विनी भावेला घेतले. अभिनेत्री निम्मीला ‘बरसात’मध्ये भूमिका दिली. यांच्यासह अनेक जणींना त्यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते.
राज कपूर यांनी आपल्या सिनेकरिअरमध्ये ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री 420’, ’चोरी-चोरी’, ’जिस देश में गंगा बहती है’, ‘जागते रहो’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ यांसारखे अनेक अविस्मरणीय सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. या सिनेमांत स्वतः राज कपूर यांनी स्वतः अभिनय केला होता. ७० आणि ८० च्या दशकात त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती केली. या कालात आर. के बॅनरमध्ये ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली.
राज कपूर यांनी देखील दिग्दर्शकीय पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्यांनी इतक्या कमी वयातच ‘आरके स्टुडिओ’ची स्थापना केली होती. या बॅनरखाली त्यांनी ‘बरसात’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
२ मे १९८८ रोजी राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यातच राज कपूर यांना अस्थमाचा अटॅक आला होता. तेथेच ते कोसळले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. पण २ जून १९८८ रोजी त्यांची ही झुंज संपली आणि त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
राज कपूर यांचे व्यावसायिक आयुष्य खूपच यशस्वी होत असताना इकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घडामोडी घडत होत्या. विवाहित असूनही ते अभिनेत्री नर्गिस यांच्या आकंठ प्रेमात होते. अनेक चित्रपटांत राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी एकत्र दिसली होती. चित्रपटात काम करताना दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सिनेजगतात होती.
असे म्हटले जात होते की दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली असली तरी खऱ्या आयुष्यात सर्वकाही उलट होते. नर्गिसने १९५८ मध्ये सुनील दत्तसोबत लग्न केले, त्यानंतर राज कपूर उद्ध्वस्त झाले. ते इतके अस्वस्थ झाले की ते खूप मद्यपान करायचे, बाथरूममध्ये रडायचे आणि सिगारेटने स्वत:ला जाळून घ्यायचे.