‘राम तेरी गंगा मैली’ या टायटल बाबत राज कपूर कन्फ्युज्ड होते ?
ऐंशीच्या दशकाच्या मध्यावर आर के फिल्मचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट १६ ऑगस्ट १९८५ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा होता. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा तसा शेवटचा चित्रपट होता. कारण यानंतरचा ‘हिना’ चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. या सिनेमाला त्यावर्षी फिल्म फेअरची तब्बल दहा नामांकन मिळाली. त्यातली पाच पारितोषिक या चित्रपटाला मिळाली. ती पारितोषिक होती सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राज कपूर) सर्वोत्कृष्ट संकलक (राज कपूर) सर्वोत्कृष्ट संगीतकार (रवींद्र जैन) आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन( सुरेश सावंत) संगीतकार रवींद्र जैन आणि राजकपूर (Raj Kapoor) यांचा हा पहिलाच चित्रपट होता.
हा सिनेमा त्यातील बोल्ड दृश्याने देखील खूप वादग्रस्त ठरला होता. अभिनेत्री मंदाकिनी हिने पांढरी पारदर्शक साडी आणि ब्लाऊज घालून धबधब्याखाली आंघोळ करणे किंवा रेल्वे मधील ब्रेस्ट फीडिंगचा सीन यामुळे हा चित्रपट खूप वादग्रस्त देखील ठरला होता. पण तुम्हाला माहिती आहे का ? या चित्रपटाच्या टायटल वरून राज कपूर स्वतः खूप कन्फ्युज होते. त्यांना चित्रपटाचे शीर्षक खूप निगेटिव्ह वाटत होते. याचं कारण त्यांनी स्वत:च काही वर्षांपूर्वी ‘जिस देश मे गंगा बहती है’ हा सकारात्मक विचार देणारा चित्रपट निर्माण केला होता आणि आता काही वर्षांनी त्याच गंगेला ‘मैली’ म्हणणं त्यांना पटत नव्हतं. त्यांचा हा गैरसमज दूर कोणी केला ? आणि राजकपूर हे शीर्षक द्यायला कन्व्हिन्स कसे झाले ? त्याचाच हा एक किस्सा आहे.
राजकपूर यांचे मित्र टी पी झुनझुनवाला यांच्या मुलीच्या लग्नासाठी राज कपूर दिल्लीला गेले होते. या लग्नात त्यांची भेट संगीतकार रवींद्र जैन यांच्याशी झाली. रवींद्र जैन यांनी या लग्नामध्ये त्यांनी स्वत: लिहिलेले ‘एक राधा एक मीरा दोनो ने शाम को चाहा…’ हे गाणं गाऊन दाखवलं. राज कपूर यांना ते गाणं खूपच आवडलं. त्यांनी रवींद्र जैन यांच्याकडून ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं आणि त्यांनी विचारलं,” हे गाणं तुम्ही कोणाला दिला आहे का ?” तेंव्हा रवींद्र जैन म्हणाले,” अजून तरी नाही !” त्यावर राज कपूर म्हणाले,” हे गाणं मी आता माझ्या आगामी सिनेमा साठी विकत घेत आहे. आजपासून हे गाणं माझं झालं ! आणि माझ्या या आगामी सिनेमासाठी तुम्ही संगीतकार म्हणून असाल ! ” त्यानंतर या गाण्याच्या अनुषंगानेच राज कपूर ने चित्रपटाचे आऊटलाईन ठरवायला सुरुवात केली. (Raj Kapoor)
फारपूर्वी एक नागाबाबा तोतापुरी महाराज यांनी गंगेला मैली म्हटले होते. रवींद्र जैन यांचे गाणे आणि नागा बाबा यांची उपमा यातून स्टोरी लाईन तयार झाली आणि चित्रपटाचे नाव मनात ठरले ‘राम तेरी गंगा मैली’ परंतु त्या क्षणापासून राजकपूर (Raj Kapoor) यांना हे टायटल आवडले तर होतेच पण मनाला पटत मात्र नव्हते! काहीतरी नकारात्मक मेसेज यातून जाईल असे त्यांना वाटत होते. या चित्रपटाचे संगीतकार म्हणून रवींद्र जैन यांना फायनल करण्यात आले. रवींद्र जैन यांनी त्यांना चित्रपटाचे शीर्षक विचारले होते म्हणाले,” अजून काही विचार केलेला नाही.”
नंतर राजकपूर (Raj Kapoor) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्याजवळच्या लोणी येथे रवींद्र जैन आले असताना त्यांनी पुन्हा चित्रपटाच्या टायटल बद्दल छेडले असताना राज कपूर म्हणाले,” टायटल तर मी फायनल केले आहे पण मी खूप कन्फ्युज आहे.” त्यावर रवींद्र जैन म्हणाले,” मी काही मदत तुम्हाला करू शकतो का?” तेव्हा राज कपूर म्हणाले,” काही वर्षांपूर्वी मी ‘जिस देश मे गंगा बहती है’ हा चित्रपट काढला होता. यामध्ये एक गाणं होतं ‘होटो पे सच्चाई होती है जहां दिल मे सफाई होती है हम उस देश के वासी है जिस देश मे गंगा बहती है….” असा पॉझिटिव्ह थॉट या सिनेमातून मी दिला होता. आणि आता जो चित्रपट आपण बनतो आहे त्याचे मी टायटल ‘राम तेरी गंगा मैली’ देत आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांच्या टायटल मधून परस्पर विरोधी मेसेज जात आहेत.
==========
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटामधील राजेशची भूमिका अमिताभला करायची होती ?
==========
तेव्हा या सिनेमाचे टायटल काय ठेवावे यावर मी संभ्रमात आहे !” त्यावर रवींद्र जैन यांनी विचार करून सांगितले,” तसे असेल तर मी या सिनेमासाठी एक गाणं लिहितो. या गाण्यातून तुमची भूमिका मी व्यवस्थित मांडतो. यातून गंगेचे पावित्र्य आणि पॉझिटिव्हनेस कायम राहील. या गाण्यातून स्वतः गंगाच आपले दुःख मांडते आहे असे मी दाखवतो. त्यामुळे समाजामध्ये जो मेसेज जाईल तो व्यवस्थित जाईल!” असे म्हणून त्यांनी गाणे लिहिले राजकपूर यांना गाण्याच्या ओळी ऐकवल्या. ‘इक दुखीयारी कहे बात ये रोते रोते राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते….’ राज कपूर (Raj Kapoor) यांनी तात्काळ रवींद्र जैन यांना मिठी मारली आणि म्हणाले,” अगदी परफेक्ट तुम्ही हे गाणं लिहिले आहे!” अशा पद्धतीने राज कपूर यांचे कन्फ्युजन थांबले आणि चित्रपटाचे टायटल ठरले ‘राम तेरी गंगा मैली’.