राज कपूरने सोडवला दिलीप कुमारचा कौटुंबिक प्रश्न
राज कपूर आणि दिलीप कुमार हे लहानपणापासूनचे मित्र होते. पेशावरला ते दोघे एकाच शाळेत जात होते. राज कपूरचे आजोबा दिवाण बशेश्वर नाथसिंग कपूर कमिशनर होते. दिलीप कुमारचे वडील गुलाम सरवर खान फळांचे व्यापारी होते. दोन्ही कुटुंब तीसच्या दशकामध्ये स्थलांतरित होऊन मुंबईला आले. दोन कुटुंबातील मैत्री इथे देखील कायम राहिली. मुंबईच्या खालसा कॉलेजमध्ये राजकपूर आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) या दोघांनी ऍडमिशन घेतले. तिथे दोघेही क्रिकेट आणि फुटबॉल खेळत असत.
राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे नाटकांचे प्रयोग करत देशभर फिरत होते. राज कपूर देखील त्यांच्यासोबतच काम करत होता. दिलीप कुमारच्या वडिलांना मात्र नाटक, सिनेमा यांचा प्रचंड तिटकारा होता. गुलाम सरोवर खान यांना आपल्या मुलाने खूप शिकून आयसीएस होवून मोठा सरकारी अधिकारी व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्याला कायम शिक्षणाकडे लक्ष दे असे सांगितले. राज कपूरच्या आजोबा दिवाण यांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या. या मिशांचा त्यांना खूप अभिमान होता. एकदा दिलीप कुमार चे वडील गुलाम सरवर खान दिवाण बशेश्वरनाथसिंग यांना म्हणाले,” काय तुम्ही मिशांना ताव देता ? तुमचा मुलगा तर तिकडे नौटंकी करतो आणि तुमचा नातू देखील आता त्याच धंद्यात चालला आहे!” दिवाणजी फक्त हसले.(Dilip Kumar)
पुढे काही दिवसांनी दिलीप कुमार (Dilip Kumar) घरातल्या कोणालाही न सांगता बॉम्बे टॉकीज मध्ये जॉईन झाला. त्याचे पहिले एक दोन सिनेमे कधी आले कधी गेले कळालं नाही. परंतु १९४७ साली नूरजहाँ सोबतचा जुगनू हा चित्रपट जेव्हा झळकला तेव्हा तो सुपरहिट झाला. मुंबईच्या सर्व रस्त्यांवर दिलीप कुमार पोस्टर्सच्या रूपाने मोठ्या दिमाखाने झळकू लागला. दिलीपच्या वडिलांचा क्रॉफर्ड मार्केट येथे फ्रुट स्टॉल होता. तिथे एकदा दिवाणजी गेले आणि त्यांनी हाताला धरून त्यांना बाहेर आणले आणि त्यांना सांगितलं ,”चला मी तुम्हाला एक गंमत दाखवतो !” बाहेर येऊन त्यांनी रस्त्यावर लावलेल्या एका भल्या मोठ्या पोस्टर कडे बोट दाखवून म्हणाले,” हा पहा तुमचा मुलगा सिनेमात काम करतो आहे ते. तुम्ही माझा मुलगा आणि नातू नौटंकी करतो असे म्हणत होता.
आता पहा तुमचे साहब जादे काय करतायत.” मुलाला पोस्टर पाहून दिलीप कुमारच्या वडिलांचे होश उडाले. चेहरा तर आपल्या मुलाचा दिसत होता पण तिथे नाव मात्र दिलीपकुमार दिसत होते. दिवाण म्हणाले ,” पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मुलगा तुमचा जरी असला तरी त्याने त्याचे नाव आता बदलले आहे. तो आता युसुफ खान चा दिलीप कुमार झाला आहे!” हे ऐकून गुलाम सरवरखान आणखीन चिडले. तावातावाने घरी गेल्यानंतर त्यांनी घरच्यांना सर्व प्रकार सांगितला आणि घरच्यांनी दिलीप कुमार सोबत बोलणेच बंद केले.कौटुंबिक बहिष्कार च टाकला. दिलीप कुमारला (Dilip Kumar) हा प्रकार लक्षात आला. त्याची चूक झालीच होती पण आता करायचे काय? घरच्यांची नाराजी घेवून तो काम करू शकत नव्हता. करायचे काय? या क्षणी आठवण झाली आपला बाल मित्र राजकपूर ची !
=========
हे देखील वाचा : ‘आय ॲम ॲन ॲक्सीडेंटल हिरो’ : अशोक कुमार
=========
तो राज कपूर कडे गेला आणि म्हणाला,” आता तूच यातून मला बाहेर काढ!” राज कपूरने विचार केला जर आपण स्वतः तिकडे गेलो तर प्रकरण आणखी गंभीर घेऊ शकते. आजोबाला तर तिथे पाठवू शकत नाही कारण त्यांनीच हा प्रॉब्लेम तयार केला आहे. मग त्यांनी आपल्या वडलांना पृथ्वीराज कपूर यांना तिकडे पाठवायचे ठरवले. पृथ्वीराज कपूर गुलाम सरवर खान यांना भेटले आणि त्यांना मोठ्या विश्वासात घेऊन सांगितले ,” खान साहेब आता काळ बदलला आहे. तुमचा मुलगा खूप चांगले काम करत आहे. संपूर्ण भारतात त्याचे नाव झालेले आहे आणि नाटकात,सिनेमात काम करणे म्हणजे कमीपणाचे नाही. उलट तुमच्यातील अभिनय जगासमोर येतो. तुमच्या मुलाला नक्कीच लोकप्रियता आणि मान सन्मान मिळेल जो एका सरकारी अधिकाऱ्याला असतो. तेव्हा चिंता सोडा आणि खुल्या दिल्याने त्याला माफ करून त्याच्या निर्णयाला पाठिंबा द्या!” पृथ्वीराज कपूर यांच्या समजावण्याने गुलाम सरवर खान यांचा राग निवळला. आणि दिलीप कुमारला (Dilip Kumar) माफ केले. अशा पद्धतीने राज कपूर ने दिलीप कुमारच्या घरातील एका मोठ्या कौटुंबिक प्रश्नाला मोठ्या सहजपणे सोडवले !