‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
राज कपूरने मानधन न घेता यांच्या चित्रपटात भूमिका केली !
अभिनेता संजय खान याने साठच्या दशकामध्ये हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडल्यावर प्रवेश केला. सिनेमात येण्याचे त्याने राज कपूर यांचा अभिनय पाहून ठरवले होते. राजकपूर त्यांच्यासाठी एक आयकॉनिक फिगर होती. सिनेमाच्या दुनियेत आल्यानंतर आर के स्टुडीओ मध्ये एकदा त्यांची भेट राज कपूर यांच्यासोबत झाली. राजकपूर यांचं वागणं, बोलणं पाहून ते प्रचंड प्रभावीत झाले आणि त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस राज कपूर सोबत आपण काम करायचे ! पण ही संधी तब्बल १५ वर्षानंतर आली.
सुरुवातीला ‘दोस्ती’ आणि ‘हकीकत’ या दोन्ही १९६४ सालातील चित्रपटातील त्यांच्या सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. त्यानंतर संजय खान यांची अभिनयाची यात्रा सुरू झाली. दस लाख, शर्त, एक फुल दो माली, इंतकाम, मेला, बाबुल की गलीया, वफा असे चित्रपट करत करत संजय खान सत्तरच्या दशकातील एक इस्टॅबलिस्ट स्टार झाले. सत्तरच्या दशकामध्ये त्यांनी धडकन, धुंद हे सुपरहिट सिनेमे दिले.
आपल्या मोठ्या भावाच्या प्रमाणे (फिरोझ खान) आपण देखील चित्रपट निर्माण करावा अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात झाली आणि १९७७ साली त्यांनी ‘चांदी सोना’ हा चित्रपट निर्माण केला आणि त्याचे दिग्दर्शन देखील केले. या चित्रपटात परवीन बाबी, प्राण, रणजीत, असरानी, प्रेमनाथ यांच्या देखील भूमिका असते. या सिनेमात एक छोट्या पण महत्वपूर्ण भूमिकेसाठी त्यांनी अभिनेता राजकपूर यांना अप्रोच केले. ही अक्षरशः पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. राजकपूर यांनी आनंदाने ही भूमिका स्विकारली.
संजय खान साठी हा फार मोठा मोलाचा क्षण होता कारण ज्या अभिनेत्याकडे पाहून त्याने चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला होता त्याच्यासोबत काम करण्याची संधी आता मिळत होती. मुंबईच्या रूप तारा स्टुडिओमध्ये या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. तिथे राजकपूर पोहोचले. एका दिवसाचे शूटिंग होते. ते संपल्यानंतर संध्याकाळी जेव्हा राज कपूर जायला निघाले; त्यावेळी संजय खान यांनी त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांचे आभार मानले आणि एक ब्रिफकेस त्यांच्याकडे सरकवली. त्यावर राज कपूर म्हणाले,” हे काय आहे?” ते म्हणाले,” मी तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत नाही. परंतु यात एक लाख रुपये आहेत. तुम्ही माझ्या पहिल्या दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका करून माझा मोठा सन्मान केला आहे!” त्यावर राजकपूर भडकले आणि म्हणाले,” एकीकडे तू म्हणतो आहेस मी सन्मान केला आणि परत पैसे पण देतोस? एक छोट्या भूमिकेचे एवढे पैसे? मी अजिबात घेणार नाही. अरे, आपण दोघेही पठाण आहोत. मी हिंदू आणि तू मुसलमान जरी असलो तरी आपण दोघेही पठाण आहोत. एक पठाणाने दुसऱ्या पठाणाला मदत करायची असते. आणि मुख्य म्हणजे या चित्रपटातील माझी भूमिका अतिशय छोटीशी आहे. तुला मदत करावी म्हणून मी ही भूमिका केली आहे.
यातील एक पैसा देखील मी घेणार नाही आणि जर तू मला पुढे मोठी भूमिका दिलीस तर त्याचे मात्र मी मानधन नक्की घेईन. त्यामुळे आज हे कुठलेही पैसे मला नको !” अशा प्रकारे राज कपूर यांनी संजय खानच्या पहिल्या चित्रपटात एकही पैसा न घेता भूमिका केली. राजकपूर यांच्या मनाचा मोठेपणा संजय खान यांना खूप भावला त्यांनी त्या दिवशी ठरवले की, राजकपूरला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन आपण एक चित्रपट तयार करायचा आणि यानंतर लगेच त्या कामाला लागले. १९८० साली त्यांनी ‘अब्दुल्ला’ नावाचा एक चित्रपट निर्माण केला त्याचे दिग्दर्शन देखील केले. या सिनेमातील मुख्य भूमिका त्यांनी राज कपूर यांना दिली. राज कपूर यांनी देखील ही भूमिका अतिशय सुंदर रित्या साकार केली.
===========
हे देखील वाचा : महेश भट जेव्हा स्वतःचे आयुष्य पडद्यावर मांडतात…
===========
अब्दुल्ला या चित्रपटाचे कथानक जॉर्ज मार्झबेथुनी यांनी लिहिले होते तर चित्रपटाचे पटकथा आणि संवाद कादर खान यांची होते. या सिनेमात झीनत अमान, डॅनी, संजीव कुमार, ओमप्रकाश, महमूद यांच्या देखील प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांचे होते. मोहम्मद रफी यांनी गायलेले मैने पूछा चांदसे के देखा है कही… हे अप्रतिम गाणे या चित्रपटात होते.